अमली पदाथार्ची निर्मिती करुन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

By जितेंद्र कालेकर | Published: February 16, 2024 08:42 PM2024-02-16T20:42:30+5:302024-02-16T20:43:00+5:30

...या टोळीकडून २४ लाखांचे चार किलो ८५० ग्रॅम चरस आणि ३१ लाख ४८ हजारांचे एमडी असे ५५ लाख ७३ हजारांच्या अमली पदाथार्ंसह ८३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

A gang that smuggled drug products was busted, goods worth 83 lakhs were seized | अमली पदाथार्ची निर्मिती करुन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

अमली पदाथार्ची निर्मिती करुन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

ठाणे: अमली पदाथार्ंची निर्मिती करुन त्याची तस्करी करणाऱ्या जयेश कांबळी उर्फ गोलू (२५, रा. ठाणे) याच्यासह आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी शुक्रवारी दिली. या टोळीकडून २४ लाखांचे चार किलो ८५० ग्रॅम चरस आणि ३१ लाख ४८ हजारांचे एमडी असे ५५ लाख ७३ हजारांच्या अमली पदाथार्ंसह ८३ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

जयेश कांबळी उर्फ गोलू (२५, रा. ठाणे) आणि विघ्नेश शिर्के उर्फ विघ्न्या (२८, रा. वर्तकनगर, ठाणे) या दोघांना ७८.८ ग्रॅम एमडी पावडरसह २८ डिसेंबर २०२३ रोजी अमली पदार्थ विराेधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे, जगदीश गावीत आणि उपनिरीक्षक दीपेश किणी यांच्या पथकाने ताब्यात घेतले हाेते. त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हाही दाखल झाला होता. त्यांच्या चौकशीत त्यांना एमडी पुरविणाऱ्या अहमद शफ शेख उर्फ अकबर खाऊ (४१, रा. कुर्ला, मुंबई) आणि शब्बीर शेख (४४, रा. कुर्ला) यांना ५ जानेवारी २०२४ रोजी पालघरमधील चिंचोटीमधून अटक केली होती. त्यांच्याकडूनही २६ ग्रॅम एमडी आणि चार किलो ८५० ग्रॅम चरस जप्त केले होते. त्यांना ड्रग्ज पुरविणाऱ्या मोहमद रईस अन्सारी (४७, रा. कुर्ला) याला पालघरच्या विरारमधील चंदननगरमधून १८ जानेवारी २०२४ रोजी अटक केली. अन्सारीच्याच चौकशीतून त्याला एमडी पुरविणाऱ्या मोहम्मद अमिर खान (४४, रा. कुर्ला) यालाही २९ जानेवारी रोजी अटक केली. 

आमीरला मनोज पाटील उर्फ बाळा हा एमडी पुरवित हाेता. बाळाला पूर्वी गुजरातमध्ये एमडी तस्करीमध्ये अटक झाली होती. तो गुजरातच्या लाजपोर कारागृहात असतांना मार्च २०२३ मध्ये पॅरोलवर आल्यानंतर पुन्हा कारागृहात जाण्याऐवजी ताे पसार झाला होता. बाळा हा मोबाईलऐवजी इंटरनेट डोंगलचा वापर करुन व्हॉटसअॅप कॉलद्वारे संपर्क करीत होता. तो वास्तव्याचे ठिकाणही बदलत असल्याने तांत्रिक कौशल्याद्वाने मनोज पाटील (४५, रा. पेण, रायगड) यालाही ६ फेब्रुवारी २०२४ रोजी रायगडमधील खालापूरमधून अटक केली. त्यानंतर बाळाचा साथीदार दिनेश म्हात्रे (३८, रा. पेण) यालाही अटक केली. चौकशीमध्ये बाळा याने त्याचा साथीदार दिनेश आणि आमिर या तिघांनी मिळून पेणमधील कलद गावातील फार्महाऊस भाडयाने घेतले होते. तिथे जून ते नोव्हेंबर २०२३ या दरम्यान एमडी पावडरची निर्मिती करुन तीची अमिर खानच्या मदतीने विक्री केली.

तळोजामध्येही केली एमडीची निर्मिती-
फार्महाऊसच्या मालकाला या प्रकाराचा संशय आल्याने पनवेलमधील वलप एमआयडीसीतील एका भाडयाच्या गाळयात एमडीच्या निर्मितीची तयारी बाळाने केली होती. याच गाळयामधून २१ लाख रुपये किंमतीचे २१० ग्रॅम एमडी आणि ५९ हजारांचे एमडी निर्मितीसाठी लागणारे साहित्य आणि रसायन जप्त करण्यात आले.

असा मिळाला अमली पदार्थ-
अटक केलेल्या टोळीकडून ५५ लाख ७३ हजारांचा अमली पर्दा, ५९ हजारांचे अमली पदार्थ निर्मितीचे साहित्य, २७ हजारांचे रसायन आणि वाहने जप्त केली आहेत. ही टोळी ड्रग्ज तस्करी करणारे सराईत गुन्हेगार असून आरोपी अहमद शेख उर्फ अकबर खाऊ हा कुर्ला पोलिस ठाण्यातील दोन गुन्हयांमध्ये तसेच शब्बीर शेख हा घाटकोपरमधील ड्रग्जच्या गुन्हयात पसार आहे. तर मनोज उर्फ बाळा हा गुजरातच्या लाजपोर कारागृहातून पॅरोलवर पळालेला आरोपी आहे.
 

Web Title: A gang that smuggled drug products was busted, goods worth 83 lakhs were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.