मांगवलीत पकडलेल्या जनावरांच्या ट्रकवरील कारवाईबाबत संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 16:59 IST2017-10-21T16:54:01+5:302017-10-21T16:59:56+5:30
जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या ट्रकमध्ये दहा बैल कोंबलेले होते. मात्र, घटनेला 24 तास उलटले तरी ट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.

भुईबावडा घाटातून जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
वैभववाडी, दि. २१ : जनावरांची भरदुपारी राजरोस वाहतूक करणारा ट्रक मांगवली तिठ्यावर ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. त्या ट्रकमध्ये दहा बैल कोंबलेले होते. मात्र, घटनेला 24 तास उलटले तरी ट्रकवरील कारवाईबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे समोर येत आहे.
या प्रकरणात राजकीय व्यक्तींचा दबाव वाढल्यामुळे जनावरे तस्करीला व्यापाराचे गोंडस रुप देऊन पोलिसांनी गुन्ह्यातील हवा काढून टाकली आहे. राजकीय हस्तक्षेपानंतर पोलिसांनी केलेल्या चलाखीबाबत पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढली आहे.
कोळपे वेंगसर, मांगवली मार्गे भुईबावडा घाटातून बैल आणि गायींची बेकायदा नियमित वाहतूक केली जाते. याबाबत पोलिसांना स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी कल्पना दिली आहे. मात्र, स्वतःहून पोलीस कारवाई करायला तयार नसल्याने ग्रामस्थांनीच पाळत ठेवून शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मांगवली तिठ्यावर जनावरांची वाहतूक करणारा ट्रक(एम.एच.09; सीए-8533) पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला.
ट्रकमध्ये 10 बैल होते. कोळपे येथून ती जनावरे कोल्हापूरकडे घेऊन जात होते. जनावरांचा ट्रक पकडल्याचे समजताच राजकीय पदाधिका-यांची फोनाफोनी सुरु झाली. तर काही थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. ही कारवाई टाळण्यासाठी कत्तलखान्याकडे नेली जाणारी जनावरे कोपार्डेच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे भासविण्याचा प्रयत्न अगदी शिताफीने केला गेला आहे. त्यामुळेच ट्रक चालकाविरुद्ध बेकायदा वाहतुकीचा गुन्हा नोंदवला आहे.
मात्र, वारंवार विचारणा करुनही ट्रकचालकचे नाव सांगण्यास पोलीस एकमेकांकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करीत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे जनावरांच्या बेकायदा वाहतुकीला अभय देऊन दलालांना पाठीशी घालणा-या पोलिसांबाबत अवैध धंदेवाल्यांसाठी कर्दनकाळ ठरलेले पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम कोणते पाऊल उचलतात याची उत्सुकता आहे.