तिरवडे तर्फ खारेपाटणमध्ये एका कुटुंबाला टाकलं वाळीत, तंटामुक्ती अध्यक्षावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 09:23 PM2017-07-27T21:23:06+5:302017-07-27T21:23:18+5:30

गावच्या ग्रामदेवतेवर काही तरी केल्याच्या संशयावरुन तिरवडे तर्फ खारेपाटण (जि. सिंधुदुर्ग) येथील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

tairavadae-tarapha-khaaraepaatanamadhayae-ekaa-kautaunbaalaa-taakalan-vaalaita-tantaamaukatai | तिरवडे तर्फ खारेपाटणमध्ये एका कुटुंबाला टाकलं वाळीत, तंटामुक्ती अध्यक्षावर गुन्हा दाखल

तिरवडे तर्फ खारेपाटणमध्ये एका कुटुंबाला टाकलं वाळीत, तंटामुक्ती अध्यक्षावर गुन्हा दाखल

Next

वैभववाडी, दि. 27 - गावच्या ग्रामदेवतेवर काही तरी केल्याच्या संशयावरुन तिरवडे तर्फ खारेपाटण (जि. सिंधुदुर्ग) येथील एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तंटामुक्ती समिती अध्यक्ष तथा देवस्थान प्रमुखाच्या पुढाकाराने दत्ताराम भाऊ सावंत यांच्या कुटुंबावर संपूर्ण गावाने धार्मिक व सामाजिक बहिष्कार घातला आहे. बहिष्कृत सावंत यांच्या तक्रारीवरून तंटामुक्ती अध्यक्ष धकटू काशिराम घुगरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

याबाबत पोलिसातून मिळालेली अशी की, बहिष्कृत तक्रारदार दत्ताराम सावंत यांचे राहते घर तिरवडे तर्फ खारेपाटण येथील सावंतवाडीत आहे. सध्या त्यांच्या घरी ते स्वत:, पत्नी, सून आणि नातवंडे राहतात. तर त्यांचे मुलगे मुंबईला असतात. सावंत यांनी गावच्या देवस्थानावर काही तरी ठेवल्यामुळे देवाचे कौल होत नाहीत, असा मानक-यांना संशय आहे. त्यामुळे सावंत यांना मंदिरात बोलावून गावक-यांच्या उपस्थितीत ‘खात्रीचे कौल’  घेतले. परंतु सुरुवातीला कौल झाले नव्हते. मात्र, दुस-यांदा घेतलेले कौल सावंत यांच्या विरोधात गेल्यामुळे देवस्थानाचे प्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष धकटू घुगरे यांनी सावंत कुटुंबाला वाळीत टाकण्याचा निर्णय घेऊन गावातील कुणीही कशालाही न जाण्याचे फर्मान सोडले.

देवस्थानाचे प्रमुख व खुद्द तंटामुक्ती अध्यक्षांनी बहिष्कार घातल्यामुळे संपूर्ण गावाने त्यांच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे दत्ताराम सावंत यांच्या गावातील कोणीही फिरकत नाही. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बँकेच्या कर्जावर सावंत यांनी पिठाची गिरण घेतली आहे. गावाच्या बहिष्कारामुळे कुणीही आपल्या घराकडे फिरकत नसल्यामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे, असे सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे. सावंत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिरवडे तर्फ खारेपाटण गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व देवस्थानाचे प्रमुख धकटू काशिराम घुगरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत व्यक्ती संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याआधी दोन वाड्या होत्या बहिष्कृत
तिरवडे तर्फ खारेपाटण येथील सावंतवाडी आणि देवळेवाडी या दोन वाड्यांवर चार वर्षांपूर्वी बहिष्कार घालण्यात आला होता. त्या वाड्यांचा बहिष्कार मागे घेऊन त्यांना पुन्हा गावात घेण्यासाठी दोन वाड्यांकडून दंड म्हणून सोन्याचा मुलामा चढवलेली चांदीची डुकराची मूर्ती देवस्थानचे प्रमुख व तंटामुक्ती अध्यक्ष धकटू घुगरे यांनी करून घेतली होती, असे सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दहा वर्षे तेच आहेत तंटामुक्ती अध्यक्ष
शासनाने २००७ मध्ये तंटामुक्त गाव अभियान सुरु केले. तेव्हापासून गावच्या देवस्थानाचे प्रमुख म्हणून धकटू घुगरे हेच आजमितीस तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत. या काळात त्यांच्या आदेशाने चक्क दोन वाड्यांवर बहिष्कार घालण्यात आला होता. ही वस्तुस्थिती असतानाही शासनाने तिरवडे तर्फ खारेपाटण गावाला तंटामुक्त पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा विरोधी कायदा केल्यानंतर देवस्थानाच्या विषयातून बहिष्काराबद्दल दाखल झालेला हा जिल्ह्यातील पहिला गुन्हा ठरला आहे.

Web Title: tairavadae-tarapha-khaaraepaatanamadhayae-ekaa-kautaunbaalaa-taakalan-vaalaita-tantaamaukatai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.