गुगलने या वर्षाच्या प्रारंभी अँड्रॉइड आणि आयओएस प्रणाली वापरणार्‍या युजर्ससाठी लिस्ट हे फीचर सादर केले होतेे. या अंतर्गत कुणीही गुगल मॅप्सवर आपल्याला हव्या त्या ठिकाणांची लिस्ट करू शकतात. विशेष म्हणजे ही लिस्ट मित्रांसोबत शेअर करता येते. कुणीही युजर हा दुसर्‍यांच्या लिस्ट फॉलो करू शकेल. याचप्रमाणे त्याची लिस्टही इतरांना फॉलो करता येईल.

गुगल मॅप्सवर कुणीही युजर त्याने सेव्ह करून ठेवलेले कोणतेही ठिकाणी लिस्टमध्ये परिवर्तीत करू शकतो. यात हॉटेल्स, सिनेमागृह, विविध ठिकाणे आदींचा समावेश करता येईल. यावर क्लिक करून कुणीही त्याला लिस्टमध्ये परिवर्तीत करू शकेल. याशिवाय कुणीही कोणतेही ठिकाण सेव्ह करताना क्रियेट न्यू लिस्ट हा पर्याय निवडू शकतील. याच्या माध्यमातून कुणीही आपल्याला हवी ती लिस्ट तयार करू शकेल. ही लिस्ट शेअर करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यासाठी स्वतंत्र बटन प्रदान करण्यात आले आहे. गुगल मॅप्सची लिस्ट ही ई-मेल, एसएमएस, व्हाटसअ‍ॅप, हँगाऊट तसेच फेसबुक आणि ट्विटरवर शेअर करणे शक्य आहे. समोरच्या युजरला ही लिस्ट मिळाल्यानंतर तो याला फॉलोदेखील करू शकतो.

गुगल मॅप्समधील लिस्ट कुणीही नंतर संपादीत (एडिट) करू शकतो. यासाठी युवर प्लेसेसवर क्लिक करून सेव्हड हा विभाग ओपन करावा. यात कुणीही आधी सेव्ह केलेल्या ठिकाणांना संपादीत करू शकतो अथवा यात नवीन स्थानांना टाकू शकतो. यानंतर याला सेव्ह करणे शक्य आहे. ही लिस्ट जशी शेअर करता येईल अगदी त्याच पद्धतीनं तिला हाईड करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. सध्या काही डेस्कटॉप युजरला हे फिचर दिसू लागले असून येत्या काही दिवसांमध्ये सर्वांना हे क्रमाक्रमाने प्रदान करण्यात येत असल्याचे गुगलतर्फे जाहीर करण्यात आले आहे.