'जय हो केबीसी' म्हणत बिगबींनाही हसवणाऱ्या निरागस गृहिणीचा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 12:18 PM2023-12-04T12:18:50+5:302023-12-04T12:28:27+5:30

Social Viral: 'केबीसीमध्ये खेळायला नाही तर फिरायला आलेय' अशी प्रांजळ कबुली देणाऱ्या या महिलेचा व्हिडीओ तुम्हालाही हसायला भाग पाडेल हे नक्की!

Have you seen the viral video of the innocent housewife who made even Big B laugh by saying 'Jai Ho KBC'? | 'जय हो केबीसी' म्हणत बिगबींनाही हसवणाऱ्या निरागस गृहिणीचा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

'जय हो केबीसी' म्हणत बिगबींनाही हसवणाऱ्या निरागस गृहिणीचा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का?

'पोटात एक आणि ओठात एक' अशी दुतोंडी मानवजात! निरागसपणा तर वयाच्या अमुक एक टप्प्यावर आपण गमावून बसतो आणि लहान मुलांना पाहून हरखून जातो. ती एवढी आनंदी असण्याचे गमक म्हणजे त्यांचा प्रांजळपणा! मोठ्यांमध्ये तो क्वचितच बघायला मिळतो. मात्र अलीकडेच व्हायरल झालेल्या केबीसीच्या एका महिला खेळाडूने तिच्यातल्या निरागसतेचे दर्शन घडवून अमिताभ बच्चन यांच्यासकट सोशल मीडियावर सगळ्यांचेच मन जिंकून घेतले आहे. तिच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या शोच्या पंधराव्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, ज्यामध्ये स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांच्या जीवन प्रवास, मजेदार स्वभाव आणि बुद्धिमत्तेमुळे प्रेक्षकांची मने जिंकतात. अशाच केबीसीच्या एका एपिसोडची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर समोर आली आहे, ज्यामध्ये अलोलिका नावाच्या स्पर्धिकेने महानायकाला खेळ सोडून गप्पा मारण्यासाठी भाग पाडले आहे. ती क्लिप पाहताना आपल्यालाही हसू अनावर होते. कारण सर्वसामान्य मध्यम वर्गीयांच्या भावना त्यांनी सहज व्यक्त केल्या आहेत आणि तिथे पोहोचल्याचा आनंद त्या गृहिणीच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. 

आलोलिका या पश्चिम बंगालची रहिवासी आहे. केबीसीमध्ये आल्यानंतर आईची इच्छा पूर्ण झाल्याचे त्याने शोदरम्यान सांगितले. यानंतर त्यांनी हॉटसीटवर बसण्याची सुरुवातच 'जय हो केबीसी' म्हणत केली. त्या म्हणाल्या की, 'माझी निवड होईल याची मला अजिबात खात्री नव्हती. तरी मी इथे खेळायला नाही तर फिरायला आले. पण केबीसीने मला शोमध्ये येण्याची संधी तर दिलीच, शिवाय विमान प्रवासाचाही सुखद अनुभव दिला!'

पहिल्या विमान प्रवासाचा अनुभव 

आलोलिकाने सांगितले की, 'माझ्यासाठी पहिल्या विमान प्रवासाचा अनुभव खूप सुखद होता.' यानंतर त्यांनी एअरलाइन्सची तुलना रेल्वे प्रवासाशी केली. हसत-खिदळत त्या म्हणाल्या, 'की आम्ही रेल्वेने प्रवास करणारी माणसे आहोत. ट्रेनमध्ये तुम्हाला तुमच्या वस्तू सोबत ठेवाव्या लागतात. ट्रेनमध्ये सीटखाली बॅग ठेवल्या जातात. यामुळे आम्ही पुन्हा पुन्हा तपासतो. रात्री उठल्यावरही आम्ही बॅग आहे की नाही हे तपासतो, पण विमानात असे नाही, ते जास्त पैसे घेतात पण आपले सामान तेच सांभाळतात.' अलोलिकाचे बोलणे ऐकून यजमानांसह प्रेक्षकही हसले.

हॉटेलचा अनुभव : 

अमिताभने आलोलिकाला हॉटेलमध्ये राहण्याचा अनुभव विचारला तेव्हा ती म्हणाली, 'अरे देवा, एवढं मोठं हॉटेल. 'जय हो केबीसी... मी धन्य झाले'. जे वैभव उपभोगण्यासाठी ना माझ्याकडे पैसे होते ना माझ्या नवऱ्याकडे!' हे ऐकून अमिताभ बच्चन यांनाही हसू अनावर झाले.' त्या बिग बी ना म्हणाल्या, 'हे केबीसी वाले कुठून कुठून प्रश्न शोधून आणतात? ते पाहून आपण केलेला अभ्यासही विसरतो! मी या खेळात निवडले जाणार नाही याची मला खात्री होती, म्हणून सगळे जण अभ्यास करत असताना मी मस्त भटकत होते, आनंद घेत होते!'

अमिताभ बच्चन यांनी अलोलिका यांना त्यांच्या निखळ हास्याबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, 'मी चांगल्या चांगल्या गोष्टी आठवून सतत हसत असते. हसणं तब्येतीसाठी चांगलं असतं. मी फास्ट फूड खात नाही. मी दिवसातून ३ वेळा डाळी, भात, भाजी आणि मासे खाते. लोक जिम लावून पैसे खर्च करतात आणि मी तीन वेळ जेवून सतत आनंदी राहूनही फिट राहते!' 

अशा अतरंगी स्वभावाच्या लोकांमुळेच समाजाचे वैशिष्ट्य टिकून आहे. सतत उदास, चिंतातुर, तणावग्रस्त बसून राहण्यापेक्षा अलोलिका यांच्यासारखे आनंदी राहणे केव्हाही चांगलेच, नाही का? सोबत जोडलेली क्लिप पहा आणि दोन क्षण तुम्हीही तुमचे दुःख विसरून या निरागसपणाचा मनमुराद आनंद घ्या!

Web Title: Have you seen the viral video of the innocent housewife who made even Big B laugh by saying 'Jai Ho KBC'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.