Samsung Galaxy J2 Pro (2018) announced | सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८)ची घोषणा
सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८)ची घोषणा

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे२ प्रो या मॉडेलची गॅलेक्सी जे२ प्रो(२०१८) या नावाने नवीन आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे.

गेल्या महिन्यातच सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) हा स्मार्टफोन लाँच करण्याचे संकेत दिले होते. याचे फिचर्सदेखील विविध लीक्सच्या माध्यमातून समोर आले होते. या अनुषंगाने सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) या मॉडेलची घोषणा करण्यात आली आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर याची लिस्टींग करण्यात आली आहे. यानुसार हा बजेट स्मार्टफोन असणार आहे. पहिल्यांदा हे मॉडेल व्हिएतनाममध्ये उपलब्ध करण्यात आले असून याचे भारतीय चलनानुसार मूल्य सुमारे ९,२०० रूपये इतके आहे. सध्या तरी याचे काळा, निळा आणि सोनेरी रंगातील व्हेरियंट ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.

सॅमसंग कंपनीचा गॅलेक्सी जे २ प्रो या स्मार्टफोनमध्ये ५ इंच आकारमानाचा आणि ५४० बाय ९६० पिक्सल्स क्षमतेचा (क्युएचडी) सुपर अमोलेड या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वॉड-कोअर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. याची रॅम १.५ जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एफ/२.२ अपार्चरसह ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल.

सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८) या मॉडेलमध्ये २६०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती दीर्घ काळापर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असेल. या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.  


Web Title: Samsung Galaxy J2 Pro (2018) announced
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.