ब्रेक दाबल्यानं ट्रॉली पलटी होऊन नऊ प्रवासी जखमी, एकाचा मृत्यू
By विलास जळकोटकर | Published: January 24, 2024 04:47 PM2024-01-24T16:47:43+5:302024-01-24T16:48:26+5:30
अनगरच्या कारखान्याजवळ अपघात, दुचाकीस्वारास वाचवण्यासाठी ब्रेक दाबला.
विलास जळकोटकर,सोलापूर : समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ट्रॅक्टरचालकाने ब्रेक दाबल्याने ट्रॉली पलटी होऊन दहा प्रवासी जखमी झाले. अनगरजवळील लोकनेते साखर कारखान्याजवळ हा अपघात झाला. यातील एकाचा बुधवारी पहाटे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. लालदेव ननवरे (वय- ५०) असे त्याचे नाव आहे.
अशोक झोंबाडे (वय- ३५), सीमा अशोक झोंबाडे (वय- ४०, दोघे रा. घारेेपुरी ता. बार्शी), देवीदास शिंदे (वय- २०), पांडुरंग नरगुडे (वय- ५०), सविता काळोबा जाधव (वय- ५०), तनुजा अशोक झोंबाडे (वय- १७), आशा देवीदास शिंगारे (वय- ६०),अश्विनी अशोक झो;बाडे (वय- १२) अशी जखमींची नावे आहेत.
यातील ट्रॅक्टर मंगळवारी रात्री मोहोळहून अनगर येथील लोकनेते साखर कारखान्याकडे निघाला होता, रिकाम्या ट्रॉलीमध्ये दहा प्रवासी बसलेले होते. अनगर साखर कारखान्याच्या ५०० मीटर अंतरावर समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे ट्रॉली पलटी झाली. आतील सर्व प्रवासी जखमी झाले.
जखमींना मोहोळच्या सरकारी दवाखान्यात नेऊन प्राथमिक उपचार करण्यात आले. तेथून सर्वांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे रात्री पावणेअकराच्या सुमारास दाखल करण्यात आले. यामध्ये लालदेव ननवरे याचा पहाटे २ च्या सुमारास डोक्यास गंभीर मार लागल्याने मृत्यू झा्ल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य जखमींवर उपचार सुरु आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद आहे.