आकर्षक फीचर्ससह डेल एक्सपीएस 15 नोटबुक भारतात

By शेखर पाटील | Published: October 27, 2017 02:08 PM2017-10-27T14:08:25+5:302017-10-27T14:11:43+5:30

डेल कंपनीने भारतात आपले एक्सपीएस १५ हे उच्च श्रेणीतील नोटबुक सादर करण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश आहे.

Dell Xps 15 with attractive features | आकर्षक फीचर्ससह डेल एक्सपीएस 15 नोटबुक भारतात

आकर्षक फीचर्ससह डेल एक्सपीएस 15 नोटबुक भारतात

Next

डेल एक्सपीएस १५ हे नोटबुक या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो अर्थात सीईएसमध्ये पहिल्यांदा प्रदर्शीत करण्यात आले होते. आता भारतीय बाजारपेठेत याला सादर करण्यात आले आहे. हे मॉडेल कंपनीच्या संकेतस्थळासह डेलच्या देशभरातील शॉपीज, क्रोमा स्टोअर्स आणि रिलायन्स डिजीटलमधून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. हे नोटबुक विंडोज १० प्रणालीवर चालणारे असून रॅम आणि इनबिल्ट स्टोअरेजनुसार याचे चार विविध व्हेरियंट ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहेत. या सर्व मॉडेल्समध्ये इंटेलच्या सातव्या पिढीतील कोअर आय ७-७७००एचक्यू हा प्रोसेसर देण्यात आला आहे. तर याच्या जोडीला ४ जीबी रॅम असणारे एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स१०५० हे ग्राफीक कार्डदेखील असेल. अर्थात यामुळे यावर गेमिंगचा मजादेखील घेता येणार आहे.

डेल एक्सपीएस १५ हे नोटबुक १५.६ इंच आकारमानाच्या आणि फुल एचडी क्षमतेच्या (१०८० बाय १९२० पिक्सल्स) इन्फिनिटी एज या प्रकारातील डिस्प्लेने सज्ज आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरयुक्त ब्लॅकलीट कि-बोर्ड प्रदान करण्यात आला आहे. या मॉडेलमध्ये मॅक्स ऑडिओ तंत्रज्ञानाने युक्त असणारे स्पीकर तसेच दोन दर्जेदार मायक्रोफोन आहेत. यात एचडी क्षमतेचा कॅमेरादेखील असेल. तर यात ब्ल्यु-टुथ, वाय-फाय तसेच यात एचडीएमआय, युएसबी ३.०, युएसबी ३.१, थंडरबोल्ट ३ आणि ४ इन १ कार्ड रीडर देण्यात आले आहे.

डेल एक्सपीएस १५ हे नोटबुक तीन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात आले आहे. याच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या मॉडेलचे मूल्य १,१७,९९० रूपये असेल. हे मॉडेल विंडोज १०च्या होम आवृत्तीवर चालणारे असून यात ५६ वॅट क्षमतेची बॅटरी आहे. हेच फिचर असणारे मात्र विंडोज १०च्या प्रो आवृत्तीवर चालणार्‍या मॉडेलचे मूल्य १,२२,९९० रूपये असेल. १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोअरेज असणार्‍या मॉडेलचे मूल्य १,३८,९९० रूपये असून ते विंडोज १०च्या होम आवृत्तीवर चालणारे असेल. यातील बॅटरी ९७ वॅट क्षमतेची असेल. तर हेच सर्व फिचर्स असणारे मात्र विंडोज १० प्रो या आवृत्तीवर चालणार्‍या मॉडेलचे मूल्य १,४३,९९० रूपये असेल. या सर्व मॉडेल्सची रॅम ३२ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे.
 

Web Title: Dell Xps 15 with attractive features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.