कणकवली नगरपंचायत प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, विद्यमान नगरसेवकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 02:48 PM2017-12-08T14:48:44+5:302017-12-08T14:49:09+5:30

राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या तसेच नेहमीच चर्चेत असणाऱ्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन प्रभाग रचना तसेच प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली.

Announcement of Kankavli Nagar Panchayat Ward Reservations | कणकवली नगरपंचायत प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, विद्यमान नगरसेवकांना फटका

कणकवली नगरपंचायत प्रभाग आरक्षण सोडत जाहीर, विद्यमान नगरसेवकांना फटका

googlenewsNext

कणकवली- राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या तसेच नेहमीच चर्चेत असणाऱ्या कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने नवीन प्रभाग रचना तसेच प्रभाग आरक्षण सोडत शुक्रवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे काही विद्यमान नगरसेवकाना या प्रभाग आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांना आता सुरक्षित प्रभागाचा म्हणजेच मतदार संघाचा शोध घ्यावा लागणार आहे.

कणकवली नगरवाचनालयाच्या पू.अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात  निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी नीता शिंदे- सावंत  व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अवधूत तावड़े, प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून पी.एम. पिळणकर, जे. बी.गावित, किशोर धुमाळे, मनोज धुमाळे आदींच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. 
शुक्रवारी प्रथम कणकवलीतील नवीन प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर उतरत्या क्रमांकाच्या लोकसंख्येनुसार प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये 17 जागांपैकी 2 जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित झाल्या आहेत. शहरातील प्रभाग 8 मध्ये 1026 मतदार असून त्यापैकी 634 अनुसूचित जातीतील आहेत. तर प्रभाग 11 मध्ये 1031 मतदार असून त्यापैकी 145 अनुसूचित जातीतील आहेत. त्यामुळे हे दोन प्रभाग अनुसूचित जातिसाठी आरक्षित झाले आहेत. त्यानंतर या दोन प्रभागातील अनुसूचित जातींतील महिलांसाठी आरक्षित प्रभाग सोडतीद्वारे काढण्यात आला. सृष्टी मोरये या विद्यार्थिनीने काढलेल्या चिठ्ठी द्वारे प्रभाग 8 अनुसूचित जातीतील महिलांसाठी आरक्षित झाल्याचे जाहीर करण्यात आले.

त्यानंतर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी वरदा फ़णसळकर या विद्यार्थिनीने काढलेल्या  चिठ्ठी द्वारे 5 प्रभाग आरक्षित करण्यात आले. त्यामध्ये प्रभाग 5, प्रभाग 10, प्रभाग 14, प्रभाग 15, प्रभाग 16 चा समावेश होता. या  5 प्रभागांपैकी महिलांसाठीच्या 3 राखीव जागांसाठी मयूरेश मेस्त्री या विद्यार्थ्याच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. त्यामध्ये प्रभाग 5, प्रभाग 10 व प्रभाग 15 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहेत. तर नागरिकांच्या मागास प्रवर्गातील पुरुषांसाठी प्रभाग 14 आणि प्रभाग 16  आरक्षित झाले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 प्रभाग  आरक्षित झाले आहेत. त्यापैकी अथर्व तेली या विद्यार्थ्याने काढलेल्या चिठ्ठी नुसार 5 प्रभाग  महिलांसाठी आरक्षित झाले आहेत . त्यामध्ये प्रभाग 2, प्रभाग 1, प्रभाग 7,  प्रभाग 6 व प्रभाग 9 चा समावेश आहे. तर 5 प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले असून त्यामध्ये प्रभाग 3,  प्रभाग 4, प्रभाग 12, प्रभाग 13 व प्रभाग 17 चा समावेश आहे.

नूतन  प्रभाग रचनेबाबत 11 ते 17 डिसेंबर या कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती नोंदविता येणार आहेत. तर 30 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त अंतिम प्रभाग रचनेला मंजूरी देणार असून 3 जानेवारी 2018 पर्यन्त जिल्हाधिकारी ती जाहिर करणार आहेत.

नगरपंचायतीत महिला नगरसेवकांची संख्या असणार जास्त!
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक  निवडणुकीत 17 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. त्यातील 9 जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 10 जागा आरक्षित असून त्यापैकी 5 जागा महिलांसाठी असतील. तर इतर 5 जागांपैकी काही जागांसाठी महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल करून विजय मिळविल्यास नगरपंचायतीत महिला नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास ! 
कणकवली नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी शहरातील अनेक उमेदवार इच्छुक होते. प्रभाग आरक्षण सोडत जाहिर झाल्यानंतर त्यापैकी अनेक इच्छुक उमेदवारांचा  अपेक्षित आरक्षण न पडल्याने भ्रमनिरास झाला आहे. त्याबद्दल सभागृहात जोरदार चर्चा सुरु होती. तर कणकवली शहरातही दिवसभर याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. 
 

Web Title: Announcement of Kankavli Nagar Panchayat Ward Reservations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.