सोनुर्लीत मुलाकडून आईचा निर्घृण खून

By admin | Published: April 22, 2015 12:14 AM2015-04-22T00:14:36+5:302015-04-22T00:28:17+5:30

किरकोळ भांडण : घटनेनंतर पळून जाणाऱ्या संशयितास अटक

Sonuralita's mother's bloodless murder | सोनुर्लीत मुलाकडून आईचा निर्घृण खून

सोनुर्लीत मुलाकडून आईचा निर्घृण खून

Next

सावंतवाडी : आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या क्रूर घटनेने सोमवारी मध्यरात्री सोनुर्ली चांगलीच हादरली. किरकोळ कारणावरून मुलाने कुऱ्हाड व दांड्याच्या साहाय्याने शीतल बाळकृष्ण परब (वय ४५, रा. पाक्याचीवाडी, सोनुर्ली) या आपल्या आईची निर्घृण हत्या केली. रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मंगळवारी सकाळी पोलिसांनी आरोस तिठा येथे आरोपी गौरेश बाळकृष्ण परब ( २०, रा. पाक्याचीवाडी, सोनुर्ली) याला ताब्यात घेतले.
सोनुर्ली-पाक्याचीवाडी येथे परब यांचे एकमेव घर आहे. घरात शीतल दोन मुलांसह राहतात. शीतल यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांना तीन दीर असून, एक मुंबईला, तर अन्य दोघे घरापासून दोन किलोमीटर अंतरावरच राहतात. पतीचे निधन झाल्यानंतर शीतल परिसरात इतरांकडे घरगुती कामे करून कुटुंब चालवत होत्या. त्या मनोरुग्ण होत्या. त्यांच्यावर बरीच वर्षे औषधोपचार सुरू होते.अलीकडेच त्यांची तब्येत सुधारत होती. मोठा मुलगा गौरेश याने नववीपर्यंत शिक्षण घेतले असून, तो सोनुर्लीसह गोवा, सावंतवाडी येथे कामाला जात होता. लहान मुलगा दिनेशनेही दहावीची परीक्षा दिली असून, तो काकाकडे असतो.
सोमवारी दुपारी गौरेशचे आई आणि भावासोबत कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी त्याने दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र, भावाची धमकी मनावर न घेता दिनेश सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे काकाकडे गेला, परंतु गौरेशने रात्रीचे जेवण केल्यानंतर पुन्हा आईबरोबरच भांडण सुरू केले. ते एवढे विकोपाला गेले की, गौरेशने घरामागे ठेवलेली कुऱ्हाड आईच्या डोक्यात घातली. हा प्रहार इतका जोरदार होता की, शीतल यांच्या मेंदूचा एक भागच नाहीसा झाला. एवढ्यावर न थांबता त्याने निपचित पडलेल्या आईच्या छातीवरही कुऱ्हाडीचे घाव घातले.
ही घटना मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घडली. आईला रक्ताच्या थारोळ्यात टाकून नंतर गौरेशने काकाच्या घरी जाऊन भाऊ दिनेशला याची माहिती दिली. परंतु, दिनेशने ती काकांना मंगळवारी सकाळी सांगितली. सकाळी दहा वाजता ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गौरेशला ताब्यात घेतले. तसेच गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड, दांडा व कपडेही जप्त केले.
शीतल परब यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक रणजित देसाई, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार, सहायक पोलीस उपनिरीक्षक व्ही. एस. नाईक, संतोष नांदोस्कर, मंगेश शिगाडे, अमर नारनवर करीत आहेत. (प्रतिनिधी)


हत्येसाठी कुऱ्हाड व दांड्याचा वापर
गौरेशने हत्येसाठी कुऱ्हाड व दांड्याचा वापर केला. भांडण झाल्यानंतर घराच्या मागच्या बाजूला ठेवलेल्या कुऱ्हाडीने आईच्या डोक्यावर प्रहार केला. यात तिच्या मेंदूचे दोन तुकडे झाले. त्यानंतर त्याने छातीवर व पोटावरही घाव घातले. संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता. घरातील कपडेही रक्तानेच माखले होते.
आईची हत्या केल्यानंतर त्याला पश्चात्तापही होत होता. रात्र अंगणात काढून सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्याने आपली छोटी बॅग भरली. त्यात पँट व अन्य कपडे होते. चालतच तो आरोस तिठा येथे आला व तेथील एका हॉटेलात लपून बसला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.




गौरेशने रात्र अंगणातच काढली
लहान भावाला आईची हत्या केल्याचे सांगून गौरेश पुन्हा घरी आला आणि संपूर्ण रात्र घराबाहेर अंगणातच घालवली. सकाळी तो परिसरात फिरत होता. काही मित्रांकडेही गेला होता.
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
हत्या केल्यानंतर अंगावर रक्ताचे डाग पडल्याचे लक्षात येताच गौरेशने अंगणात अंघोळ करून स्वत:चे कपडेही धुतले. मात्र, घटनास्थळावरच्या अन्य पुराव्यांवरून त्यानेच हत्या केल्याचे स्पष्ट झाले.

Web Title: Sonuralita's mother's bloodless murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.