'कॉलर स्टाइल'ची खिल्ली उडवणाऱ्या पवारांबद्दल उदयनराजे म्हणाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 12:29 IST2018-05-13T22:54:20+5:302018-05-14T12:29:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कॉलरबाजीवर उदयनराजे दिली 'ही' प्रतिक्रिया

'कॉलर स्टाइल'ची खिल्ली उडवणाऱ्या पवारांबद्दल उदयनराजे म्हणाले...
कराड : ‘कॉलर उडविणे ही तर माझी स्टाईल आहे, शरद पवार यांच्यासारख्या एका आदरणीय व्यक्तिमत्त्वानं त्याचं अनुकरण केलं यातच मला आनंद आहे. असे सांगत सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मीच असणार,' असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी (13 मे) पत्रकारांशी बोलताना केले. कराड येथे खासदार उदयनराजे भोसले एका सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विजयसिंह यादव, हणमंत पवार यांचीदेखील उपस्थिती होती.
‘काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये तुमच्यावर कॉलरबाबत टिप्पणी केली होती,’ असे माध्यमांच्या प्रतिनिधींनी छेडले असता उदयनराजे म्हणाले, ‘ते राजकारणातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. आज या वयातही त्यांच्याकडे काम करण्याचा असणारा उत्साह आपल्याला लाजवणारा आहे. त्यांच्या अनेक बाबींचं मी अनुकरण करत असतो; पण परवा त्यांनी साता-यात माझ्या स्टाईलचं अनुकरण केलं, याचा मला आनंद वाटतो.’
('मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा)
तुमच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारांनी पाठ फिरविली होती. मग आता राजधानी महोत्सवाचे त्यांना निमंत्रण दिले आहे का? असे विचारताच ते म्हणाले, ‘होय मी याही कार्यक्रमाचे सा-यांना निमंत्रण दिले आहे. यायचं की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. शिवाय मला ते बोलवत नाहीत. नाही तर म्हणतील त्या कार्यक्रमाला मी जाऊ शकतो.’
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तुम्ही प्लॅन बी तयार केल्याची चर्चा आहे, असे विचारता राष्ट्रवादी काँगे्रसचा लोकसभेचा उमेदवार मीच असणार, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी समोर येऊन बोलावे तुमच्या विरोधात आज टीकाटिप्पणी होत आहे. याबाबत विचारले असता ‘ज्यांना बोलायचे आहे त्यांनी समोर येऊन बोलावे, असे आव्हान खासदार उदयनराजे यांनी दिले.