देशहितासाठी युती झाली पाहिजे - गोपाळ शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 02:52 AM2019-02-18T02:52:23+5:302019-02-18T02:52:42+5:30

भाजपा शिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली

Alliance needs to be done for the country - Gopal Shetty | देशहितासाठी युती झाली पाहिजे - गोपाळ शेट्टी

देशहितासाठी युती झाली पाहिजे - गोपाळ शेट्टी

googlenewsNext

भाजपाशिवसेना युती बाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. देशहितासाठी आणि देशात मजबूत सरकार येण्यासाठी युती झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी ‘लोकमत’ व्यासपीठमध्ये व्यक्त केली. २०१४पेक्षा यंदा लोकसभेत एनडीएला जास्त जागा मिळतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रश्न : गेल्या साडेचार वर्षात आपण कोणते महत्वाचे प्रश्न सोडवले?
- गेली ४५ वर्षे मी राजकारणात आहे़ २७ वर्षे नगरसेवक,उपमहापौर आमदार आणि आता गेली साडेचार वर्षे उत्तर मुंबईचा खासदार म्हणून कार्यरत आहे. गेल्या निवडणुकीत आश्वासन दिल्याप्रमाणे सर्वच प्रश्न सुटले असे मी म्हणणार नाही. झोपडपट्टीवासियांना वन प्लस वन घर मिळावे म्हणून मी संघर्ष केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी हा प्रश्न सोडवला. गेली अनेक वर्षे संघर्ष करून बोरीवली येथील झाशीचे राणी उद्यान, चारकोप सेक्टर ८ मधील संघर्ष उद्यान मी नागरिकांना वचन दिल्या प्रमाणे उभे करून दिले. सतत पाठपुरावा करून मालाड ते दहिसर रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलून रेल्वे प्रवाशांना अनेक सुविधा मिळवून दिल्या. नागरिकांचा वेळ वाचण्यासाठी दहिसर ते विरारपर्यंत थेट रस्ता करण्यासाठी गेली अनेक वर्षे मी प्रयत्न केल्यामुळे या योजनेला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे.

प्रश्न : मतदार संघातील समस्या सोडवण्यात अडचणी आल्या का?
- नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मला अनेक वेळा प्रशासकीय व संबंधित अधिकारी वगार्शी संघर्ष करावा लागला.त्यांची प्रश्न सोडवण्याची मानसिकता नसल्याने अनेक वेळा नागरिकांना न्याय मिळत नाही. चारकोप सेक्टर ८ मधील उद्यानासाठी मला खूप संघर्ष करावा लागला.त्यामुळे या उद्यानाचे नाव मी चक्क संघर्ष उद्यान ठेवले.
झोपडपट्टीत राहाणाऱ्या नागरिकांना राज्य शासनाने जानेवारी २०११ पर्यंत संरक्षण दिले आहे. मुंबई महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी हे केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशांचे पालन करत नाही, ही खेदाची बाब आहे. १५-२० वर्षांपूर्वी बांधलेली घरे तोडण्याची कारवाई मनपा प्रशासन करत आहे. त्याचा फटका गरीब जनतेला बसत आहे़त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. या मानसिकतेमुळे मुंबईतील पात्र झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळत नाही. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजना धाब्यावर बसवली आहे.

प्रश्न : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे, युती होणार का?
- गेली साडेचार वर्षे लोकसभेत १०० टक्के माझी उपस्थिती होती. संसदेत शून्य प्रहरात व विविध आयुधे वापरून मी मतदार संघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडले असल्याने अनेक समस्या सुटल्या आहेत. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत मी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा ४ लाख ५६ हजार मतांनी पराभव केला होता. आगामी निवडणुकीत माझे विजयाचे मार्जिन जास्त वाढलेले असेल. गेल्या सात निवडणुकांत ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला मतदान केले नव्हते ते सुद्धा यंदा मला मतदान करतील. पहिल्यांदाच मतदान करणारा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करेल, असा मला ठाम विश्वास आहे.
युती झाली पाहिजे या मताचा मी आहे. युती झाली नाही तर विजयाच्या मतांचे मार्जिन कमी होईल. शिवसेनेला मानणारा मोठा मतदार आहे. त्यांची स्वत:ची हक्काची मते आहे. देशहितासाठी युती झाली पाहिजे़
शब्दांकन : मनोहर कुंभेजकर


 

Web Title: Alliance needs to be done for the country - Gopal Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.