टीकाकारांना कामातून उत्तर- दीपक केसरकर        

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 11:55 PM2018-07-16T23:55:11+5:302018-07-16T23:55:24+5:30

जे माझ्यावर सोशल मीडिया आणि बॅनरमधून टीका करीत आहेत, त्यांनी माहितीच्या अधिकारातून जिल्ह्यात किती निधी आणला त्याची माहिती मागवली होती.

Responses to the commentators: Deepak Kesarkar | टीकाकारांना कामातून उत्तर- दीपक केसरकर        

टीकाकारांना कामातून उत्तर- दीपक केसरकर        

Next

सावंतवाडी : जे माझ्यावर सोशल मीडिया आणि बॅनरमधून टीका करीत आहेत, त्यांनी माहितीच्या अधिकारातून जिल्ह्यात किती निधी आणला त्याची माहिती मागवली होती. त्यांना सर्व माहिती देण्यात आली आहे. मग त्यांनी निधी आणला  म्हणून तरी जनतेला का सांगितले नाही? माझ्यावर टीका करणा-यांनी जरूर करावी. त्यांना मी माझ्या कामातूनच उत्तर देईन, असा इशारा राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राजन पोकळे, नितीन वाळके, रूपेश राऊळ, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते. पालकमंत्री केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा ही योजना सिंधुदुर्गसाठी लाभदायी आहे. त्यातून सिंधुदुर्गचा सर्व थराचा विकास होणार आहे. चांदा ते बांदा योजनेचे कामही प्रगतीपथावर सुरू आहे. प्रगत शेती सुरू करण्यात आली आहे. काथ्या उद्योगांचे बारा युनिट तयार करण्यात आले आहेत. आता यापुढे बेरोजगारांच्या हाताला काम देणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. त्या शिवाय शिक्षण व आरोग्याच्याबाबत क्रांती करायची आहे, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.
सिंधुदुर्गचा झपाट्याने विकास होत आहे. मोठ्या प्रमाणात निधी जिल्ह्यात आला आहे. यापूर्वी एवढा निधी कधीही आला नाही. सिंधुदुर्गमधील वेंगुर्ले तसेच देवगड येथे रूग्णालयांची कामे सुरू आहेत. तर कुडाळ येथील महिला रूग्णालयाचे काम पुढील पाच ते सहा महिन्यात पूर्ण होणार आहे. सावंतवाडीतील आयएएस व आयपीएस सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार असून, प्रत्येक तालुक्यात याचे एक केंद्र सुरू करण्यात येणार आहे, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.
माझ्यावर टीका करणा-यांनी माहितीच्या अधिकारातून वेगवेगळी माहिती आमच्या कार्यालयाकडे मागवली होती. त्यावेळी सर्व माहिती देण्यात आली आहे. जिल्हाात २७०० कोटीचा निधी कशा प्रकारे आला तेही सांगण्यात आले आहे. तरीही सोशल मीडिया तसेच बॅनर लावून माझी जाहिरात करण्यात येत आहे. मला कामाचा बॅनर लावण्यास वेळ नाही. ते काम ही मंडळी करीत आहेत, असे सांगत मी कुणावरही टीका करणार नाही. त्यांना कामातूनच उत्तर देईन, असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.
प्रत्येक आठवड्याला जिल्ह्यात असतो
मी वेगवेगळ्या बैठकांच्या निमित्ताने सिंधुदुर्गमध्ये आठवड्याला येत असतो. प्रत्येक बैठका काय कणकवलीला घेणे शक्य नाही. जिल्ह्याच्या ठिकाणीच बैठका घेण्यात येतात. या पुढे आता आठवड्याचे दोन दिवस जिल्ह्यात थांबून काम करेन तसेच प्रत्येक प्रकल्पावर विशेष लक्ष देऊन काम करून घेईन, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले

Web Title: Responses to the commentators: Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.