अन्यथा गोव्यातील एकही बस फिरू देणार नाही

By admin | Published: March 18, 2017 11:31 PM2017-03-18T23:31:42+5:302017-03-18T23:31:42+5:30

प्रितेश राऊळ यांचा इशारा : चालक-वाहकांना मारहाणप्रकरणी कारवाई करा

Otherwise, no one from Goa will be allowed to rotate | अन्यथा गोव्यातील एकही बस फिरू देणार नाही

अन्यथा गोव्यातील एकही बस फिरू देणार नाही

Next

वेंगुर्ले : येथील आगारातून पणजीला जाणाऱ्या बसला तेथे अडवून, चालक-वाहकांना मारहाण व बसचे नुकसान केल्याची घटना निंद्यनीय आहे. याबाबत येत्या आठ दिवसात कायदेशीर कारवाई न केल्यास गोव्यातील एकही बस तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रितेश राऊळ यांनी दिला.
याप्रश्नी लवकरच मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार करणार असून अशा घटनांना आवर घालण्यासाठी सिंधुदुर्ग आणि पणजी या जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग एस. टी. महामंडळाचे कणकवली विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिले.
वेंगुर्ले एस. टी. आगाराच्या सायंकाळी पणजीला जाणाऱ्या बसला पणजी येथे अडवून बसच्या चालक-वाहकांना मारहाण करण्यात आली.
तसेच गाडीच्या दर्शनी भागाची काच फोडून एस. टी. महामंडळाचे नुकसानही करण्यात आले. हा प्रकार चार दिवसांपूर्वी घडला. असे प्रकार सातत्याने होत असल्यामुळे सिंधुदुर्गातील विशेषत: वेंगुर्ले आगारातील एसटी चालक आणि वाहक यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेला चार दिवस उलटले तरी वेंगुर्ले एस. टी. आगाराकडून कोणतीही कारवाईची मोहीम हाती घेण्यात न आल्यामुळे वेंगुर्ले तालुका युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी वेंगुर्ले एसटी आगार व्यवस्थापक यांच्या केबिनमध्ये एसटी महामंडळाचे कणकवली विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. यावेळी बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, राहुल गावडे, तुषार साळगावकर, भूषण सारंग उपस्थित होते.
यावेळी राऊळ यांनी हसबनीस यांचे लक्ष वेधताना, गोव्यातील खासगी बसचालकांकडून असे प्रकार केले जातात. तीन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यांच्यामुळे प्रशासन, प्रवासी, नागरिक सर्वच हतबल झाले आहेत. अशा घटना रोखण्यासाठी एसटी महामंडळाकडून कडक उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर बाबली वायंगणकर यांनी असे प्रकार घडत असतील तर गोव्यातील एकही बस सोडणार नाही, याची दखल महामंडळ व पोलीस प्रशासनाने घ्यावी. सध्या अधिवेशन सुरु असून, याप्रश्नी आमदार नीतेश राणे यांच्यामार्फत याविषयी अधिवेशनात आवाज उठविण्यात येईल, असेही सांगितले.
यावेळी कणकवली विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी गोव्यात घडलेला प्रसंग दुर्दैवी असून या प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाला कळवून पोलीस ठाण्यात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जाईल. त्याशिवाय एसटी महामंडळाकडून गोवा गृहमंत्री, पणजी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन बैठक घेतली जाईल व तोडगा काढू, असे आश्वासन युवक काँग्रेसला दिले. घटनेला चार दिवस होऊनही पालकमंत्र्यांनी दखल घेतली नसून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जिल्हावासियांतून नाराजी व्यक्त होत आहे. येत्या आठ दिवसात याप्रश्नी कारवाई न झाल्यास गोव्यातील रोखण्यात येतील, असा इशारा प्रितेश राऊळ यांनी दिला.
गोव्यातील या प्रकारामुळे बसमधील प्रवाशांना तीन तास ताटकळत थांबून रहावे लागले. त्यांची पर्यायी व्यवस्था करण्याचे औदार्यही वेंगुर्ले आगारकडून केले गेले नाही. ही बाब दुर्दैवी आहे. त्यामुळे असा प्रकार झाला तर तालुका काँग्रेसमार्फत आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी)

वेंगुर्ले एसटी आगारामध्ये कणकवली विभाग नियंत्रक हसबनिस यांच्याशी प्रितेश राऊळ यांनी चर्चा केली. यावेळी बाबली वायंगणकर, वसंत तांडेल, राहुल गावडे आदी उपस्थित होते.

Web Title: Otherwise, no one from Goa will be allowed to rotate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.