305 Hotel NOC is ready, but the owner does not know | ३०५ हॉटेलच्या एनओसी तयार, मालकांचा मात्र पत्ताच नाही
३०५ हॉटेलच्या एनओसी तयार, मालकांचा मात्र पत्ताच नाही

ठाणे - ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जाचक अटी आणि त्रासाला कंटाळून मंगळवारपासून शहरातील तब्बल ५०० हॉटेल व्यावसायिकांनी पुकारलेला बंद बुधवारी आयुक्तांशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला. आयुक्तांनी अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह टॅक्स कमी करून सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अग्निशमन विभागाने अवघ्या काही तासांतच शहरातील ५०० पैकी शिल्लक ३०५ हॉटेलच्या एनओसीदेखील तयार केल्या आहेत. परंतु, त्या ताब्यात घेण्यासाठी अद्यापही एकाही हॉटेलचालकाने अग्निशमन विभागाशी संपर्क साधलेला नाही. विशेष म्हणजे या एनओसीअभावी शहर विकास विभागाकडूनदेखील त्यांनी परवाने घेणे शिल्लक आहे. ३१ मार्चपर्यंतही कार्यवाही पूर्ण केली नाही, तर पुन्हा या हॉटेलवर कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.
अग्निशमन दलाचा ना-हरकत दाखला नसलेल्या ठाणे शहरातील एकूण ४२६ हॉटेल्स, बार, लाउंज यांना यापूर्वी अग्निशमन दलाच्या वतीने नोटिसा दिल्या होत्या. त्यापैकी जवळपास ८० आस्थापनांनी आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्याने ती हॉटेल्स नियमित केली आहेत. परंतु, उर्वरित हॉटेलवाल्यांनी याची पूर्तता न केल्याने ते सील करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यानंतर, तीन दिवसांत ३६ हॉटेल, बार सील करण्यात आले. परंतु, अग्निशमन दलाच्या जाचक अटी पॅनल्टी चार्जेस कमी करण्याच्या उद्देशाने शहरातील सुमारे ५०० हॉटेल, बारवाल्यांनी मंगळवारपासून बंदची हाक दिली होती. यासंदर्भात बुधवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी हॉटेल, बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर या चार्जेसचे स्लॅब करून ते २५ लाखांवरून थेट पाच लाखांपर्यंत खाली आणले आहेत. तसेच सील केलेले हॉटेल तत्काळ खुले करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार, अग्निशमन विभागाने आपली जबाबदारी पारदेखील पाडली.
अग्निशमन विभागावर टीका करणाºया बार आणि हॉटेल व्यावसायिकांसाठी याच विभागाने रात्री ११.३० वाजेपर्यंत शहरातील शिल्लक राहिलेल्या ३०५ हॉटेल, बारच्या एनओसी तयार केल्या आहेत.

आंदोलकांना आता गरज नाही का

गुरुवारी दिवसभरात एकही हॉटेल व्यावसायिक अग्निशमन विभागाकडे फिरकलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या विभागावर टीका करणाºया आणि आंदोलन करणाºया हॉटेल व्यावसायिकांना आता एनओसीची गरज नाही का, असा सवाल मात्र यानिमित्ताने शहरात तसेच पालिका वर्तुळात उपस्थित झाला आहे.

शहर विकास विभागाचाही घ्यावा लागणार परवाना''

अग्निशमन विभागाचे चार्जेस कमी केले असले, तरी शहर विकास विभागाचे कम्पोडिंग आणि चेंज आॅफ युजर्सचे चार्जेस मात्र कमी झालेले नाहीत. विशेष म्हणजे अग्निशमन विभागाची एनओसी घेतल्यानंतर या हॉटेल व्यावसायिकांना चेंज आॅफ युज करून घेऊन त्याची माहिती शहर विकास विभागाला सादर करायची आहे. यासाठी आता केवळ २२ दिवसांचा अवधी शिल्लक आहे.

असे असताना अद्याप अग्निशमन विभागाकडूनच एनओसी न घेतल्याने शहर विकास विभागाची एनओसी केव्हा मिळणार हादेखील प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. ३१ मार्चपर्यंत जे हॉटेलचालक या प्रक्रिया पूर्ण करतील, तेच १ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत. परंतु, जे या प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत, त्यांच्यावर मात्र कारवाईची टांगती तलवार कायम राहणार आहे.


Web Title:  305 Hotel NOC is ready, but the owner does not know
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.