सातारा - वायुस्वरूपातील देवीची आराधना करून पंचमहाभुतं आनंदी ठेवण्यासाठी शहरात घागर फुंकण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
चितपावन ब्राह्मण समाजात नवरात्रोत्सवात तांदळाच्या कणकेपासून देवीचा मुखवटा तयार करून सकाळी पूजा अर्चा केली जाते. जमिनीतून येणारी आणि न मरणारी वनस्पती म्हणून दुर्वांची ओळख आले. या दुर्वांचा सातू  देवीला अर्पण केला जातो. ज्ञान देणारी दुर्वा म्हणून ज्ञान स्वरूपी दुर्वाची या पुजेसाठी आवश्यक असतात. 
सकाळी उभ्या करण्यात आलेल्या देवीला संध्याकाळी समृध्दीचं प्रतिक असलेले रेशमी सातू वाहिले जातात. त्यानंतर महिला देवीचा जागर करतात. पितळेची घागर अग्निवर धुपवली जाते. धुपाचा धुर घागरीत साठल्यानंतर ती घागर सरळ केली जाते. त्यानंतर ही घागर दोन्ही हातांनी पकडून त्यात महिला फुंकर मारतात. घागरीतील धुर आणि फुंकर यामुळे विशिष्ट आवाजाचा नाद तयार होतो. हा नाद देवीला प्रिय असल्याचे मानले जाते. 
 
नवविवाहित महिला हे व्रत करतात. हे व्रत पाच वर्षांचे असते.यात पहिल्या वर्षी नदीतील वाळुचा १ खडा, दुस-या वर्षी दोन खडे असे करत पाचव्या वर्षी पाच खडे आाणावे लागतात. वाळूतील खडे आणून त्यांची पूजा करणं म्हणजे जल देवतेची पुजा मानली जाते. पाचव्या वर्षी अष्टीला देवीचा तांदळाच्या पिठाच्या उकडीचा मुखवटा तयार करून देवीची पुजा बांधली जाते. पंचमहाभुंत आनंदी व प्रसन्न रहावीत, यासाठी प्रामुख्याने देवीची ही पुजा अष्टमीला करण्यात येते.