कणकवली: कलमठ बाजारपेठ येथील सेंटरिंगचे काम करणाऱ्या रमेश हरिसिंग जाधव (41) याचा लेप्टो सदृश तापाने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. कलमठ बाजारपेठ येथे भाड्याने राहत असलेल्या रमेश जाधव याला तीन दिवसांपूर्वी ताप येत होता.

तसेच त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला होता. 5 नोव्हेंबर रोजी ताप येत असल्याने त्याने खासगी दवाखान्यात किरकोळ उपचार घेतले होते. मात्र , ताप कमी न झाल्याने 8 नोव्हेंबर रोजी सकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला अधिक उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याच्या रक्ताची चाचणी लेप्टो पॉझिटिव्ह आली होती. तसेच त्याच्या शरीरातील प्लेटलेटची संख्या 33000 इतकी झाली होती.

त्याला बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले . त्याच्या प्लेटलेटची संख्या 13000 पर्यन्त कमी झाली होती. गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास रमेश जाधव याची उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात पत्नी ,तिन मुले असा परिवार आहे. दरम्यान, रमेश जाधव याचा लेप्टो सदृश तापाने मृत्यु झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने कलमठ बाजारपेठ परिसरात सर्व्हे केला. तसेच किरकोळ ताप येणाऱ्या रुग्णांना औषध दिल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.