सी-वर्ल्डच्या मोजणीस वायंगणी येथे प्रारंभ

By admin | Published: November 15, 2016 11:26 PM2016-11-15T23:26:13+5:302016-11-15T23:26:13+5:30

ग्रामस्थांचा विरोध कायम : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे न्यायालयीन लढ्याचा इशारा

Start at the C-World count Vyangani | सी-वर्ल्डच्या मोजणीस वायंगणी येथे प्रारंभ

सी-वर्ल्डच्या मोजणीस वायंगणी येथे प्रारंभ

Next

आचरा : तोंडवळी-वायंगणी येथे प्रस्तावित असलेल्या सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी वायंगणी गावातील क्षेत्रात मंगळवारी संयुक्त भू-मोजणी प्रक्रिया कडक पोलिस बंदोबस्तात सुरू झाली. प्रकल्पग्रस्तांनी पर्यटन विकास महामंडळ व भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत मोजणी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यामुळे ग्रामस्थांनी न्यायालयीन लढ्याचा मार्ग अवलंबिणार असल्याचे स्पष्ट केले.
सी-वर्ल्डच्या या मोजणी प्रक्रियेला ग्रामस्थ तीव्र विरोध करतील, या शक्यतेने प्रशासनाने दोन पोलिस अधिकारी आणि २० पोलिस कर्मचारी असे पथक मोजणीच्या ठिकाणी तैनात ठेवले होते. मोजणी प्रक्रियेला सुरुवात होताच गावातील शेतकरी तसेच ग्रामस्थ त्याठिकाणी आले. त्यांनी आपला मोजणीस विरोध असल्याचे अधिकाऱ्यांना सांगत प्रकल्पच नको असल्याने खासगी वाटाघाटीने जमीन देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे स्पष्ट केले.
यावेळी आचरा पोलिस ठाण्याच्या निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी ग्रामस्थांना तुमचे म्हणणे मांडा तसेच मोजणीस अडथळा निर्माण केल्यास कारवाईचा इशारा दिला. यावेळी ग्रामस्थांनी आपणास कायदा हातात घ्यायचा नसून, कायदेशीर मार्गाचा लढा देणार असल्याचे सांगत पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध नोंदवत मोजणीच्या ठिकाणापासून मागे जाण्याचा निर्णय घेतला.
सकाळी ११ वाजता भूमी अभिलेख उपअधीक्षक अनुराधा आगम, कर्मचारी चेतन गोसावी, के. जे. कुमठेकर, एस. जी. चाफे हे दाखल झाले. त्यानंतर पर्यटन विकास महामंडळाचे सल्लागार किरण सुलाखे, प्रकल्प अधिकारी माने, वनविभागाचे गुरुनाथ देवळी, कृषी विभागाचे एम. डी. ठाकूर, आचरा मंडल अधिकारी पारकर, तलाठी कांबळे, पोलिसपाटील त्रिंबककर यांच्या उपस्थितीत वायंगणी माळरानावर सर्व्हे नंबर १०२ मध्ये मोजणीचे काम सुरु करण्यात आले.
मोजणी सुरू होण्यापूर्वी काही अंतरावर असलेल्या ८० ते ९० ग्रामस्थांनी उदय दुखंडे यांच्यासह मोजणीच्या ठिकाणी येत अनुराधा आगम यांना धारेवर धरले. यावेळी प्रफुल्ल माळकर, मोहन दुखंडे, मालती जोशी, संतोष सावंत, मनोहर टिकम, सदानंद सावंत, संदीप आडकर, उत्तम खांबल, दीपक दुखंडे, प्रगती सावंत, अनिता वायंगणकर, वृंदा सावंत, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
भूमी अभिलेख विभागाने काढलेली ४५० एकराच्या मोजणीची नोटीस पर्यटन विकास महामंडळाच्या नावे आहे. त्यात शेतकरी तसेच जमीनधारकांना सहप्रतधारक बनविण्यात आले आहे. याला ग्रामस्थांनी आक्षेप घेतला. तसेच २०१३ मधील मोजणीच्या वेळी शेतकऱ्यांना थेट नोटिसा आल्या होत्या मग आता का नाहीत? अशी विचारणा अधिकाऱ्यांना केली. भूमी अभिलेखच्या अनुराधा आगम यांनी आपण विहीत नमुन्यात संबंधितांना नोटिसा बजावल्या असून, मोजणीचा खर्च तसेच इतर व्यवस्था ही मोजणीची मागणी करणाऱ्या पर्यटन विकास महामंडळाने करायची असल्याने त्यांच्या नावे नोटीस काढली असल्याचे सांगितले. तर कोणाच्याही दडपशाहीला न घाबरता हा सी-वर्ल्ड प्रकल्प हद्दपार करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला. (वार्ताहर)
शिवसेना पक्षप्रमुखांनी भूमिका जाहीर करावी
४काही कालावधीपूर्वी हा प्रकल्प हटविणार असे सांगत निवडणूक जिंकणारे आमदार वैभव नाईक व पालकमंत्री दीपक केसरकर हे आता प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत. तर त्यांच्याच पक्षाचे खासदार विनायक राऊत येथील लोकांबरोबर असल्याचे भासवत आहेत. ही दुटप्पी भूमिका असून शिवसेना पक्षप्रमुखांनी सी-वर्ल्डबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी वायंगणी ग्रामस्थांनी यावेळी केली.
प्रशासनाचा निषेध
पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर ग्रामस्थांनी कायदा हातात न घेण्याचा निर्णय घेत मोजणीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचे ठरविले. तसेच माळरानावरच बैठक घेत पोलिसांच्या दडपशाहीला कारणीभूत असणाऱ्या पालकमंत्री दीपक केसरकर आणि प्रशासन यंत्रणेचा निषेध केला.
 

Web Title: Start at the C-World count Vyangani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.