सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ७५ दिवसांची भटकंती, भराड ते चोर्ला घाटादरम्यान एक हजार किमीचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 03:33 AM2017-10-27T03:33:29+5:302017-10-27T03:33:42+5:30

कल्याण : महाविद्यालयीन जीवनापासून साहस करण्याचे वेड लागलेल्या प्रसाद निक्ते यांनी २० वर्षांत विविध ट्रेकिंग ग्रुपसोबत अनेक गडकिल्ल्यांवर चढाई केली.

75-day trekking from Sahyadri Ghatmathi, traveling 1000 thousand kilometers between Bhad to Chorla Ghat | सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ७५ दिवसांची भटकंती, भराड ते चोर्ला घाटादरम्यान एक हजार किमीचा पायी प्रवास

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ७५ दिवसांची भटकंती, भराड ते चोर्ला घाटादरम्यान एक हजार किमीचा पायी प्रवास

googlenewsNext

मुरलीधर भवार 
कल्याण : महाविद्यालयीन जीवनापासून साहस करण्याचे वेड लागलेल्या प्रसाद निक्ते यांनी २० वर्षांत विविध ट्रेकिंग ग्रुपसोबत अनेक गडकिल्ल्यांवर चढाई केली. तेव्हापासून त्यांना सह्याद्रीचा घाटमाथा खुणावत होता. त्या वेळीच त्यांनी हा घाटमाथा चालण्याचा चंग बांधला. पेशाने मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या निक्ते यांनी आता वयाच्या ४५ व्या वर्षी एकट्याने ही मोहीम फत्ते केली. नर्मदेच्या तीरावरील भराडपासून त्यांनी सह्याद्रीचा घाटमाथा चालण्याची मोहीम सुरू केली. तब्बल ७५ दिवसांनी तिला चोर्ला घाटात पूर्णविराम दिला. एक हजार किलोमीटरचा घाटमाथा चालणारी एकल साहसी मोहीम करणारे निक्ते हे ‘वॉकिंग आॅन दी एज मॅन’ ठरले आहेत.
नर्मदेनजीकच्या भराड गावातून २६ मार्चला निक्ते यांनी मोहीम सुरू केली. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर भराड गाव आहे. पाच दिवस चालून त्यांनी सातपुडा पर्वतरांगेत प्रवेश केला. सातपुडा पार करून नंदुरबार येथे हळताणी गावात आल्यानंतर त्यांनी सह्याद्रीचे पठार चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर, इगतपुरी आणि तेथून कुलंग गाठले. कुलंगवाडीत प्रवेश केला. तेथून हरिश्चंद्र गड, भीमाशंकर, लोणावळा, मुळशी, पुढे कोयनानगरच्या दिशेने, राधानगरातून प्रवास करत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर बेळगावनजीक चोर्ला घाटापर्यंत असा ७५ दिवस एक हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला. तेथे त्यांनी मोहिमेला पूर्णविराम दिला.
निक्ते यांनी या प्रवासात काही वेळेस दिवसाला १५ ते २० किलोमीटरचे, तर काही वेळेस ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर कापले. पाण्याची बाटली, हेड टॉर्च, डोंगर चढण्यासाठी काठी, बनवता येतील अशा अन्नपदार्थांची १२ किलोची सॅकही त्यांच्या पाठीवर होती. खाण्यासाठी चणे, शेंगदाणे तसेच लापशी बनवण्यासाठी विविध डाळींचे पीठही त्यांनी सोबत घेतले होते.
मोहिमेतील अनुभवांबाबत ते म्हणाले की, ‘सह्याद्रीचे उत्तरेकडील पठार हे रखरखीत आहे. जंगल कमी आहे. त्याचबरोबर तेथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पानगळीस लागलेले वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे सावली फारशी नाही. उत्तरेकडील सह्याद्रीचा घाटमाथा हा मोकळाठाक आहे. तेथे पाण्याचे सिंचन नाही. रस्ते चांगले नाहीत. मात्र, पाहुणचार अगदी मोठा केला जातो. गावातील वस्तीला मूग व उदिडाची डाळ, सोबत ज्वारी व मक्याची भाकरी खायला मिळत होती. त्या ठिकाणी भाजी मिळत नाही. भाजी आणायला दूरवर बाजारात जावे लागते. सातपुड्यातील आदिवासी भागांत आदरातिथ्य अगदी परमोच्च होते. पाहुणा आल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यांत पाहावयास मिळतो.’
‘सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या दक्षिणेकडील भागात दाट जंगल आहे. सागवान झाडे आहेत. सुबत्ता आहे. वाटेत पाण्याचे झरे आहेत. इगतपुरीपासून पुढे ज्या ठिकाणी वस्ती केली, तेथे तांदळाची भाकर, उदिडाचे बेसन, नागलीची भाकरी असा मेन्यू रोजच्या जेवणात होता. मांसाहारही होता. न्याहारीला सकाळी अंडीही खायला मिळत होती’, असे निक्ते यांनी सांगितले.
एकल ट्रेकिंग एक मोठे आव्हान
‘एकल ट्रेकिंगमध्ये सलग चालणे होते. एकटेच असल्याने एक मोठे आव्हान असते. अशा प्रकारचे ट्रेक हे वयाच्या ४० नंतरच करावयाचे असतात. अनुभव व दृष्टिकोनाच्या जोरावर ते पार पाडले जातात. अशा प्रकारच्या ट्रेकमध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी मानसिक तयारी हवी. कितीही तयारी केली, तरी प्रत्यक्षात ट्रेक सुरू असताना कोणता प्रसंग उद्भवू शकतो, त्याला कसे तोंड द्यायचे, हे त्या वेळेची प्राप्त परिस्थितीच ठरवू शकते. घाटमाथा चढू शकतो. मात्र, तो उतरताना जास्त धोका असतो. तोल जाणे, घसरून पडणे, अशा घटना होऊ शकतात. सोबत, वजनदार सॅक असल्याने तसे होऊ शकते’, याकडे निक्ते यांनी लक्ष वेधले.
>अन धोक्यातून झाली सुटका : माझ्यावर धोक्याचा प्रसंग या ट्रेकच्या दरम्यान आला. हरिश्चंद्र गड ते भीमाशंकरदरम्यान दुर्ग ढाकोबा आहे. दºया, घाट चढून गेल्यावर वर अडकून पडण्याची वेळ आली. सायंकाळ झाली होती. रात्र होणार होती. त्यामुळे पुन्हा पायथ्याच्या गावाला जाण्याचा विचार आला. पण, नशीब बलवत्तर म्हणून हिरडा वनस्पती गोळा करणारा एक जण तेथे सुदैवाने मला भेटला. त्याच्या मदतीने पुढची वाट सर करणे ठरले.

Web Title: 75-day trekking from Sahyadri Ghatmathi, traveling 1000 thousand kilometers between Bhad to Chorla Ghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण