आयफोनवर आधारित उपकरण करणार कर्करोगाचे निदान

By शेखर पाटील | Published: November 4, 2017 09:58 AM2017-11-04T09:58:41+5:302017-11-09T10:33:50+5:30

आयफोनशी संलग्न असणारे ‘बटरफ्लाय आयक्यू’ हे उपकरण अल्ट्रासाऊंडच्या मदतीने कर्करोगाचे निदान करण्यास उपयुक्त असून ते लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होत आहे.

Cancer based diagnosis of an iPhone based device | आयफोनवर आधारित उपकरण करणार कर्करोगाचे निदान

आयफोनवर आधारित उपकरण करणार कर्करोगाचे निदान

2017 वर्षाच्या प्रारंभी  बटरफ्लाय नेटवर्क या कंपनीने आयफोनला संलग्न करण्याजोगे एक आटोपशीर आकाराचे उपकरण निर्मित केल्याचे घोषित केले होते. आता हे उपकरण ‘बटरफ्लाय आयक्यू’ या नावाने जागतिक बाजारपेठेत उपलब्ध करण्यात येत आहे. यात इलेक्ट्रीक रेझरच्या आकाराचे एक उपकरण आयफोनला अटॅच करण्यात येते. या उपकरणात विशिष्ट अर्धवाहकाच्या (सेमीकंडक्टर) मदतीने अल्ट्रासाऊंडची निर्मिती करण्यात येते. हे अल्ट्रासाऊंड रूग्णाच्या शरीराला स्पर्श करून त्याच्या आतील भागात सोडले जातात. याच्या प्रतिध्वनीवरून त्या रूग्णाच्या शरीराच्या आतील भागाची अचूक माहिती प्रतिमांच्या स्वरूपात मिळते. ही माहिती या उपकरणाला संलग्न असणार्‍या आयफोनच्या डिस्प्लेवर तात्काळ पाहता येते.

म्हणजे अगदी स्टेथॅस्कोपप्रमाणे हे उपकरण शरीराला लावल्यावर लागलीच याच्या प्रतिमा आयफोनच्या स्क्रीनवर दिसतात. याचे विश्‍लेषण करून विविध विकारांचे निदान करण्यात येते. यातील सर्वात लक्षणीय बाब म्हणजे हे उपकरण कर्करोगाचे निदान करू शकते. अर्थात कर्करोगाच्या निदानासाठी पोर्टबल उपकरण म्हणून ‘बटरफ्लाय आयक्यू’चा वापर होऊ शकतो. तर याच्या मदतीने संपूर्ण शरीराचे स्कॅनिंग (बॉडी स्कॅन) देखील शक्य आहे. १९९९ डॉलर्स या मूल्यात हे उपकरण ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. इतक्या कमी मूल्यात अतिशय उत्तम दर्जाची सुविधा असणारे हे उपकरण प्रचंड लोकप्रिय होईल असा तज्ज्ञांचा कयास आहे.

दरम्यान, पुढील वर्षी हे उपकरण अजून काही नवीन फिचर्सचा समावेश करून सादर करण्यात येणार असल्याची माहिती ‘बटरफ्लाट नेटवर्क’ या कंपनीतर्फे देण्यात आली आहे. यात आर्टीफिशियल इंटिलेजियन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे अगदी कोणत्याही व्यक्तीच्या शरिरात त्या क्षणाला किती रक्ताभिसरण होतेय यापासून ते विविध रोगांच्या निदानाची माहिती तात्काळ होणार आहे.

‘बटरफ्लाय आयक्यू’ची माहिती देणारा व्हिडीओ

Web Title: Cancer based diagnosis of an iPhone based device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.