'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2018 01:41 PM2018-05-09T13:41:59+5:302018-05-09T13:41:59+5:30

खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाइलवर मार्मिक टिप्पणी करत पवारांनी त्यांना चिमटा काढला आहे.

sharad pawar taunts udayanraje bhosale | 'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा

'मी आलो की कॉलर खाली येते'; उदयनराजेंच्या 'स्टाइल'वरून शरद पवारांचा चिमटा

Next

साताराः राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मुरब्बी नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हसत-हसतही एखाद्याची कशी विकेट काढतात, याचा प्रत्यय आज साताऱ्यात आला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलर उडवण्याच्या 'स्टाइल'वर मार्मिक टिप्पणी करत पवारांनी त्यांना चिमटा काढला आणि आपली 'पॉवर' दाखवून दिली.   

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत मिष्किल फटकेबाजी केली. सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत पेचाबाबत पत्रकारांनी विचारलं असता, 'काही पेच-बीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं, उतारा वगैरे काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी (वर) असते ती कॉलर अशी (खाली) होते', असा टोमणा त्यांनी उदयनराजेंना मारला आणि एकच हशा पिकला.   

केंद्रातील आणि राज्यातील राजकीय घडामोडींवरही शरद पवार यांनी यावेळी मतं मांडली. देशातील वातावरण बदलाला अनुकूल असल्याचं ते म्हणाले. परंतु, आम्ही सरकारपर्यंत पोहोचू का, किती जागा मिळतील, हे आत्ताच सांगता येणार नाही, असंही त्यांनी नमूद केलं. 

दरम्यान, या पत्रकार परिषदेनंतर काही काळ हॉलचा दरवाजाच उघडत नव्हता. त्यामुळे भल्याभल्यांची राजकीय कोंडी करणारे शरद पवार काही काळ खोलीतच अडकून पडले होते. दहा-पंधरा मिनिटांनी दरवाजा उघडण्यात कार्यकर्त्यांना यश आलं आणि पवार बाहेर पडले.

Web Title: sharad pawar taunts udayanraje bhosale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.