नार्वेकरांच्या गुगलीने अनेक जण क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 10:46 AM2018-09-25T10:46:40+5:302018-09-25T10:47:08+5:30

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी बोलण्याच्या ओघात मी नगरपालिका निवडणुकीत बबन साळगावकर यांनाच शुभेच्छा दिल्या होत्या

Narvekar had helped Baban Salgaonkar in elections | नार्वेकरांच्या गुगलीने अनेक जण क्लिन बोल्ड

नार्वेकरांच्या गुगलीने अनेक जण क्लिन बोल्ड

Next

सावंतवाडी : सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी बोलण्याच्या ओघात मी नगरपालिका निवडणुकीत बबन साळगावकर यांनाच शुभेच्छा दिल्या होत्या, असे सांगत अप्रत्यक्षरित्या त्या निवडणुकीत साळगावकर यांनाच मदत केल्याचे स्पष्ट केले. पण तेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होता, याची आठवण करून देताच त्यांनी वयाप्रमाणे असे होते, असे सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

अ‍ॅड. नार्वेकर यांनी बबन आमदार झाल्यास त्याचे कान धरण्याचा मला अधिकार असल्याचेही यावेळी नमूद केले. भाईसाहेब आयुर्वेद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी राजेशकुमार गुप्ता हे निवृत्त होत असल्याने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी येथील नगरपालिका कक्षात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर, ज्येष्ठ नगरसेविका अनारोजीन लोबो, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, माधुरी वाडकर, रमेश बोंद्रे, बाळ बोर्डेकर आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी दहा वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नगरपालिका निवडणुकांसाठी तिकिटांचे वाटप केले होते. त्यावेळी कणकवलीतून सावंतवाडीत तिकिटाचे वाटप करण्याबाबत आलेल्या उमेदवारांच्या यादीत आपण कसा व्हाईटनर लावला त्यापासून गुप्ता यांच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी माजी नारायण राणेच का, या सर्व प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी काही प्रश्नांसाठी त्यांनी साक्षीला नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनाही ठेवले. पण रोजगारांच्या मुद्द्यावर नार्वेकर व साळगावकर यांची भूमिका एक वाटली. सर्वच प्रकल्पांना विरोध केला तर रोजगार कसा येईल, असा सवाल अ‍ॅड. नार्वेकर यांनीही यावेळी केला.

तर प्रमुख मुद्दा ठरला तो नगरपालिका निवडणुकीतील दीड वर्षापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांना डावलून काँग्रेसने संदीप कुडतरकर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत आपण बबन साळगावकर यांना शुभेच्छा दिल्या होत्या, असे सांगत एक प्रकारे मी साळगावकर यांचाच प्रचार केल्याचे स्पष्ट केले. पण जेव्हा तुम्ही हा गौप्यस्फोट करता आहात असे सांगितले, तेव्हा त्यांनी आता वय झाले ना, त्यामुळे होते केव्हा तरी, असे सांगत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

तर आयुर्वेदिक हॉस्पिटलचे प्रश्न कोण सोडवणार नाहीत, असे त्यांनी सांगितले. तर आपण कशा प्रकारे आयुर्वेदिक रुग्णालय चालवत आहे, याची माहितीही त्यांनी दिली. बबन साळगावकर हे आमदार झाल्यास मला त्याचा कान धरण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे ही यावेळी अ‍ॅड. नार्वेकर यांनी नमूद केले. ही राजकीय जुगलबंदी तब्बल अर्धा तास चालली होती. यावेळी अनेक विषयांवरून सर्व नगरसेवकांनी कोटी करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Narvekar had helped Baban Salgaonkar in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.