'ओप्पो एफ3'ची दिवाळीनिमित्त विशेष आवृत्ती

By शेखर पाटील | Published: September 27, 2017 09:25 AM2017-09-27T09:25:46+5:302017-09-27T09:26:07+5:30

ओप्पो कंपनीने आपल्या ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार्‍या ओप्पो एफ३ या मॉडेलची दिवाळी मर्यादीत आवृत्ती ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे.

Oppo F3 Diwali Limited Edition Launched in India | 'ओप्पो एफ3'ची दिवाळीनिमित्त विशेष आवृत्ती

'ओप्पो एफ3'ची दिवाळीनिमित्त विशेष आवृत्ती

Next

आगामी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर विविध स्मार्टफोन उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपाय योजनांचा अवलंब करत आहेत. यात नवनवीन मॉडेल्स सादर करण्यासह आधीच्या मॉडेल्सला नवीन आवृत्तीच्या स्वरूपात सादर केले जात आहे. या पार्श्‍वभूमीवर ओप्पो कंपनीने ओप्पो एफ 3 या आपल्या स्मार्टफोनची दिवाळी मर्यादीत आवृत्ती लाँच केली आहे. २९ सप्टेबरपासून हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया या शॉपिंग पोर्टलसह देशभरातील शॉपिजमधून ग्राहकांना १८,९९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे.

हे मूल्य मूळ मॉडेलच्या किंमतीपेक्षा एक हजार रूपयांनी कमी आहे. हा स्मार्टफोन अतिशय आकर्षक अशा लाल रंगात ग्राहकांना सादर करण्यात आला आहे. नावात नमूद असल्यानुसार यात दिवाळी या सणाशी संबंधीत विविध थीम्स प्रदान करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या मॉडेलसोबत भारतीय क्रिकेट संघाची स्वाक्षरी असणारी बॅटसुद्धा संबंधीत ग्राहकाला मिळणार आहे. अर्थात ओप्पो कंपनीने दिवाळी सणाच्या उत्साहाला क्रिकेटप्रेमाची जोडदेखील दिली आहे. ओप्पोने आधी दीपिका पडुकोण आणि ब्लॅक या रंगाने आधी आपल्या एफ३ या मॉडेलच्या मर्यादीत आवृत्त्या ग्राहकांना सादर केल्या आहेत. यात आता दिवाळी आवृत्तीच्या निमित्ताने एकाची भर पडली आहे.

ओप्पो एफ३ दिवाळी आवृत्तीमधील उर्वरित फिचर्स हे मूळ मॉडेलप्रमाणेच असतील. अर्थात ओप्पो एफ ३ या मॉडेलमध्ये १६ आणि ८ मेगापिक्सल्सचे दोन फ्रंट कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील दुसरा कॅमेरा हा १२० अंशाच्या लेन्सने सज्ज आहे. याच्या मदतीने उत्तम दर्जाचा ग्रुप सेल्फी घेता येईल. तसेच दोन्ही कॅमेर्‍यांच्या एकत्रीत इफेक्टमुळे दर्जेदार सेल्फी काढता येतील असे कंपनीने नमूद केले आहे. यात स्मार्ट फेशियल हे फिचर इनबिल्ट स्वरूपात देण्यात आले आहे. तर यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असून याच्या मदतीने फुल एचडी क्षमतेचे चित्रीकरण करणे शक्य आहे. तसेच ओप्पो एफ३मध्ये  ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा अर्थात फुल एचडी क्षमतेचा इन-सेल टिएफटी २.५ डी डिस्प्ले प्रदान करण्यात आला असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चे संरक्षक आवरण असेल.

१.५ गेगाहर्टझ ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७५०टी या प्रोसेसरने युक्त असणार्‍या या मॉडेलची रॅम चार जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा कलर ३.० हा युजर इंटरफेस असेल. तर यात ३२०० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे.
 

Web Title: Oppo F3 Diwali Limited Edition Launched in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mobileमोबाइल