फक्त पाच मिनिटांचा उशीर झाला असता ...तर चार-पाच जणांचे मुडदे पडले असते !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 02:06 PM2019-06-05T14:06:37+5:302019-06-05T14:09:28+5:30

सोलापुरातील पावसात कोसळले घर : देवघरात गेले म्हणून सर्वांचे प्राण वाचले

If only five minutes were delayed ... then four or five people would have fallen! | फक्त पाच मिनिटांचा उशीर झाला असता ...तर चार-पाच जणांचे मुडदे पडले असते !

फक्त पाच मिनिटांचा उशीर झाला असता ...तर चार-पाच जणांचे मुडदे पडले असते !

googlenewsNext
ठळक मुद्देसोमवारी रात्री अचानक वादळ वारा व पावसाला सुरुवात झालीमुलांसह पाच जण घरात टी.व्ही. पाहत बसले होतेभास्कर कुटुंबीयातील तीन भाऊ सध्या पंजाब तालमीजवळील बक्षी गल्ली येथील वाड्यात राहतात

संताजी शिंदे 

सोलापूर : सोमवारी रात्री अचानक वादळ वारा व पावसाला सुरुवात झाली. मुलांसह पाच जण घरात टी.व्ही. पाहत बसले होते. म्हशीचं दूध काढून झाल्यानंतर मी मुलांना आतल्या खोलीत चहा पिण्यासाठी जाण्यास सांगितलं. सर्व जण देवघरात चहा पिण्यास गेले आणि अवघ्या पाच मिनिटांत घराची भिंत कोसळली. पाच मिनिटांचा उशीर झाला असता तर सर्वांचे मुडदे पडले असते, असे सांगत धोंडिबा भास्कर यांनी डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

भास्कर कुटुंबीयातील तीन भाऊ सध्या पंजाब तालमीजवळील बक्षी गल्ली येथील वाड्यात राहतात. एक घर गेल्या वर्षी पावसाळ्यात पडल्याने अशोक बाळू भास्कर (वय ६०) हे समोरच्या घरात भाड्याने राहतात. ८० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला वाडा जुना झाला आहे. माती, विटा आणि दगडाने बांधलेले घर मोडकळीस आले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने सर्वांना घर बांधणे शक्य नाही. आहे त्या परिस्थितीत ही मंडळी दिवस काढत आहेत.

सोमवारी रात्री ९.३० वाजता धोंडिबा भास्कर यांनी आपल्या म्हशीचे दूध काढले. दूध काढल्यानंतर सर्व कुटुंबीय एकत्र बसून चहा पित असतात. समोरच्या खोलीत टी.व्ही. बघत बसलेल्या मुलांना व महिलांना त्यांनी देवघरात चहा पिण्यासाठी जाण्यास सांगितले. आजी गिरजाबाई, महिला वैशाली व सुवर्णा, मुलगा अभिषेक, समर्थ देवघरात गेले. 

मुली व महिला देवघरात जाऊन बसले तेवढ्यात घराच्या भिंतीची माती पडू लागली. काय होतंय हे लक्षात येण्याच्या अगोदर अचानक दगड, विटा आणि सिमेंटचा काही भाग असलेली भिंत कोसळली. देवघराचा दरवाजा पूर्ण बंद झाला, हा प्रकार डोळ्यांनी पाहणाºया धोंडिबा यांनी ‘ए अभिषेक... ए समर्थ...’ अशी ओरड करू लागले. भेदरलेल्या लोकांनी थोडावेळ आतून आवाज दिला नाही, त्यामुळे घाबरलेल्या धोंडिबांनी आरडाओरडा सुरू केला. तेव्हा आतील मुलांनी आणि महिलांनी आतून आवाज दिला, आम्ही सुखरूप आहोत काळजी करू नका, असे सांगितले. धोंडिबा यांचा जीव भांड्यात पडला.  आवाज ऐकून शेजारचे लोक धावून आले, त्यांनी पडलेल्या भिंतीचे तुकडे व पत्रे बाजूला सारून कसरत करीत एकेकाला बाहेर काढले. दरम्यान, अग्निशामक दलाची गाडी आली. जवानांनी दरवाज्यासमोर पडलेले मोठे दगड व पत्रे बाजूला काढले. मात्र भास्कर कुटुंबीयांच्या भिंत कोसळलेल्या घरातील टीव्ही, गॅस, संसारोपयोगी वस्तू सर्व दगड, माती आणि सिमेंटच्या भिंतीखाली नष्ट झाल्या. 

गेल्या वर्षीही झाला होता घात...
- गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात असाच वादळ वारा सुटला होता. सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास भास्कर यांच्या वाड्यातील भिंत व एक माळा कोसळला होता. धोंडिबा भास्कर यांची पत्नी सुवर्णा यांच्या डोक्यात दगड पडून त्या जखमी झाल्या होत्या. यंदाच्या वर्षी याच वाड्यात ही दुसरी घटना घडली असून, सुदैवाने कोणाला दुखापत झाली नाही. 

गेल्या वर्षीची घटना घडल्यानंतर आम्ही घाबरलो होतो, आमची आर्थिक स्थिती खूप नाजूक आहे. ८० वर्षांच्या आईचा दवाखाना आमच्या पाठीमागे असल्याने आम्ही वाड्यात काही करू शकत नाही. हा धोकादायक वाडा पाडण्यात यावा, असा अर्ज महानगरपालिकेला दिला होता. आजतागायत याची दखल घेतली गेली नाही. यावर्षी पुन्हा तोच प्रकार घडला.
- धोंडिबा भास्कर, रहिवासी

Web Title: If only five minutes were delayed ... then four or five people would have fallen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.