ओसरगाव अंगणवाडीला ‘आयएसओ’

By Admin | Published: November 5, 2016 12:50 AM2016-11-05T00:50:59+5:302016-11-05T00:50:59+5:30

शिरपेचात मानाचा तुरा : मानांकन मिळालेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी

'Iso' on Aasangwadi Aanganwadi | ओसरगाव अंगणवाडीला ‘आयएसओ’

ओसरगाव अंगणवाडीला ‘आयएसओ’

googlenewsNext

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली स्मार्ट डिजिटल अंगणवाडी बनण्याचा मान मिळाल्यानंतर ओसरगाव कानसळी अंगणवाडीला ‘आयएसओ ९००१ : २०१५’ मानांकनही मिळाले आहे. ‘आयएसओ’ मानांकन मिळविणारी कानसळी ही जिल्ह्यातील पहिली अंगणवाडी ठरली आहे. याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, लवकरच मान्यवरांच्या हस्ते मानांकन प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डिजिटलच्या जमान्यात आता अंगणवाड्याही मागे राहिलेल्या नाहीत. सिंधुदुर्गातील २०० हून अधिक अंगणवाड्या डिजिटल झाल्या आहेत. कणकवली तालुक्यातील ओसरगाव कानसळी अंगणवाडीने एक पाऊल पुढे टाकत लोकसहभागातून प्रथमत: स्मार्ट डिजिटल अंगणवाडी होण्याचा जिल्ह्यात पहिला मान मिळविला आहे. त्यानंतर ‘आयएसओ’ मानांकनही मिळविण्याचा पहिला मान मिळविला आहे.
ओसरगाव-कानसळी अंगणवाडीचे पूर्वीचे रूप पूर्णपणे पालटून गेले असून, स्मार्ट डिजिटल अंगणवाडीमुळे अंगणवाडीमध्ये मुलांच्या येण्याचा ओढाही वाढला आहे. मराठी, इंग्रजीत मजकूर लिहिलेल्या बोलक्या भिंती, शब्द, अंक ओळख, थोर राष्ट्रपुरुषांचे फोटो, बसण्यासाठी खुर्ची, टेबल, शुद्ध पाणी, गणवेश, ओळखपत्र, जमिनीवर कारपेट, कार्टून्स, बगीचा, खेळणी या गोष्टी अंगणवाडीमध्ये पहावयास मिळतात. अशाप्रकारे बालवयातच शाळेची ओढ नव्हे, तर वेड लागले पाहिजे, अशा पद्धतीने अंगणवाडी बनविण्यात आली आहे. त्यामुळेच या अंगणवाडीची तपासणी अधिकारी प्रवीण लोंढे यांनी करत या अंगणवाडीची ‘आयएसओ’ साठी निवड केली होती.
ही अंगणवाडी स्मार्ट, डिजिटल बनविण्यासाठी आयएसओ मानांकन मिळविण्यासाठी ओसरगाव-कानसळी अंगणवाडी सेविका नंदा आळवे, मदतनीस सुप्रिया सावंत, मुख्य सेविका श्रद्धा दीपक माने यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. तसेच येथीलच श्री विठ्ठल रखुमाई विकास मंडळानेही आर्थिक मदत केल्याने लोकसहभागातून स्मार्ट डिजिटल अंगणवाडी होऊ शकली. तसेच महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी सोमनाथ रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. लवकरच स्मार्ट डिजिटल अंगणवाडीचे उद्घाटन आणि आयएसओ मानांकन प्रमाणपत्राचे वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. (प्रतिनिधी)


लोकसहभागातून रूपडे पालटले
अंगणवाडी (बालवाडी) म्हटले की, पूर्वी मंदिर, समाजमंदिर किंवा भाड्याच्या मोडकळीस आलेल्या खोल्यांमध्ये भरणारी शाळा असेच चित्र दिसत होते. मात्र, मागील काही वर्षांत जिल्हा परिषदेच्या व स्थानिक लोकसहभागाच्या माध्यमातून अंगणवाड्यांचे रूपडे बदलू लागले आहे. अंगणवाड्यांचा कायापालट झाला आहे. लहान मुलांना गंमत गाण्यामधून शिकविता आले पाहिजे, यासाठी शासनस्तरावरही प्रयत्न होताना दिसून येत आहेत.

Web Title: 'Iso' on Aasangwadi Aanganwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.