सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेची तयारी पूर्ण, शुक्रवारपासून यात्रेस प्रारंभ, १३ जानेवारीला अक्षता सोहळा होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 11:11 AM2018-01-10T11:11:58+5:302018-01-10T11:14:09+5:30

यात्रेच्या आयोजनासाठी देवस्थान समितीने मध्यवर्ती, जागा वाटप, मिरवणूक, रंग व विद्युत रोषणाई, पशुप्रदर्शन, शोभेचे दारूकाम आदी नऊ समित्या स्थापन केल्या असून, या समित्यांच्या प्रमुखांनी सर्व कामे पूर्ण केली आहेत. यंदा गड्डा प्लॉट्स आणि होम मैदानावर एकूण २१० स्टॉल्स उभारले जात आहे.

Solapur Gramadavev is preparing for Siddharameshwar Yatra, starting from Youth Festival on Friday, on 13th January, Akshaya will be held! | सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेची तयारी पूर्ण, शुक्रवारपासून यात्रेस प्रारंभ, १३ जानेवारीला अक्षता सोहळा होणार !

सोलापूर ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेची तयारी पूर्ण, शुक्रवारपासून यात्रेस प्रारंभ, १३ जानेवारीला अक्षता सोहळा होणार !

Next
ठळक मुद्देयात्रेच्या पहिल्या दिवशी १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यापासून तैलाभिषेकासाठी सात नंदीध्वजांची मिरवणूक निघणार रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ १५ ते ३१ जानेवारीदरम्यान दर मंगळवारी पशू प्रदर्शन आणि विक्री होणार‘श्री’च्या चांदीच्या गाभाºयाचे काम एकूण स्वरूपात ४० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १० : शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेची देवस्थान पंचसमितीकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवार, दि. १२ जानेवारीपासून तैलाभिषेकाने (यण्णीमज्जन) यात्रेस प्रारंभ होत आहे. १३ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा अर्थात संमती भोगी होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी होम मैदानावर रात्री होम प्रदीपन विधी आणि त्यानंतर दुसºया दिवशी याच ठिकाणी रात्री शोभेचे दारूकाम होणार आहे. मंगळवार, दि. १६ जानेवारी रोजी रात्री मल्लिकार्जुन मंदिरात नंदीध्वजाच्या वस्त्रविसर्जनाने यात्रेच्या धार्मिक विधींची सांगता होणार आहे, अशी माहिती पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
यात्रेच्या आयोजनासाठी देवस्थान समितीने मध्यवर्ती, जागा वाटप, मिरवणूक, रंग व विद्युत रोषणाई, पशुप्रदर्शन, शोभेचे दारूकाम आदी नऊ समित्या स्थापन केल्या असून, या समित्यांच्या प्रमुखांनी सर्व कामे पूर्ण केली आहेत. यंदा गड्डा प्लॉट्स आणि होम मैदानावर एकूण २१० स्टॉल्स उभारले जात आहे. कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचीही उभारणी झालेली आहे. रेवणसिद्धेश्वर मंदिराजवळ १५ ते ३१ जानेवारीदरम्यान दर मंगळवारी पशू प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. या बाजारात आंध्र व कर्नाटकातील पशूही आणले जातात, असे त्यांनी सांगितले.
यात्रेच्या पहिल्या दिवशी १२ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यापासून तैलाभिषेकासाठी सात नंदीध्वजांची मिरवणूक निघणार आहे. ‘श्री’ने स्थापन केलेल्या पंचक्रोशीतील ६८ लिंगांना तैलाभिषेक करून रात्री ही मिरवणूक हिरेहब्बू वाड्यापाशी येणार आहे. दुसºया दिवशी सकाळी याच वेळी अक्षता सोहळ्यासाठी नंदीध्वजांची मिरवणूक निघेल. दुपारी १ वाजेपर्यंत ती मंदिराजवळील संमती कट्ट्याजवळ यावी, असा प्रयत्न असून यासाठी भाविकांनी लवकर पूजा करावी, असे आवाहन काडादी यांनी केले आहे. नंदीध्वज संमती कट्ट्यावर आल्यानंतर अक्षता सोहळा होईल. १४ जानेवारीला मकर संक्रांतीच्या दिवशी होम मैदानावर रात्री आठ वाजता होम प्रदीपन सोहळा होईल. १५ जानेवारीला किंक्रांतीच्या दिवशी रात्री आठ वाजता शोभेचे दारूकाम होणार असून, १६ जानेवारीला कप्पडकळीने यात्रेची सांगता होणार आहे.
------------------
यात्रेतील धार्मिक विधी
-१२ जानेवारी तैलाभिषेक
- १३ जानेवारी अक्षता समारंभ
 - १४ जानेवारी होम प्रदीपन
- १५ जानेवारी किंक्रांत (शोभेचे दारूकाम)
- १६ जानेवारी कप्पडकळी (नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन)
---------------------------
सुवर्ण कलशाचे उद्घाटन
मंदिरावर तात्पुरता सुवर्ण कलश बसविण्यात आला असून, यासाठी सुवर्णसदृश धातूचा तूर्त वापर करण्यात आला आहे. यात्रेनंतर अस्सल सोन्यापासून हा कलश बसविण्यात येणार आहे. या तात्पुरत्या स्वरूपाच्या कलशाचे उद्घाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष काडादी यांच्या हस्ते पूजा वस्तू भांडारच्या नूतनीकरणाचे उद्घाटन झाले.
----------------
रस्त्याचा विषय न्यायप्रविष्ट
आपत्कालीन रस्त्याचा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा हा रस्ता सोडूनच यात्रा करत आहोत. सोमवारी कुण्या व्यापाºयाने आपत्कालीन रस्त्यावर स्टॉल उभारण्याचा प्रयत्न केल्याचे समजले; पण यासाठी त्याने देवस्थानला कल्पना दिली नव्हती. रस्त्याचा विषय न्यायालयात असल्यामुळे देवस्थानची बाजू तेथेच मांडण्यात येईल, असे काडादी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
------------------
गाभाºयाचे काम ४० टक्के पूर्ण
‘श्री’च्या चांदीच्या गाभाºयाचे काम एकूण स्वरूपात ४० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले असून, आतील काम संपूर्णत: झाले आहे. हे काम शतप्रतिशत होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल. आतील परिसराच्या सुशोभीकरणाचे कामही सुरू झालेले आहे. सभामंडपाचे क्षेत्रफळही वाढविण्यात आल्याची माहिती काडादी यांनी दिली. सुवर्ण सिद्धेश्वर प्रकल्पासाठी आजवर ९५० ग्रॅम सोने देणगी म्हणून आले असून, ४५० किलो चांदी आली आहे. देवस्थानने १०० किलो चांदी खरेदी केली आहे. या प्रकल्पासाठी ४.९० कोटींची देणगी प्राप्त झाल्याचेही काडादी यांनी सांगितले.

Web Title: Solapur Gramadavev is preparing for Siddharameshwar Yatra, starting from Youth Festival on Friday, on 13th January, Akshaya will be held!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.