‘ते’ मायदेशी परत येण्यासाठी...!

By admin | Published: January 15, 2016 11:17 PM2016-01-15T23:17:46+5:302016-01-16T00:34:05+5:30

कोकण किनारा

'They' to come back home ...! | ‘ते’ मायदेशी परत येण्यासाठी...!

‘ते’ मायदेशी परत येण्यासाठी...!

Next

लोकमत रत्नागिरी आवृत्तीचा नववा वर्धापन दिन काल १५ जानेवारीला झाला. गेली आठ वर्षे ‘लोकमत’ने सतत वेगवेगळ्या विषयांवरील दर्जेदार आणि संग्रही ठेवाव्यात, अशा विषयांवरील विशेषांक तुम्हा वाचकांसाठी उपलब्ध करून दिले आणि प्रत्येकवेळी तुमच्याकडून त्याला भरभरून दाद मिळाली. तुमच्याशी जोडलं गेलेलं हे नातं असंच टिकून राहावं, यासाठी याहीवेळी रत्नागिरीच्या मातीशी जोडला गेलेला विषय ‘लोकमत’ने निवडला, ग्लोबल कोकणी! नोकरी, व्यवसायानिमित्त सातासमुद्राची हद्द ओलांडून गेलेल्या आणि परक्या मातीत स्थिरावलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या सुपुत्रांच्या आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सुकन्यांच्या यशाच्या स्टोरीज्! झाड कितीही उंच गेलं तर त्याची मुळं जमिनीतच असतात, मुळांचं जवळचं नातं मातीशीच असतं. त्यानुसार परदेशात नोकरी करणाऱ्या, व्यवसाय उभे केलेल्या अनेकांनी अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यातून ग्लोबल कोकणी विशेषांकाला अधिक व्यापकता देता आली. ११ जानेवारीपासून प्रसिद्ध होत असलेल्या या विशेषांकाचे तुम्ही सर्वांनीच अतिशय मनापासून स्वागत केल्याच्या प्रतिक्रिया उत्साह वाढवणाऱ्या होत्या. पण हा विषय केवळ कौतुकाच्या कथा आहेत का? त्या कौतुकाच्या कथा आहेतच, पण त्यातून अव्यक्तपणे व्यक्त होणारे अनेक विषय विचार करायला लावणारे आहेत. गंभीर करणारे आहेत.
‘ग्लोबल कोकणी’ हा विषय म्हणजे परदेशातल्या आपल्या बांधवांच्या यशाच्या कथा आहेत. पण आज ते किती यशस्वी आहेत, याचा विचार करताना हे यश मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं आहे, याचा विचार करणं अधिक गरजेचं आहे. त्यामुळेच या केवळ यशाच्या कथा नाहीत. त्या परिश्रमांच्या कथा आहेत, त्या मेहनतीच्या कथा आहेत, त्या बुद्धीमत्तेच्या कथा आहेत. गेले दोन-पाच वर्षात परदेशात जाणाऱ्यांचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे. त्यांच्या दिमतीला इंटरनेटचा मोठा आधार होता. (तरीही त्यांचे काम कौतुकास्पद आहेच.) पण त्याहीपेक्षा महत्त्वाची नोंद घेणे गरजेची आहे ती आधी परदेशात गेलेल्यांची. मराठी माध्यमाच्या, त्यातही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून त्यांनी परदेशी झेप घेतली तेव्हा दळणवळणामध्ये इतकी सुलभता नव्हती. तिकडे पोहोचल्यानंतर घरच्यांशी पत्रातूनच संपर्क व्हायचा. तेव्हा व्हॉटस्अ‍ॅप नव्हतं आणि मोबाईल सुरू झाल्यानंतरही परदेशात मोबाईलवर संपर्क साधण्याइतकीही स्थिती नव्हती. पण त्याही काळात अतिशय नेटाने अनेकजण परदेशांमध्ये स्थिरावले. ही बाब कौतुकास्पद अशीच आहे.
आताच्या काळात दळणवळण सोपे झाले आहे. संपर्काची खूप साधने आहेत. व्हिडीओ कॉल ही आता अवघड आणि महागडी वाटणारी गोष्ट नाही. परदेशांमध्ये नोकऱ्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पण तरीही त्या-त्या क्षेत्रात पाय रोवण्यासाठी तुमच्याकडे विशेष क्षमतेचीच गरज आहे. ती असल्यामुळेच आजच्या घडीला तरूण पिढीतील अनेकजण परदेशांमध्ये स्थिरावले आहेत. त्यामुळे त्यांची झेपही कौतुकास्पद आहे.
खरे तर माणूस हा समाजप्रिय प्राणी. त्यातही आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये राहण्याची मानसिक गरज अधिक. पण तरीही आपल्या घरादारापासून, माणसांपासून लांब जाणारे पैशाच्या ओढीने परदेश गाठत असतील का? की परदेशातील चकाचक आयुष्य त्यांना आकर्षित करत असेल? आपण घेतलेल्या शिक्षणानुसार पैसे मिळावेत, ही अपेक्षा चुकीची नाही. चकाचक आयुष्याचं आकर्षणही अयोग्य नाही. पण जे परदेशात आहे, ते आपल्याकडे नाही, ही मुख्य खंत आहे. परदेशात नोकरी कोणाला मिळते? जे बुद्धीमान आहेत, त्यांना. म्हणजेच भारतातील अनेक बुद्धीमान लोक परदेशात काम करत आहेत. दळणवळणाच्या साधनांमुळे जग जवळ आले आहे. त्यामुळे कोणीही कोठेही जाऊन आपल्या उत्पन्नाची सोय करू शकतो. पण आपला देश सोडून इतर देशात जाण्याची वेळ का यावी? याचे एकमेव उत्तर म्हणजे सुविधांबाबत आपण खूप कमी आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत उद्योग क्षेत्राची वाढ झालेली नाही. जगात सर्वाधिक तरूणांची संख्या भारतात आहे आणि त्यादृष्टीने भारत महासत्ता आहे, हे वाक्य भाषणात टाळ्या घेण्यासाठी योग्य आहे. त्याची आकडेवारीही अतिशय सुंदर वाटते. पण या तरूणांच्या हाताला काम आहे का? त्यांनी घेतलेल्या शिक्षणानुसार, त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना काम आणि वेतन देण्याइतकी आपली क्षमता आहे का? परदेशात काम करणाऱ्या तरूणांना भारतातच तितक्या वेतनाची नोकरी उपलब्ध असेल तर ते आपला देश, आपली माती सोडून बाहेर जातीलच कशाला? त्यासाठी उद्योगांमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश कीर ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांनी एक वाक्य म्हटले होते, आज आपण उद्योगांना विरोध करत आहोत. आणखी काही वर्षांनी आपल्या पुढच्या पिढीतील तरूणांना नोकऱ्या नसतील, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यायचे? आजच्या घडीला ही बाब प्रकर्षाने पुढे येऊ लागली आहे. केवळ आपला भागच नाही तर देशभरात उद्योग वाढणे गरजेचे आहे, त्यासाठी नवे तंत्रज्ञान विकसित होणे गरजेचे आहे आणि ते आपल्या देशातच तयार होणे गरजेचे आहे. त्यासाठी उद्योग वाढणे, ही मोठी गरज आहे. नाहीतर परदेशी जाणाऱ्या आपल्या तरूणांची संख्या अजून वाढेल.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्वच्छतेचा. परदेशांमधील स्वच्छतेचे भरपूर कौतुक होते. पण ही गोष्ट आपल्याला अशक्य आहे का? काही सामाजिक बंधने प्रत्येकाने पाळली तर अस्वच्छतेचे भूत पळवायला कुठलाही मांत्रिक लागणार नाही. सार्वजनिक स्वच्छता हा मोठा चिंतेचा विषय आहे. केवळ सरकारी मोहिमा राबवून हा प्रश्न सुटणार नाही. सरकारी मोहिमांनी सुरूवात तर करून दिली आहे. आता पुढची जबाबदारी आपली आहे. परदेशांप्रमाणे आपला देश का स्वच्छ दिसू नये, असा विचार करायला हरकत नाही.
परदेशातल्या आपल्या बहुसंख्य बांधवांनी ‘वर्क कल्चर’ या शब्दाचा उपयोग केला. परदेशात कामाच्यावेळी पूर्णपणे काम आणि मजेच्यावेळी पूर्णपणे मजा अशी पद्धत असल्याचे आवर्जून सांगितले. आपल्याकडे कामाच्यावेळी मजा आणि मजेच्यावेळी काम करण्याची पद्धत आहे. परदेश म्हणजे काही जादूची भूमी नाही. तेथेही आपल्यासारखी माणसेच आहेत. पण लोकसंख्या मर्यादीत असल्याने तेथे सरकारी यंत्रणेकडून अनेक सुविधा लोकांसाठी उपलब्ध केल्या जातात. त्या लोकांपर्यंत पोहोचतात. लोकसंख्येत आघाडीवर असलेल्या आपल्या देशात सरकारी सुविधा खूप आहेत. पण त्या लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. आपल्यालाही संधी आहे, स्मार्ट होण्याची. पण त्यासाठी आपली तयारी हवी.

मनोज मुळ््ये

Web Title: 'They' to come back home ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.