हिरनी जब शेरनी बन जाती है...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 10:49 AM2018-12-24T10:49:43+5:302018-12-24T10:50:31+5:30

८० या दशकातील आजची कोर्ट स्टोरी. सांगोल्याचे सामाजिक भावनेने वकिली करणारे अ‍ॅड. उदयबापू घोंगडे पक्षकारांबरोबर सकाळी सकाळी आॅफिसला आले. ...

When the lioness becomes a deer ...! | हिरनी जब शेरनी बन जाती है...!

हिरनी जब शेरनी बन जाती है...!

googlenewsNext
ठळक मुद्दे८० या दशकातील आजची कोर्ट स्टोरीहिरनीभी कभी कभी शेरनी हो जाती है......

८० या दशकातील आजची कोर्ट स्टोरी. सांगोल्याचे सामाजिक भावनेने वकिली करणारे अ‍ॅड. उदयबापू घोंगडे पक्षकारांबरोबर सकाळी सकाळी आॅफिसला आले. कागदपत्रे माझ्यासमोर ठेवली. कागदपत्रे पाहता दिसून आले की, सुधाकरला खुनाच्या आरोपावरुन अटक झालेली होती. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्याला काठीने बेदम मारहाण करुन घरात बांधून ठेवले व त्यातच त्याचा मृत्यू झाला असा खुनाचा आरोप होता.

खटला शिक्षेचा होता. कारण सुधाकरच्या घरातच मृत व्यक्ती बांधलेल्या अवस्थेत सापडली होती. चोरी करायला आला असताना मारहाण केली असा खबरी जबाब सुधाकरनेच दिला होता. या दोन्ही गोष्टींमुळे केसमधून सुटण्याचा काही मार्ग दिसत नव्हता. सुधाकरची पत्नी साक्षीदार होती. ती नेत्र साक्षीदार म्हणून पोलिसांनी तिचा जबाब घेतलेला होता. कागदपत्रांचा बारकाईने अभ्यास केला असताना माझे अंतर्मन सांगत होते की, खरा प्रकार काहीतरी वेगळाच असला पाहिजे. मयताला झालेल्या सर्व जखमा डोक्यावर समोरच्या बाजूला झालेल्या होत्या. केमिकल अ‍ॅनालायझरच्या रिपोर्टवरुन दिसून येत होते की, सुधाकरच्या जप्त केलेल्या कपड्यावर रक्ताचा एकही थेंब नव्हता. परंतु सुधाकरच्या पत्नीच्या कपड्यावर रक्ताचे डाग होते. मयताच्या फक्त शर्टावर रक्ताचे डाग होते. पायजम्यावर रक्ताचा एकही थेंब नव्हता. सुधाकरने हजर केलेल्या काठीवर रक्ताचा एकही थेंब नव्हता़ परंतु घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेल्या वरवंट्यावर मयताचे रक्त होते.

यथावकाश खटला सुनावणीसाठी उभा राहिला. माझे अंतर्मन मला सांगत होते की, खरा प्रकार वेगळाच असला पाहिजे. सुधाकर घटनास्थळी नसलाच पाहिजे. घटनास्थळी फक्त मयत व सुधाकरची बायको हे दोघेच असले पाहिजेत़ मयतास काठीने मारहाण झालेली नाही. त्याच्या डोक्यावर झालेल्या जखमा वरवंट्यानेच झालेल्या आहेत. एक गोष्ट मला प्रकर्षाने खटकत होती ती म्हणजे, सुधाकरची बायको काही बोलत नसे. सारखी हरिणीसारखी बावरलेली असे. शुन्यात नजर लावून बसलेली असे. तारखेच्या दिवशी सुधाकरच्या बायकोशिवाय सर्वांना आॅफिसच्या बाहेर जाण्यास सांगितले. तिला खरे काय ते सांग असे दरडावून विचारले. दहा मिनिटे ती शुन्यातच बघत होती. नंतर तिने जे सांगितले ते फारच भयानक होते. त्या दिवशी तिचा नवरा रात्री शेतात मुक्कामाला होता. घरात फक्त ती व तिचे लहान लेकरु होते. मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा ठोठावण्यात आला.

तिला वाटले, नवराच आला, म्हणून तिने दरवाजा उघडला. तर समोर मयत उभा. त्याने पिण्यास पाणी मागितले. ती पाणी आणण्यास स्वयंपाक घरात गेली. हा पाठोपाठ गेला. तिला खाली पाडले, तिची अब्रू घेण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या आकांताने तिने प्रतिकार केला. तिच्या हातात वरवंटा लागला. तिने तो वरवंटा प्राणपणाने शक्ती लावून त्याच्या डोक्यात मारला. त्याची मिठी ढिली पडली. तिने आपली अब्रू वाचवली होती. रात्रभर ती घरी रडत बसली. उगवतीच्या सुमारास तिचा नवरा आला. त्याला बघताच ती ढसाढसा रडू लागली. तिने सर्व हकिकत सांगितली. खरी हकिकत जर सर्वांना सांगितली तर विनाकारण नाही ती चर्चा होईल व अब्रूचे खोबरे हाईल म्हणून मयत हा चोरी करण्यासाठी घरात घुसला. त्यामुळे त्यास मी काठीने मारले अशी खबर सुधाकरने दिली व खुनाचा आरोप स्वत:वर घेतला. महात्मा गांधींचा सत्याचा प्रयोग न्यायालयात सादर करण्याचा निर्णय मी घेतला.

त्या बाईना जसे प्रत्यक्षात घडले तसा जबाब न्यायालयात द्या असे सांगितले. न्यायालयात सुधाकरच्या बायकोने घडले तसे सांगितले. अब्रू वाचवण्यासाठी मीच स्वसंरक्षणार्थ त्या नीच माणसाला वरवंटा मारुन खलास केले अशी कबुली दिली. न्यायालयात हजर असलेले सर्वजण अवाक् झाले. नवºयाऐवजी बायकोच आता जन्मठेपेला जाईल असे सर्वांचे मत पडले. न्यायालयात युक्तिवादात आम्ही असे निदर्शनास आणून दिले की, एखाद्या महिलेच्या अब्रूवर घाला पडत असेल तर त्या परिस्थितीत त्या महिलेला स्वसंरक्षणार्थ त्या व्यक्तीला ठार मारण्याचा अधिकार इं. पि. को. १०० प्रमाणे पूर्णपणे अधिकार त्या महिलेस आहे. सुधाकरच्या बायकोने केलेले कृत्य हा गुन्हाच होत नाही. सुधाकरची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जेलमधून सुटल्यावर सुधाकर, त्याची बायको व इतर नातेवाईक पेढे घेऊन भेटण्यास आले. पहिल्या दिवशी हरिणीसारखी बावरलेली व घाबरलेली सुधाकरची बायको त्या दिवशी शेरणीसारखी दिसत होती.
हिरनीभी कभी कभी शेरनी हो जाती है......
-अ‍ॅड. धनंजय माने.

Web Title: When the lioness becomes a deer ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.