सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ : ड्युअल कॅमेरा, ६.३ इंच डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स

By शेखर पाटील | Published: August 24, 2017 08:03 AM2017-08-24T08:03:45+5:302017-08-24T08:04:15+5:30

सॅमसंगने आपला गॅलेक्सी नोट ८ हा स्मार्टफोन अधिकृतरित्या लाँच केला असून यात अतिशय उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.

Samsung Galaxy Note 8: Dual camera, many excellent features with 6.3 inch display | सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ : ड्युअल कॅमेरा, ६.३ इंच डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ : ड्युअल कॅमेरा, ६.३ इंच डिस्प्लेसह अनेक उत्तमोत्तम फिचर्स

Next

सॅमसंग कंपनीने गेल्या वर्षी गॅलेक्सी नोट ७ हे मॉडेल लाँच केले होते. तथापि, याच्या काही मॉडेल्समधील बॅटरींच्या स्फोटांमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. यामुळे हे मॉडेल फारसे लोकप्रिय झाले नाही. यासोबत कंपनीला मोठ्या प्रमाणात बदनामी सहन करावी लागली होती. यामुळे गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये नेमके काय फिचर्स असतील? याबाबत प्रचंड उत्सुकता लागून होती. या पार्श्‍वभूमीवर, न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या शानदार कार्यक्रमात सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलचे अनावरण करण्यात आले. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असून यातील लक्षवेधी म्हणजे टेलिफोटो लेन्सयुक्त ड्युअल कॅमेरा सेटअप होय. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १२ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक कॅमेरा हा ड्युअल पिक्सल्स या प्रकारातील तसेच वाईड अँगल सेन्सरने युक्त असून यात एफ/१.७ अपार्चर आणि ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन आदी फिचर्स देण्यात आले आहेत. तर दुसर्‍या कॅमेर्‍यात एफ/१.४ अपार्चर आणि ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशनची सुविधा असेल. यात २एक्स ऑप्टीकल झूम सह लाईव्ह फोकस आणि ड्युअल कॅप्चर हे प्रमुख फिचर देण्यात आले आहेत. देण्यात आला आहे. तर या मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला असून याला एफ/१.७ अपार्चर आणि ऑटो-फोकस आदी सुविधा असतील. 

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल फॅब्लेट या प्रकारातील आहे. यात ६.३ इंच आकारमानाचा आणि क्युएचडी क्षमतेचा म्हणजेच २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेचा अमोलेड इन्फीनिटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर असेल; तर काही देशांमध्ये ऑक्टॉ-कोअर सॅमसंग एक्झीनॉस हा प्रोसेसर देण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. याची रॅम सहा जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. या मॉडेलमध्ये पहिल्यांदाच ब्लू-टुथ ५.०चा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय यात एनएफसी व एमएफसी या कनेक्टिव्हिटी असल्यामुळे सॅमसंग पे या प्रणालीच्या माध्यमातून व्यवहार करणेदेखील शक्य आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये बिक्सबी हा कंपनीचे विकसित केलेला व्हर्च्युअल डिजीटल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. हा असिस्टंट पहिल्यांदा सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या फ्लॅगशीप मॉडेलमध्ये देण्यात आला होता. अलीकडेच याला इंग्रजी भाषेचा सपोर्ट देत भारतासह जगातील बहुतांश देशांमध्ये बिक्सबीचा विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये पहिल्या दिवसापासूनच सक्रीय बिक्सबी असिस्टंट असेल हे स्पष्ट झाले आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये ३३०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. याला फास्ट आणि वायरलेस चार्जींगची सुविधा असेल. आधीच्या मॉडेलमधील बॅटरीजचा फियास्को पाहता यात सुरक्षेची योग्य ती काळजी घेण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारे असेल. सर्वात महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट असेल. या स्मार्टफोनसोबत सॅमसंग एस हा स्टायलस पेन प्रदान करण्यात आला आहे. याच्या मदतीने युजर स्मार्टफोनच्या लॉकस्क्रीनवरही लिहू शकतो. यात हातांनी लिहलेले संदेश हे अ‍ॅनिमेटेड जीआयएफच्या माध्यमातून शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यातून लिहलेली वाक्ये अनुवादीत करण्याची सुविधा असून यासोबत करन्सी कन्व्हर्टरही इनबिल्ट अवस्थेत देण्यात आले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल पहिल्यांदा अमेरिकेत उपलब्ध करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबरपासून याची तेथे विक्री सुरू होणार आहे. विशेष म्हणजे याच कालखंडात आयफोनची आगामी आवृत्ती येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात अ‍ॅपल आणि सॅमसंगमधील लढाई अजून तीव्र होणार आहे. मात्र याचे मूल्य तब्बल ९५० डॉलर्स इतके ठेवण्यात आले आहे. अमेरिकेनंतर हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: Samsung Galaxy Note 8: Dual camera, many excellent features with 6.3 inch display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.