गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार

By शेखर पाटील | Published: December 14, 2017 04:21 PM2017-12-14T16:21:26+5:302017-12-14T23:18:37+5:30

गुगल कंपनीने आपल्या गुगल असिस्टंटचे कार्यक्षेत्र वाढवले असून, यामुळे अँड्रॉइडच्या लॉलीपॉप या जुन्या आवृत्तीवर चालणारे स्मार्टफोन तसेच टॅबलेटवरही याचा वापर करता येणार आहे.

Increased scope of Google Assistant; Now it can be used on tablets and old smartphones | गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार

गुगल असिस्टंटची वाढली व्याप्ती; आता टॅबलेट व जुन्या स्मार्टफोनवरही वापरता येणार

Next

गुगल कंपनीने आपल्या गुगल असिस्टंटचे कार्यक्षेत्र वाढवले असून, यामुळे अँड्रॉइडच्या लॉलीपॉप या जुन्या आवृत्तीवर चालणारे स्मार्टफोन तसेच टॅबलेटवरही याचा वापर करता येणार आहे. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात गुगल असिस्टंटचे कार्यक्षेत्र वाढवण्याबाबत महत्वाची घोषणा करण्यात आली होती.

यानुसार हा व्हर्च्युअल डिजिटल असिस्टंट मार्शमॅलो प्रणालीवर वापरता येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर आता अँड्रॉइडच्या लॉलीपॉप प्रणालीवर चालणार्‍या स्मार्टफोनमध्येही याला वापरता येणार आहे. याबाबत गुगलने एका ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे आता जुन्या स्मार्टफोनवरही गुगल असिस्टंट वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यापेक्षाही लक्षणीय बाब म्हणजे आता गुगल असिस्टंट टॅबलेटवरही वापरता येणार आहे.

टॅबलेटवर व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीचा उपयोग करून याचे विविध फंक्शन्स वापरता येतील. यात सर्चसह विविध रिमाइंडर्स, वेदर अलर्ट, ऑनलाइन शॉपिंग आदींचा समावेश आहे. सध्या भारतासह अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि सिंगापूर आदी देशांमधील इंग्रजी भाषेच्या युजर्ससाठी गुगल असिस्टंट कार्यान्वित करण्यात आला आहे. यात लवकरच हिंदीसह अन्य भाषांचा समावेश करण्यात येईल असे मानले जात आहे.

गुगलने जाणीवपूर्वक गुगल असिस्टंटची व्याप्ती वाढविण्यास प्रारंभ केला आहे. आधी गुगल होम या स्मार्ट स्पीकरपुरता मर्यादित असणार्‍या या असिस्टंटला स्मार्टफोनसाठी कार्यान्वित करण्यात आले. पहिल्या टप्प्यात फक्त अँड्रॉइडसाठी याला सादर करण्यात आले. तर अलीकडेच आयओएस प्रणालीसाठीही याला लाँच करण्यात आले आहे. यातच अलीकडेच गुगल असिस्टंटचा एपीआय थर्ड पार्टीजसाठी खुला करण्यात आला. यामुळे आता विविध उपकरणांमध्ये गुगल असिस्टंट वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याची पहिली झलक विविध स्मार्ट स्पीकर्समध्ये वापरण्यात आलेल्या गुगल असिस्टंटच्या माध्यमातून दिसून येत आहेत.

याच पद्धतीने आगामी कालखंडातील बरीचशी उपकरणे ही गुगलच्याच व्हाईस असिस्टंटवर आधारित असण्याची शक्यता आहे. अर्थात आपण लवकरच सर्व उपकरणांशी बोलणार असून गुगल यात अतिशय परिणामकारक आणि अचूक अशा स्मार्ट मध्यस्थाची भूमिका निभावणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Web Title: Increased scope of Google Assistant; Now it can be used on tablets and old smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.