सोलापूर शहर-ग्रामीण पोलिस दलात आलिशान गाड्यांचा ताफा दाखल

By संताजी शिंदे | Published: April 24, 2023 05:57 PM2023-04-24T17:57:54+5:302023-04-24T17:58:54+5:30

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : पोलिस प्रशासन अधिक गतिमान होईल

fleet of luxurious cars entered the solapur city rural police force | सोलापूर शहर-ग्रामीण पोलिस दलात आलिशान गाड्यांचा ताफा दाखल

सोलापूर शहर-ग्रामीण पोलिस दलात आलिशान गाड्यांचा ताफा दाखल

googlenewsNext

संताजी शिंदे, सोलापूर : पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याच पार्श्वभूमिवर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलिस आयुक्तालय तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयास चारचाकी व दुचाकी वाहने उपलब्ध झाल्याने जिल्हा पोलिस दल अधिक गतिमान होईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.

सोलापूर जिल्हा पोलीस दलास (शहरी व ग्रामीण) जिल्हा विकास यंत्रणेच्या निधीतून प्राप्त झालेल्या २० वाहनांच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. जिल्हा नियोजन भवनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, राजेंद्र राऊत, रणजीतसिंह मोहिते - पाटील, महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, निवासी उपजल्हाधिकारी शमा पवार, पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे आदि उपस्थित होते.

जिल्हा विकास यंत्रणेच्या माध्यमातून शहर पोलीस आयुक्त कार्यालयासाठी ९ चारचाकी व ४ दुचाकी तसेच ग्रामीण पोलीस दलास १२ चारचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. त्यांचे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संपूर्ण पोलीस दल हे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्परतेने कार्य करत असते. पोलीस दलाच्या अधिक क्रियाशीलतेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलास वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पोलिसांना गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी तसेच नागरिकांना तात्काळ सेवा देण्यासाठी, दुर्घटनास्थळी तात्काळ पोहोचण्यासाठी या वाहनांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे पोलीस दल अधिक गतीमान होणार आहे. तसेच यापुढेही पोलीस दलाच्या बळकटी करण्यासाठी अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही विखे-पाटील यांनी दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: fleet of luxurious cars entered the solapur city rural police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.