दिल्लीतील हॉटेलमधील अग्निकांड; सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 12:02 PM2019-02-14T12:02:40+5:302019-02-14T12:05:38+5:30

अशोक कांबळे/शंकर हिरतोट  मोहोळ/अक्क्कलकोट : दिल्लीतील हॉटेलमधील अग्निकांडात मरण पावलेले दोघे कुटुंबप्रमुख असल्याने कोरवली आणि रुद्देवाडीवर शोककळा पसरली आहे. ...

Delhi hotel fire; Death of both of them in Solapur district | दिल्लीतील हॉटेलमधील अग्निकांड; सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

दिल्लीतील हॉटेलमधील अग्निकांड; सोलापूर जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे रुद्देवाडी येथील राहुल शिवपुत्र शाखापुरे आणि  मोहोळ तालुक्यातील संतोष महादेव वाले यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणारमरण पावलेले दोघे कुटुंबप्रमुख असल्याने कोरवली आणि रुद्देवाडीवर शोककळा पसरली

अशोक कांबळे/शंकर हिरतोट 

मोहोळ/अक्क्कलकोट : दिल्लीतील हॉटेलमधील अग्निकांडात मरण पावलेले दोघे कुटुंबप्रमुख असल्याने कोरवली आणि रुद्देवाडीवर शोककळा पसरली आहे. रुद्देवाडी येथील राहुल शिवपुत्र शाखापुरे आणि  मोहोळ तालुक्यातील संतोष महादेव वाले यांच्यावर गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार होणार आहे. 

अक्कलकोट तालुक्यातील रुद्देवाडी येथील रहिवासी असलेले राहुल शिवपुत्र शाखापुरे यांचे वय अवघे ३९ वर्षांचे होते. दुधनी येथील एस.जी. परमशेट्टी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक शिवपुत्र शाखापुरे यांचे ते ज्येष्ठ सुपुत्र होते. त्यांचे पार्थिव उद्या गुरुवारी पोहोचत असून, त्यानंतर सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
राहुल शाखापुरे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण दुधनीतील एस. जी. परमशेट्टी हायस्कूलमध्ये झाले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ते शासकीय परीक्षेत उत्तीर्ण झाले व केंद्र सरकारच्या ड्रग्ज इन्स्पेक्टर या पदावर त्यांची निवड झाली होती. शासकीय सेवाकाळात त्यांनी विदेशातही भारताचे प्रतिनिधीत्व करून ड्रग्जच्या क्षेत्रात देशाची भूमिका प्रभावीपणे मांडली होती. राहुल शाखापुरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. 

कोरवली येथील रहिवासी असलेले संतोष महादेव वाले (वय ४२) एका औषध कंपनीत कन्सलटंट म्हणून कार्यरत होते. कामानिमित्त सोलापुरातील आपल्या एका मित्रासह दिल्लीला गेले असता १२ तारखेला त्यांचा हॉटेल अर्पिता येथे मुक्काम होता. मात्र या हॉटेलला लागलेल्या आगीत त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत त्या दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबीयांना टीव्हीवरील बातम्यांमधून कळली. ही दु:खद बातमी कळताच घरात एकच हल्लकल्लोळ उडाला.

संतोष यांचे लहान भाऊ राजकुमार वाले हे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दिल्लीला रवाना झाले असून, १३ रोजी रात्री बारा वाजेपर्यंत संतोष यांचा मृतदेह पुण्यात येईल. त्यानंतर कोरवली येथे पहाटे पोहोचल्यानंतर सकाळी अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे त्यांचे बंधू अनिल वाले यांनी सांगितले. संतोष यांच्या पश्चात वडील महादेव वाले, पत्नी  सुनंदा,  तेरा वर्षांचा मुलगा आदित्य, नऊ वर्षांची मुलगी स्नेहा असा   परिवार आहे.

मित्रांशी ठरली शेवटची भेट
- या दुर्घटनेमध्ये दोन्ही कुटुंबांतील कर्ते पुरूष नियतीने हिरावले आहेत. राहुल शाखापुरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविले होते. त्यांच्या मुलीचे वय अवघे चार वर्षांचे आहे.  आपल्या वर्गमित्रांशी त्यांची ही शेवटचीच भेट ठरली. तर संतोष वाले यांनी औषध व्यवसायात बरीच मोठी मजल मारली होती. वाले यांचा मृतदेह मुंबईपर्यंत विमानाने नेता येणार होता. मात्र त्यांचे भाचे ॠषिकेश मैंदर्गीकर यांनी शिवसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला. केंद्र सरकारचे प्रथम वर्ग अधिकारी असल्याने शिंदे यांनी विमानतळ अधिकाºयांशी चर्चा करून ‘एअर अ‍ॅम्ब्यूलन्स’ पुण्यापर्यंत नेण्यास परवानगी देण्यात आली. 

Web Title: Delhi hotel fire; Death of both of them in Solapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.