सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा

By नितीन काळेल | Published: April 17, 2024 07:26 PM2024-04-17T19:26:26+5:302024-04-17T19:28:22+5:30

सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सातारा शहरात तर सलग तिसऱ्या दिवशी पारा ४० अंशावर नोंद झाला. यामुळे ...

Presence of unseasonal rains in Satara district | सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा

सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा

सातारा : जिल्ह्यात उष्णतेची लाट आली असून सातारा शहरात तर सलग तिसऱ्या दिवशी पारा ४० अंशावर नोंद झाला. यामुळे नागरिकांना उन्हाळा असह्य ठरु लागला आहे. दरम्यानच, आज बुधवारी दुपारच्या सुमारास शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले. तर त्यानंतर हिवाळ्यातही थंडीची तीव्रता कमी जाणवली. मात्र, उन्हाळा असह्य ठरु लागला आहे. कारण, दरवर्षी मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत थंडी जाणवते. पण, यावर्षी मार्च उजाडताच उन्हाची तीव्रता जाणवू लागली. हळूहळू पारा वाढत गेला. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तर सातारा शहराचे कमाल तापमान ३९ अंशावर पोहोचले होते. त्याचवेळी पूर्व दुष्काळी भागातील माण, फलटण या तालुक्यात पाऱ्याने ४० अंशाचा टप्पा पार केलेला. पण, याच दरम्यान ढगाळ वातावरण झाल्याने पारा खाली आला होता. मात्र, मागील आठ दिवसांत पारा बहुतांशीवेळा ३९ अंशाच्यावर राहिला आहे. मागील तीन दिवसांत तर जिल्ह्यात उष्णतेची लाट आल्यासारखी स्थिती आहे.

सातारा शहरात सोमवारपासून पारा ४० अंशावर आहे. मंगळवारी ४०.३ अंश तापमानाची नोंद झाली. हे या वर्षातील उच्चांकी तापमान ठरले. तर बुधवारी ४०.१ अंश तापमान राहिले. सतत कमाल तापमान ४० अंशादरम्यान राहत असल्याने दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत रस्त्यावर तुरळक वाहने दिसतात. तसेच बाजारपेठेतही गर्दी जाणवत नाही. माण, खटाव, फलटण तालुक्यातील पाराही वाढला आहे. ४१ अंशावर तापमान जात असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, सातारा शहरवासियांना उष्णतेमुळे घराबाहेर पडणे अवघड झाले असलेतरी बुधवारी दुपारच्या सुमारास अवकाळी पाऊस झाला. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. शहरातील काही भागातच पावसाची हजेरी होती. पण, याने उकाड्यापासून काहीसा दिलासा दिलेला आहे.

सातारा शहरातील कमाल तापमान असे :

दि. १ एप्रिल ३९, २ एप्रिल ३९.२, ३ एप्रिल ३९.२, ४ एप्रिल ३९.८, ५ एप्रिल ३९.७, दि. ६ एप्रिल ३९.७, ७ एप्रिल ३८.८, ८ एप्रिल ३८.७, ९ एप्रिल ३९.२, दि. १० एप्रिल ३९.१, ११ एप्रिल ३९.२, १२ एप्रिल ३६.७, १३ एप्रिल ३७.९, १४ एप्रिल ३९.६, दि. १५ एप्रिल ४०.१, १६ एप्रिल ४०.३ आणि दि. १७ एप्रिल ४०.१

Web Title: Presence of unseasonal rains in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.