स्वप्न अन् वास्तव...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 02:57 PM2019-05-03T14:57:55+5:302019-05-03T14:58:03+5:30

स्वप्नं पाहणं गैर नाही. पण ती साकार करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष ठाऊक नसणं गैर आहे.

Dream and reality ...! | स्वप्न अन् वास्तव...!

स्वप्न अन् वास्तव...!

Next

एकदा काही कामानिमित्त महाविद्यालयात जाण्याचा योग आला. महाविद्यालयीन तरुणांची भेट झाली. संवाद झाला. मी सहज एकाला विचारलं, ‘कॉलेज संपल्यानंतर काय करणार आहेस पुढे ? ‘माझ्या  प्रश्नाने तो तरुण फारच उल्हासित झाला. ‘ खरं सांगू सर, तुम्हाला म्हणून सांगतो. आपल्याला हे असलं नोकरी वगैरे काही करायचं नाही. मला एक सिनेमा करायचाय. सैराटसारखा. एकच चित्रपट करायचा आणि कोट्यधीश नो झंझट, एक भन्नाट स्टोरी आहे माझ्या डोक्यात.. ‘मला ते बोलणं फारच स्वप्नाळू वाटलं. मी विचारलं, ‘चित्रपट क्षेत्रातला काही अनुभव आहे का तुला?’ यावर तो तरुण सहजपणे उद्गारला, ‘अनुभब कशाला लागतोय? सगळं माझ्या डोक्यात फिट आहे सर.’ मी म्हटलं, ‘मित्रा, कुठलंही यश इतक्या सहज मिळत नसतं.

तू अगोदर यशस्वी माणसांची चरित्रे वाच, त्यांनी किती प्रचंड संघर्ष केला हे तुला कळेल.’  माझा सल्ला बहुधा त्या तरुणाला पटला नसावा. त्याच्या चेहºयावरून जाणवलं. मी हस्तांदोलन करून काढता पाय घेतला. आजकाल अशी बिनबुडाची स्वप्नं उराशी बाळगणारी खूप मुलं दिसतात. स्वप्नं पाहणं गैर नाही. पण ती साकार करण्यासाठी करावा लागणारा संघर्ष ठाऊक नसणं गैर आहे. आपणाला अमूक ठिकाणी पोहोचायचं आहे. याचे केवळ भान असणं गरजेचं नाही. तो तिथंपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि त्यासाठी कराव्या लागणाºया संघर्षाची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. कुठल्याही प्रयत्नाशिवाय आपण तिथं सहजपणे पोहोचू असा फाजील आत्मविश्वास काहीच कामाचा नाही. ही एकप्रकारे स्वत:ची फसवणूक आहे.

मला आठवतं, सोलापुरात शिक्षण घेत असताना वक्ता बनण्याचं फॅड माझ्या डोक्यात होतं. डॉ. निर्मलकुमार फडकुले, विवेक घळसासी यांच्यासारख्या वक्त्यांची भाषणे ऐकल्यानंतर मलाही वाटायचं की आपणही अशा सभा गाजवायला हव्यात. मग मी व माझा एक मित्र वक्तृत्व स्पर्धेला जाऊ लागलो. एकदा एका राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आम्ही एक स्क्रिप्ट तयार केली व मार्गदर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध विचारवंत डॉ. फक्रूद्दीन  बेन्नूर सरांच्या घरी गेलो. सरांनी स्किप्ट वाचली व आमची जोरदार कानउघडणी केली. वक्ता होणं म्हणजे केवळ शब्दांची जुळवाजुळव करणं नव्हे. चांगलं बोलायचं असेल तर तशी साधना हवी, वाचन हवं. निरीक्षण हवं. आकलन हवं. मांडणी स्वत:ची असायला हवी. अशा अनेक बहुमोल टिप्स सरांनी दिल्या. आम्ही भानावर आलो. जाणवलं की, ही एक दीर्घ साधना आहे.

स्वप्नाला प्रयत्नांची डूब नसेल तर ते दिवास्वप्न बनतं. खरं तर तरुणांनी स्वप्नं जरूर पहावीत. डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम तर नेहमी सांगायचे की, मोठी स्वप्ने पाहा. पण स्वप्नं पाहताना वास्तवाची जाणीवही हवी. आपण जे स्वप्न पाहतोय, ते साध्य होण्यासाठी आपणाला काय करायला हवं याचं नियोजन हवं. रोड मॅप हवा. त्या दिशेने अविरत प्रयत्न हवेत. आज अनेक तरुण स्पर्धा परीक्षेची स्वप्ने पाहतात. पण अभ्यासाकडे मात्र पाठ फिरवतात. दरवेळेस जाहिरात आली की फॉर्म भरण्याचा अतोनात उत्साह आणि परीक्षेच्या दिवशी तयारी झाली नसल्याने सरळ दांडी. अशाने काहीच साध्य होत नाही. आपण फक्त स्वत:ला फसवत राहतो. 

प्रयत्नामध्ये एक आनंद असतो. फळ हे मिळतंच असतं. पण त्याचाच अधिक विचार करु नये. शेतकरी कसा दरवर्षी नव्या उमेदीने पेरत राहतो. पुढे पाऊस पडेल की दुष्काळ त्याला ठावूक नसतं. पण तो पेरणं सोडत नाही. तो पेरण्यातला आनंद उपभोगत राहतो. अशा निरपेक्ष आनंदालाच पुढे फलप्राप्तीचे धुमारे फुटत असतात. तसा आपण स्वप्नांचा पाठलाग करत रहावा. स्वप्न आवाक्यातलं असावं आणि ते कवेत घेण्यासाठी आपण आकांताने धावत सुटावं. पाय रक्तबंबाळ होतील. तहानभूक हरपेल. एक क्षण असे वाटेल की, ‘ये अपने बस की बात नही’. पण तरीही न डगमगता ‘करा किंवा मरा’ च्या भूमिकेतून आपण संघर्ष करावा आणि मग निश्चितपणे एक क्षण आपला येतोच. स्वप्नपूर्तीचा. ध्येयप्राप्तीचा. आपल्याही नकळत आपण एका उंचीवर पोहोचलेलो असतो. झालेल्या जखमांवर केव्हाच कर्तृत्वाची खपली धरलेली असते. आपले आप्त आपल्याकडे कौतुकाने पाहत असतात. एकेकाळचं आपलं स्वप्न सत्य होऊन आपल्या गळ्यात विजयमालेसारखं विराजमान झालेलं असतं. हा एक सार्थकतेचा क्षण असतो. तो गाठायचा असेल तर आतापासूनच सुरुवात करायला हवी. तेव्हा मित्रांनो... गो अहेड...!!
- डॉ. प्रेमनाथ रामदासी
(लेखक हे शिक्षक आहेत.)

Web Title: Dream and reality ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.