‘मधुमती’ कसा बनला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:55 AM2019-01-07T10:55:48+5:302019-01-07T10:56:57+5:30

मागील सप्टेंबर महिन्यात मधुमती हा चित्रपट रिलीज होऊन ६० वर्षे झाली. १२ सप्टेंबर १९५८ रोजी हा रिलीज झाला. पुण्यात ...

How did 'Madhumati' become ... | ‘मधुमती’ कसा बनला...

‘मधुमती’ कसा बनला...

Next
ठळक मुद्देमागील सप्टेंबर महिन्यात मधुमती हा चित्रपट रिलीज होऊन ६० वर्षे झालीपुण्यात वसंत टॉकीजमध्ये हा चित्रपट लागला होतामधुमती हा चित्रपट विमल रॉय यांची निर्मिती होती

मागील सप्टेंबर महिन्यात मधुमती हा चित्रपट रिलीज होऊन ६० वर्षे झाली. १२ सप्टेंबर १९५८ रोजी हा रिलीज झाला. पुण्यात वसंत टॉकीजमध्ये हा चित्रपट लागला होता. तेव्हा मी पुण्यात शिकत होतो. आमच्या होस्टेलमध्ये एक पेपर येत असे. त्यात पाहून मधुमती हा चित्रपट वसंत टॉकीजला लागल्याचे समजले.

आमचा एचएनडी होस्टेलचा दहा-बारा जणांचा ग्रुप चित्रपट वेडा होता. मग काय आम्ही पहिल्याच रविवारी तो चित्रपट पाहिला. हे सगळे आठवायचे कारण परवा मी नेटवर सर्च केले असताना मधुमतीची सर्व कथा तो चित्रपट कसा बनला हा प्लॉट मला खूप आवडला.  मधुमती हा चित्रपट विमल रॉय यांची निर्मिती होती.

याआधी १९५५ साली देवदास हा त्यांचा चित्रपट रिलीज झाला होता. पण बॉक्स आॅफिसवर तो सपशेल आपटला. त्यामुळे विमलदांना एक यशस्वी व हिट चित्रपटाची गरज होती. त्यांचे मित्र ऋत्विक घटक यांनी विमलदांना एक कथा सुचविली. त्यांना ती खूप आवडली. त्यांनी असिस्टंट डायरेक्टर देबू-सेन, कथा लेखक राजेंद्र सिंग बेदी, कंपोजर मनोहारी सिंग या सर्वांनी एकत्र बसून चर्चा केली व मधुमतीवर एक उत्तम संगीत व नृत्यमय चित्रपट बनविण्याचे ठरविले.

आता कलाकारांचा विचार सुरू झाला आणि दिलीपकुमार व मधुमतीच्या भूमिकेसाठी वैजयंतीमाला यांची नावे पक्की झाली. दोघांनी त्या भूमिकेला पसंती पण दिली. खलनायकाच्या भूमिकेसाठी (राजा अग्रसेन) प्राण तर नायकाचा सेवक चरणदाससाठी जॉनी वॉकर व नायिकेच्या वडिलांच्या रोलसाठी जयंत (अमजदखानचे वडील) ही स्टार कास्ट ठरली. 

कथेत धुक्याच्या सिनचा शॉट महत्त्वाचा होता. त्यासाठी राणीखेत योग्य स्थान होते. तेथे नेहमी धुके असे. तसेच मुंबईजवळ वैतरणा डॅम, आरे मिल्क कॉलनी येथे वातावरण कथेला पोषक होते. पण मुख्यत्वे चित्रपटाचे अधिकतर शूटिंग आऊटडोअरच होते म्हणून ही स्थाने नक्की करण्यात आली. ही कथा पुनर्जन्मावर आधारित होती. चित्रपटाचे संगीत एस. डी. बर्मन यांनी द्यावे अशी विमलदांची खूप इच्छा असूनही त्यांना तो चित्रपट करण्यास वेळ नव्हता.

विमलदांच्या या आधीच्या देवदास या चित्रपटास त्यांचेच संगीत होते. त्यातील गाणी अतिशय उत्तम गाजली. सचिनदाने त्यांचे असिस्टंट सलील चौधरी यांचे नाव सुचविले आणि त्यांनी संधीचे सोने केले. हे मधुमतीची गाणी ऐकून आपण जाणतोच. राणीखेत येथे १५ दिवसांचे शूटिंग आटोपून टिम महाराष्टÑात नाशिकजवळ इगतपुरी येथे आली तेथे वैतरणा डॅमजवळ शूटिंग झाले. नंतर मुंबईत झाले. चित्रपटाचे शुटींग आऊटडोर जास्ती होते. 

मधुमतीची कथा सर्वांनाच माहिती आहे. नायक देवेंद्रकुमार हा पत्नीला आणण्यासाठी निघाला आहे. रात्री  पावसामुळे तो हवेलीत थांबतो. त्या ठिकाणी लोक त्याला बेदम मारतात. त्यात त्याची स्मृती नष्ट होते.   तो इकडे-तिकडे भटकत राहतो. भटकत असताना त्याला हुबेहूब मधुसारखी दिसणारी एक स्त्री दिसते. ती असते शहरातील एक तरुणी माधवी (वैजयंतीमाला) तिचे मित्र आनंदला हाकलून देतात. पण नायक तिचा पिच्छा सोडत नाही तिला सर्व कथा सांगतो. अचानक माधवीला मधुमतीचे तैलचित्र दिसते. तिला नायकाचे म्हणणे पटते. दोघे मिळून कट रचतात. माधवी हुबेहूब मधुमतीसारखा ड्रेस घालून उग्रसेनच्या हवेलीत जाते तो दचकतो. तो तिच्या समोर मधुचा खून केल्याचे कबूल करतो माधवी गच्चीवर जाते तिच्या मागोमाग खलनायक पण धावत जातो अचानक एक किंकाळी हवेलीत घुमते. 

सीन चेंज, आनंद हवेलीच्या बाहेर येतो तर समोर मधुमती (माधवी) हजर असते. ‘ती म्हणते माफ कर मला यायला उशीर झाला. माझी गाडी रस्त्यात बिघडली होती. आनंदला जाणवते आता येऊन गेले ते मधुमतीचे भूत होते. मधुमती कशी गेली ती सविस्तर सांगते. मागोमाग दिलीपकुमार गच्चीवरून खाली पडतो.

सीन चेंज, देवेंद्र (दिलीपकुमार) हवेलीतून बाहेर येतो. त्याला समजते पत्नी येणाºया गाडीचा अपघात झाला आहे. तो धावत-पळत स्टेशनवर जातो. स्टेशनवर प्लॅटफॉर्म वर गाडी उभी असते आणि गाडीतून त्याची पत्नी राधा (तिसरी वैजयंतीमाला) खाली उतरते दोघे एकमेकांना भेटतात. दी एंड. यातील गाणी अतिशय कर्णमधूर होती. विशेषत: लता मंगेशकरचे आजा रे परदेशी हे गाणे अतिशय श्रवणीय होते.  मधुमती चित्रपट रिलीज झाल्यानंतर चमत्कार झाला तो बॉक्स आॅफिसवर यशस्वी झाला. चित्रपटाच्या बजेटपुढे (८० लाख) चित्रपटाने ५ कोटी गल्ला गोळा केला आणि विमलदाचे भाग्य उजळले. मधुमतीला तब्बल ९ फिल्म फेअर अ‍ॅवॉर्ड मिळाले. 
-डॉ. अरविंद बोपलकर
(लेखक  सिनेमाचे अभ्यासक आहेत)

Web Title: How did 'Madhumati' become ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.