कऱ्हाडात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पदयात्रेस प्रतिसाद : तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 14:43 IST2018-07-24T14:41:05+5:302018-07-24T14:43:40+5:30
मराठा आरक्षणासाठी रान पेटले असताना कऱ्हाडातही हजारो मराठा बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. बांधवांनी तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.

कऱ्हाडात हजारो मराठा बांधव रस्त्यावर, पदयात्रेस प्रतिसाद : तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
कऱ्हाड : मराठा आरक्षणासाठी रान पेटले असताना कऱ्हाडातही हजारो मराठा बांधव मंगळवारी रस्त्यावर उतरले. बांधवांनी तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून त्याठिकाणी ठिय्या आंदोलन केले. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. त्यातच आरक्षणासाठी जलसमाधी घेत काकासाहेब शिंदे यांनी बलिदान दिल्याने हा प्रश्न आणखीनच चिघळला आहे. मराठा बांधव आपल्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिकेत असून, ठिय्या आंदोलन हा त्याचाच एक भाग आहे.
मंगळवारी कऱ्हाडात हजारो बांधव रस्त्यावर उतरले. त्यांनी सुरुवातीला आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना अभिवादन केले. तसेच दत्त चौकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करीत पदयात्रेस प्रारंभ केला.
दत्त चौकातून ही पदयात्रा भेदा चौकमर्गो तहसील कार्यालयापर्यंत नेण्यात आली. त्यामध्ये हजारो बांधवांसह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. परळी-बीड येथील मराठा समाजबांधवांच्या आंदोलनास पाठिंबा देत आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
सकाळपासून शहरात मराठा बांधवांची चौकाचौकात गर्दी दिसून येत होती. तालुक्यातील युवक या आंदोलनासाठी दाखल झाले होते. तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आल्यानंतर काकासाहेब शिंदे-पाटील यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर ठिय्या आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाजबांधवांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत राज्य शासनाचा जोरदार निषेध नोंदवला.