Lok Sabha Election 2019 भाजपची बेरीज; राष्ट्रवादीचा गनिमी कावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 11:05 PM2019-04-11T23:05:38+5:302019-04-11T23:06:08+5:30

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूक चुरस आणि प्रतिष्ठेची ठरत असून, भाजपकडून ...

Lok Sabha Election 2019 BJP's sum; NCP's Guerrilla Cava | Lok Sabha Election 2019 भाजपची बेरीज; राष्ट्रवादीचा गनिमी कावा

Lok Sabha Election 2019 भाजपची बेरीज; राष्ट्रवादीचा गनिमी कावा

Next

नितीन काळेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : माढा लोकसभा मतदार संघातील निवडणूक चुरस आणि प्रतिष्ठेची ठरत असून, भाजपकडून बेरजेचे राजकारण सुरू आहे. तर विरोधी राष्ट्रवादी पक्ष मात्र गमिनी कावा करण्याच्या भूमिकेत आहे. मुख्यमंत्र्यांनी तर विविध आश्वासने देऊन इतर पक्षातील अनेकांना भाजपच्या वळचणीला आणले असून, राष्ट्रवादी आहे त्या शिलेदारावर गनिमी काव्याने लढत आहे.
माढा मतदार संघातील ही तिसरी निवडणूक खऱ्या अर्थाने भाजप आणि राष्ट्रवादीतच होत आहे. त्यातच संजय शिंदे यांनी भाजपचे सहकार्य घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले; पण नंतर भाजपलाच ठेंगा दाखविल्यामुळे मुख्यमंत्र्यांसह भाजप मंत्र्यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यातूनच मतदार संघात बेरजेचे राजकारण सुरू झाले.
माढा मतदार संघातील व विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीवर नाराज होते. याचाच फायदा भाजपने घेतला. त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह यांना त्यांनी पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर आता काँग्रेसचे सोलापूरचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण काळे यांनीही ‘हातात’ कमळ घेतले. रणजितसिंह मोहिते म्हणजेच पर्यायाने विजयसिंह मोहिते यांची माळशिरस तालुक्यात मोठी ताकद असून, अनेक कारखाने, सहकारी संस्थांवर वर्चस्व आहे. मोहित्यांची ही ताकद कमळासाठी भारी ठरणार आहे. कल्याण काळे यांनी २०१४ ची विधानसभा निवडणुकीत माढ्यातून काँग्रेसकडून निवडणूक लढविलेली. त्यावेळी विद्यमान आमदार बबन शिंदे यांना जोराची लढत देत ६० हजारांहून अधिक मते घेतली होती. तसेच त्यांच्याकडे साखर कारखाने असून, अनेक गावांत व्होट बँक आहे. या जोरावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यासाठी गळ लावला आणि यशस्वीही झाले. काळे यांच्यावर माढ्याबरोबरच पंढरपूर परिसरातील गावांची मदार राहणार आहे.
माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचे चांगले मित्र. त्यांनीही अपेक्षेप्रमाणे रणजितसिंहांना मदत करण्याचीच भूमिका घेतलीय. मित्रासाठी त्यांनी राष्ट्रवादीला अंगावर घेतलंय. दोन दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन राष्ट्रवादीवर तोफ डागलीय. त्यामुळे आमदार गोरेंच्या मनात काय असणार, हे स्पष्ट झालंय.
आमदार गोरेंचे बंधू शेखर गोरे यांनी तर राष्ट्रवादीला रामराम केलाय. पुढील पक्षीय भूमिका ठरविली नसलीतरी त्यांनी भाजपच्या रणजितसिंहांना मदत करण्याचे जाहीर केलंय. शेखर गोरे कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांचा स्वतंत्र गट आहे. तरुणांची फळी त्यांच्या पाठीशी असते. या फळीवरच त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. आता तर त्यांनी राष्ट्रवादीत जाऊन पश्चाताप झाल्याची कबुली देत निवडणुकीत धडा शिकविण्याचा इशारा दिलाय.
माढा मतदारसंघात राष्ट्रवादी सध्या आपल्या मोजक्या शिलेदारांच्या मदतीने प्रचारात उतरली आहे. त्यांना सांगोला तालुक्यातून शेकापचे आमदार गणपतराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांची साथ आहे. पण, कार्यकर्त्यांना अधिक सावध राहण्याच्या सूचना पक्षाच्या नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार नेते आणि कार्यकर्ते यांच्या मदतीने प्रचारकी थाटाऐवजी गनिमी काव्याने सुरू आहे.

राष्ट्रवादीला मित्रपक्ष काँग्रेसची साथ हवी...
फलटण तालुक्यात राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे आपले दोघे बंधू आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या मदतीने खिंड लढवत आहेत. तर माण तालुक्यात माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हे प्रयत्न करतात; माढा मतदार संघात सोलापूर जिल्ह्यातील जे विधानसभा मतदासंघ येतात, त्यामधील माढ्याचे आमदार बबन शिंदे, सांगोल्याचे शेकापचे आमदार गणपतराव देशमुख आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी व शिलेदारांवरच संजयमामांचे भवितव्य अवलंबून आहे. माण आणि फलटण तालुक्यात काँग्रेस कुठे आहे व आपल्या बाजूने आहे का? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मपरिक्षण करावे लागणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रामाणिक काम केले तरच याठिकाणी पक्षाचे भवितव्य टिकून राहणार आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019 BJP's sum; NCP's Guerrilla Cava

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.