कऱ्हाडात पावलोपावली ‘जोर का झटका’

By admin | Published: March 4, 2015 09:33 PM2015-03-04T21:33:44+5:302015-03-04T23:39:53+5:30

सावधान... इथं घोटाळतोय मृत्यू : उघड्या फ्यूजबॉक्स, ट्रान्सफॉर्मरमधून वीजप्रवाह सुरूच, रहदारीच्या ठिकाणी धोका---आॅन दि स्पॉट रिपोर्ट

Karhadat Pavlopavali 'blow of blow' | कऱ्हाडात पावलोपावली ‘जोर का झटका’

कऱ्हाडात पावलोपावली ‘जोर का झटका’

Next

संतोष गुरव - कऱ्हाड  - अपघात कधी सांगून होत नाही; पण अपघात घडेल, अशी स्थिती असेल तर प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागतं. कऱ्हाडातही सध्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जपूनच चालावं लागतंय. वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शहरात पावलोपावली मृत्यू घोटाळतोय. उघडे फ्यूजबॉक्स, गंजलेल्या पेट्या आणि लोंबकळणाऱ्या वायरमुळे ‘जोर का झटका’ कधी बसेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊनच रस्त्यावरून वावरतायत.
शहरात वीज वितरणासाठी मुख्य चौकासह अंतर्गत पेठांमध्ये फ्यूजबॉक्स तसेच ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, कृष्णा नाका, जनता बँकेसमोरील चौक, मंगळवार पेठ, कन्याशाळा, नवीन भाजी मंडई परिसर, शुक्रवार पेठ, सोमवार पेठ, कृष्णामाई घाट परिसर, शुक्रवार पेठ अशा पेठांसह विविध ठिकाणी शेकडो फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर आहेत. मात्र, यातील बहुतांश ट्रान्सफॉर्मर व फ्यूजबॉक्स उघड्यावर आहेत. दरवाजे नसल्याने त्यातील वायर बाहेर लोंबकळत आहेत. संबंधित वायरमधून विद्युत प्रवाह सुरू असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात काही ठिकाणी वीजवितरण कंपनीने भूअंतर्गत वीजवाहक तारांच्या जोडण्या केल्या आहेत. तसेच फ्यूजपेट्या रस्त्यापासून तीन ते चार फुटांवर आहेत.
उपजिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या चौकात वीजवितरणचा ट्रान्सफॉर्मर आहे. फूटपाथलगतच असणाऱ्या या ट्रान्सफॉर्मरशेजारून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते. तसेच कृष्णा नाका येथील चौकात असाच एक ट्रान्सफॉर्मर व फ्यूजबॉक्स आहे. वीज कंपनीकडून फूटपाथवरच काढण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिक चोवीस तास मृत्यूच्या दाढेत आहेत. या दोन्ही ट्रान्सफॉर्मरची परिसरातील नागरिकांमध्ये भीती आहे.
रस्त्यावर उघड्या अवस्थेत असलेल्या फ्यूजपेट्यांमुळे लहान मुलांसह वयोवृद्ध लोकांचाही जीव धोक्यात असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते. जनता बँक, मंगळवार पेठेतील शिवाजी मंडळाच्या क्रीडांगणासमोरील फ्यूजबॉक्सवरील पेटीच्या काचा फुटल्या आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी जात आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना घडू शकते. वीज कंपनीने फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मरवर ‘सावधान’ अशी सूचना लिहिली असली तरी अशा परिस्थितीमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत आहे.


फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर
स्टेट बँकसमोरील पादचारी मार्गावर असलेला फ्यूजबॉक्स
जनता बँकेसमोर वळणावर असलेला फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर
उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकात असलेला ट्रान्सफॉर्मर
कृष्णा नाका चौकातील सिग्नलनजीक फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर
मंगळवार पेठ येथील फ्यूजपेटीची काच फुटली आहे.
लाहोटी कन्या प्रशालेशेजारील डीपीवर एका संघटनेने लावलेला फलक
नवीन भाजी मंडई परिसरातील ट्रान्सफॉर्मरला कचऱ्याचा वेढा

वीज कंपनीमधील कर्मचारी फ्यूजपेट्याच्या दुरुस्तीसाठी साधे फिरकत सुध्दा नाहीत. उघड्यावर असलेल्या ट्रान्सफॉर्मर व त्यावरील फ्यूजपेटीची अवस्था पाहिल्यास त्याच्या जवळ जाणेही धोक्याचे वाटते. परिसरातील लहान मुले त्याठिकाणी जाऊ नयेत, यासाठी आम्हाला लक्ष द्यावे लागते.
- हेमंत जाधव,
नागरिक, शुक्रवार पेठ

विद्यार्थ्यांनाही धास्ती
स्थानक ते महिला महाविद्यालय मार्गावरील पादचारी रस्त्यावर तीन ठिकाणी ट्रान्सफॉर्मर व डीपी बसवण्यात आले आहेत. पहिला ट्रान्सफॉर्मर स्टेट बँक आॅफ इंडियासमोरील पादचारी मार्ग, दुसरा जनता बँकेसमोर, तिसरा कृष्णा नाका सिग्नल चौकात आहे. या ट्रान्सफॉर्मरच्या जवळून जाताना पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

गंजक्या फ्यूजपेटीत तारा नव्या कोऱ्या
कऱ्हाड शहरातील रस्त्याकडेला असणाऱ्या फ्यूजपेट्यांची अवस्था खूप गंभीर बनली आहे. काही ठिकाणी बसवण्यात आलेल्या फ्यूजपेट्यांना गंज चढला असून, त्यातील तारा मात्र नव्या कोऱ्या आहेत.


अकरा ठिकाणी
मृत्यूला निमंत्रण
शहरातील अकरा ठिकाणी सध्या अत्यंत धोकादायक ट्रान्सफॉर्मर व फ्यूजबॉक्स आहेत. काहीच्या संरक्षक काचा फुलेल्या आहेत तर काहीची भंगारात घालण्यासारखी अवस्था झाली आहे. हे फ्यूजबॉक्स व ट्रान्सफॉर्मर मृत्यूला निमंत्रण देत आहेत.

वीज कंपनीकडून
फक्त वसुली
दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विजेची बिल वसूल वीज कंपनीकडून न चुकता केली जाते. प्रत्येक महिन्याला न चुकता वीजबिले दिली जातात. मात्र, वाकलेले खांब, गंजलेल्या फ्यूजपेट्यांच्या दुरुस्तीकडे वीज कंपनी दुर्लक्ष करते.

Web Title: Karhadat Pavlopavali 'blow of blow'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.