बहुत जनांचा उद्धार; भीमा माझा नरवरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 02:36 PM2018-12-06T14:36:55+5:302018-12-06T14:38:22+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानासाठी जे कार्य केले ते सर्वांना ज्ञात आहे. त्यापलीकडे त्यांनी केलेले कार्य, दिलेले विचार, केलेल्या ...

Too many people; Bhima is my face | बहुत जनांचा उद्धार; भीमा माझा नरवरू

बहुत जनांचा उद्धार; भीमा माझा नरवरू

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील सर्व स्त्रियांचे महान नेते आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानासाठी जे कार्य केले ते सर्वांना ज्ञात आहे.भारतीय समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार एवढीच काय ती त्यांची ओळख सांगितली

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानासाठी जे कार्य केले ते सर्वांना ज्ञात आहे. त्यापलीकडे त्यांनी केलेले कार्य, दिलेले विचार, केलेल्या चळवळी समजून घेण्याची गरज आहे. भारतीय समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे कैवारी, घटनेचे शिल्पकार एवढीच काय ती त्यांची ओळख सांगितली.

इ.स. १९२० ते १९५६ या काळात भारतीय समाजात ज्या चळवळी झाल्या, जे विचारमंथन घडले, जो भविष्याचा वेध घेण्यात आला,  स्वातंत्र्यानंतरचे जे नियोजन करण्यात आले  त्या सर्वात सक्रिय सहभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहेच. विसाव्या शतकाच्या इतिहासातील प्रत्येक घटनेशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे विशेष महत्त्व राहिले आहे. आपल्या देशासाठी ज्यांनी काही भूमिका घेतली आहे,  काही विचार दिले आहेत, काळी चळवळी उभारल्या आहेत. प्रसंगी योद्ध्याच्या भूमिकेत रणसंग्राम मांडला आहे. प्रस्थापितांशी संघर्ष केला आहे हे समजून घेतले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी केलेलं कार्य, चळवळी असे अनेक पैलू आहेत. पण त्याकडे डोळेझाकपणे दुर्लक्ष का केले जाते ? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.

शेती-शेतकरी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चिंतनाचा कार्याचा विषय आयुष्यभर राहिला. विधीमंडळात शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरच बोलले. शासन आणि त्यांचे अधिकारी, बडे जमीनदार आणि सावकार, खोत आणि पोलीस पाटील  ही सर्व यंत्रणा शेतकºयांना त्रास देते. शेतसाºयाव्यतिरिक्त अन्य निमित्ताने पैसे उकळणे, शेतकºयांची भाजी कोंबडी फुकटात घेणे, गाय बैलांच्या चराईच्या जागेवर हक्क सांगणे, जनावरे कोंडवाड्यात टाकणे, सावकाराने छळणे यावर त्यांनी सतत मार्गदर्शन केले. देशाचे पहिले पाटबंधारे व ऊर्जामंत्री म्हणून त्यांनी देशाचे जलधोरण व ऊर्जा धोरण निश्चित केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९२५ च्या सुमारास इम्प्रुमेंट चाळीत राहत असत. त्यावेळी त्यांना कामगारांच्या जीवनाचे जवळून दर्शन घडलेले होते. त्यांचे होणारे शोषण हा बाबासाहेबांच्या चिंतनाचा दुसरा विषय म्हणावा लागेल. कामगारांचे परिपूर्ण आणि एकसंघ संघटन असावे, जात, धर्म या आधारावर  फूट फडता कामा नये यासाठी त्यांनी वेळोवेळी कामगारांना मार्गदर्शन केले. कमगारांच्या कामाचे तास, योग्य वेतन, भरपगारी रजा, माफक किमतीत आरोग्यसेवा, नुकसान भरपाई, वेतनवाढ, गणवेश भत्ता, शैक्षणिक , वैद्यकीय सुविधा, पाणीपुरवठा, कामगार स्त्रियांना प्रसूतीपूर्व आणि  प्रसूतीनंतर भरपगारी रजा, कामाच्या ठिकाणी, पाळणा घराची सोय, कामगारांना तांत्रिक प्रशिक्षणाची सोय इत्यादी संबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली भूमिका व कामगारांना मिळवून दिलेला न्याय जगाच्या इतिहासात अविस्मरणीय आहे, परंतु आजच्या समाजाला त्याचा विसर पडला आहे. मजूरमंत्री म्हणून, कामगार नेते म्हणून आणि कायदेतज्ज्ञ म्हणून त्यांनी आपल्या विचारांचे कार्याचे योगदान कामगारांच्या हक्कासाठी दिले.

 आदिवासी अजून रानटी युगातच आहेत. त्यांच्या जीवनात कुठल्याच प्रकारचा बदल झाला नसल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आले. त्यासाठी त्यांना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे. ही बाब विचार घेऊन बाबासाहेबांनी घटनेत २७५ (१) मध्ये एखाद्या राज्यातील अनुसूचित जनजातीच्या कल्याणवृद्धीसाठी किंवा त्या  राज्यातील अनुसूचित क्षेत्राची प्रशासन पातळी त्या राज्याच्या उर्वरित क्षेत्रांच्या प्रशासन पातळी इतकी उंचावण्यासाठी ते राज्य भारत सरकारच्या मान्यतेखाली येईल. आदिवासी जमातीसाठी राजकीय, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीचा ध्यास या तरतुदीमधून बाबासाहेबांनी व्यक्त केला आहे.

आदिवासी जमातीना शिक्षण देऊन जीवनप्रवाहात आणण्याची गरज असून त्यांना राजकीय, आर्थिक, सामाजिक संरक्षण देणे महत्त्वाचे आहे. ही बाबासाहेबांची प्रांजळ भूमिका होती. या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आदिवासी जमातीच्या प्रश्नावर संघर्ष करणारे, भूमिका मांडणारे नेते होते.भारतीय समाजात स्त्रियांना नेहमीच दुय्यम स्थान दिले गेले होते. तिचे हक्क व अधिकार डावलले गेले होते. पारंपरिक दृष्टिकोन टाकून स्त्रियांनी त्यातून बाहेर यावे, यासाठी बाबासाहेब आंबेडकर सतत प्रयत्नशील होते. स्त्रियांना सर्व अधिकार मिळावेत. संपत्तीमध्ये वारसाहक्काने हिस्सा मिळावा , घटस्फ ोटाचा निर्णय तिने घ्यावा. जोडीदार निवडीचे स्वातंत्र्य, विवाह निर्णयाचे स्वातंत्र्य आदीसह अनेक तरतुदी असलेले हिंदू कोड बिल त्यांनी ९ एप्रिल १९४८ रोजी सिलेक्ट कमिटीकडे पाठविले. १७ सप्टेंबर १९५१ रोजी खुद्द पंतप्रधान नेहरु यांनी त्यात कपात सुचविली. त्यामुळे बिलाचे स्वरुपच बदलून गेले. आधुनिक काळातील लोकशाही मूल्यावर आधारित जीवन स्त्रियांना मिळावे. यासाठी संघर्ष करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील सर्व स्त्रियांचे महान नेते आहेत.
- डॉ. धम्मपाल रेवण माशाळकर
 (लेखक हे साहित्यिक आहेत)

Web Title: Too many people; Bhima is my face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.