थेट गाणगापुरातून; दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 01:14 PM2018-12-22T13:14:12+5:302018-12-22T13:20:57+5:30

नृसिंह सरस्वतींची साधनाभूमी : निर्गुण मठ, संगम, भस्माच्या डोंगरी भाविकांची दर्शनासाठी गर्दी

Directly from Songbang; Dutt Dutt has started such meditation, he has lost his mind! | थेट गाणगापुरातून; दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन!

थेट गाणगापुरातून; दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन!

Next
ठळक मुद्देगाणगापूर येथील निर्गुण मठात आज दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरादत्त जयंतीसाठी विविध राज्यातून सुमारे चाळीस हजार भाविक औदुंबर वृक्षाखालील ‘गणेश’ मूर्तीचे दर्शन केल्यानंतर अनेक भाविकांचे भरदुपारीही मंदिराकडे प्रस्थान

रवींद्र देशमुख 

गाणगापूर : श्री क्षेत्र गाणगापूरचे स्थान महात्म्यच मोठे अलौकिक आहे. दत्त महाराजांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती यांची ही साधनाभूमी असल्याने या नगरीत सर्वत्र सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते... निर्गुण मठ अर्थात दत्तमंदिर असो की संगम वा तेथील अन्य स्थळे, भक्तगण कुठेही गेले की, ‘दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन’ अशी त्यांची एकाग्र स्थिती होते.
कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरील नरसोबाची वाडी येथे एक तप वास्तव्य केल्यानंतर श्री नृसिंह सरस्वती महाराज भीमा-अमरजा संगमस्थळी अर्थात गाणगापुरी आले अन् संगमावर साधना केली. बावीस वर्षे तेथे तपस्या केल्यानंतर निर्गुण मठात आपल्या निर्गुण पादुका ठेवून ते निजानंद झाले... मंदिराचे मुख्य पुजारी प्रसन्न नागेश भट पुजारी सांगत होते.

निर्गुण मठात दुपारी साडेबाराची आरती झाल्यानंतर पुजारी मंडळी मठाच्या पायºयांवर बसली होती. प्रसन्न पुजारी श्री नृसिंह सरस्वतींची आख्यायिका सांगत असताना अन्य पुजारी अगदी आपण हे सारं नव्यानेच ऐकतोय, या भावनेने कानात प्राण आणून महाराजांची कीर्ती श्रवण करीत होते... नृसिंह सरस्वती जेव्हा या मंदिर परिसरात आले तेव्हा त्यांच्या दृष्टीस निर्गुण पादुकांसमोरील पिंपळाचे भव्य झाड दिसले... पुजारी यांनी सांगितले की, या झाडामध्ये एक ब्रह्मराक्षस राहत होता. महाराजांनी त्याला तेथून जाण्यास सांगितले अन् त्याचा उद्धार केला.

श्री दत्तमंदिर म्हणजेच निर्गुण मठातील महाराजांच्या पादुकांचे दर्शन एका छोट्या खिडकीतून घ्यावे लागते. या पादुकांना केशर, कस्तुरी, गंध, सुवासिक अत्तरांचे लेपन केलेले असते. दुपारच्या आरतीनंतर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती. दर्शनानंतर भक्तगण माधुकरी अर्थात भीक्षा मागण्यासाठी मंदिराशेजारील गल्ल्यांमध्ये मोठ्या लगबगीने जात होते.

गाणगापुरात भीक्षा का मागितली जाते...? असा प्रश्न प्रसन्न पुजारी यांना विचारला. ते म्हणाले, गाणगापुरात कोणाच्या ना कोणाच्या रूपात श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वावर असतो. त्यामुळे कुणी इथे भीक्षा मागितली तर श्री महाराजच आहेत, या भावनेने भीक्षा दिली जाते आणि ‘श्रीं’चा प्रसाद मिळावा म्हणून भाविक माधुकरी मागतात. मंदिर परिसरात राहणारी पुजारी मंडळी आरती झाल्यानंतर आपल्या घरासमोर भीक्षा वाढण्यास बसतात. शिवाय देवस्थानकडूनही भीक्षा वाढली जात आहे.

आरती झाल्यानंतर भीक्षा मागण्यासाठी भाविकांची रांग लागली होती. तत्पूर्वी मंदिराच्या महाद्वाराबाहेर विक्रेत्यांकडून बदामाच्या पानांनी तयार केलेल्या पत्रावळी खरेदी करूनच भाविक भीक्षेच्या रांगेत उभे होते. भीक्षा मिळाल्यानंतर मंदिरात येऊनच ती ग्रहण केली जात होती.

गाणगापुरात संगम स्नानाला अतिशय महत्त्व आहे. तेथे स्नान करून भाविक दर्शनाला जातात. तत्पूर्वी संगमाजवळील औदुंबर वृक्षाखालील ‘गणेश’ मूर्तीचे दर्शन केल्यानंतर अनेक भाविकांचे भरदुपारीही मंदिराकडे प्रस्थान ठेवणे सुरू होते.

जयंती सोहळा भक्तीभावाने साजरा
- गाणगापूर येथील निर्गुण मठात आज दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा झाला. दत्त जयंतीसाठी विविध राज्यातून सुमारे चाळीस हजार भाविक आले होते. मंदिरात पहाटे २.३० वाजता  काकड आरती झाली. त्यानंतर निर्गुण पादुकांना केशरलेपन महापूजा, महाआरती झाली सकाळी ७ वा. पंचामृत, तीर्थप्रसाद वाटप, दुपारी १२ वा. महामंगलारती आणि पाळण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिरामध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी पाळणा गाऊन ‘श्री’ची आराधना केली. सायंकाळी पालखी सोहळा झाला. यावेळीही भाविकांची संख्या लक्षणीय होती.

Web Title: Directly from Songbang; Dutt Dutt has started such meditation, he has lost his mind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.