पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 02:42 PM2018-12-24T14:42:32+5:302018-12-24T14:45:52+5:30

चंद्रभागा वाळवंटाची केली स्वच्छता :  स्वच्छता ठेकेदाराला सुनावले खडेबोल

A cleanliness campaign implemented by environmental ministers in Pandharpur | पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम

पर्यावरण मंत्र्यांनी हातात खराटा घेऊन पंढरपुरात राबविली स्वच्छता मोहीम

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी चंद्रभागेची आरती होणारचंद्रभागा पात्र व वाळवंटातील अवघ्या काही तासातच १२ टन कचरा उचललाचंद्रभागा वाळवंटात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेचे शेकडो स्वयंसेवक

पंढरपूर : महाराष्ट्र राज्य पर्यावरण विभागाच्या वतीने पंढरपुरातील चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता मोहीम सोमवारी राबविली. यावेळी स्वत: पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सकाळी १० वाजता स्वच्छता मोहिमेत हातात खराटा घेऊन सहभागी झाले़. त्यांच्यासोबत श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य  ह़ भ़ प़ ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ह़ भ़ प़ ज्ञानेश्वर महाराज जोगदंड, व्यवस्थापक बालाजी पदलवाड, मुख्याधिकारी अभिजित बापट, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ आवताडे, सिद्धनाथ कोरे, शरद वाघमारे, राहुल गावडे, रमेश गोडसे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले़.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून चंद्रभागेच्या वाळवंट व प्रदक्षणा मार्गावरील स्वच्छतेचा ठेका पावणे दोन कोटी रुपयांना देण्यात आलेल्या आहे़ मात्र ठेकेदाराकडून योग्य काम होत नसल्याने पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी संबंधित ठेकेदाराला खडे बोल सुनावले.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी चंद्रभागेची आरती होणार आहे़ त्यापार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दोन दिवसापूर्वीच चंद्रभागेची पाहणी केली़ यावेळी त्यांना चंद्रभागा वाळवंटामध्ये घाणीचे साम्राज्य आढळून आले. त्यानंतर त्यांनी महासभेच्या दिवशी सकाळी १० च्या सुमारास चंद्रभागेत स्वच्छता मोहीम राबविण्याचे ठरविले़  त्यानुसार आज ही मोहीम राबविली़  यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी, मंदिर समितीचे कर्मचारी, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते.

चंद्रभागेत नागरिकांनी व भाविकांनी विविध विधीनंतर विसर्जित केलेले कपडे, विविध देवी-देवतांचे फोटो, हार व अन्य निर्माल्य चंद्रभागा नदी पात्रासह वाळवंटात ठिकठिकाणी पडले होते. मंत्री रामदास कदम यांनी चंद्रभागा वाळवंटातील कचरा उचलण्यास सुरुवात केली़ या स्वच्छता मोहिम दरम्यान कचरा उचलून चंद्रभागा नदी वाळवंट स्वच्छ करण्यात आले. यावेळी मंदिर समितीचे ठेकेदारास रामदास कदम यांनी चंद्रभागा वाळवंटाची स्वच्छता व्यवस्थित करा, स्वच्छता करण्याची तुमची जबाबदारी आहे, अशा सूचना केल्या.

१२ टन उचलला कचरा 
चंद्रभागा वाळवंटात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेचे शेकडो स्वयंसेवक, नगरपरिषदेचे १५० कर्मचारी मंदिर समितीचे बीसीए स्वच्छता ठेकेदार, बीसीए कंपनीचे १५० कर्मचारी यांनी १ जेसीबी, ४ ट्रॅक्टर, २ कंटेनर त्यांच्या साह्याने चंद्रभागा पात्र व वाळवंटातील अवघ्या काही तासातच १२ टन कचरा उचलला आहे.

वाळू चोरी थांबवण्यासाठी करणार प्रयत्न
चंद्रभागा नदी पात्रातून अनेक छोटे मोठे दादा गाढवाच्या साह्याने व होडीच्या साह्याने वाळू चोरी करतात. चंद्रभागा वाळवंटात खड्डे पडतात. चंद्रभागा नदीपात्रात पाणी आल्यानंतर भाविकांना त्याचा अंदाज येत नाही व खड्ड्यात पडून भाविकांचा मृत्यू होतो. चंद्रभागा नदी पात्रात विविध कारखान्याचे मळी मिश्रित पाणी सोडण्यात येते. यामुळे भाविकांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. अशा तक्रारी सिद्धनाथ कोरे, महेश मोठे यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे केल्या. यापुढे चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.

Web Title: A cleanliness campaign implemented by environmental ministers in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.