पोलिसांच्या ताब्यातील पाच लाखांचे टायर गेले चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 03:42 PM2019-03-15T15:42:06+5:302019-03-15T15:47:10+5:30

चोरीतील जप्त केलेले लाखो रुपयांचे टायर उंब्रज पोलिसांच्या ताब्यातून चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या घटनेच्या चर्चेमुळे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून हे प्रकरण पोलिसांनी गोपनीयच ठेवले होते.

Five lakh tires of police custody were stolen | पोलिसांच्या ताब्यातील पाच लाखांचे टायर गेले चोरीला

पोलिसांच्या ताब्यातील पाच लाखांचे टायर गेले चोरीला

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसांच्या ताब्यातील पाच लाखांचे टायर गेले चोरीलाअब्रूचे धिंडवडे : दहा महिन्यांपूर्वीच्या घटनेत दोघांना अटक

उंब्रज : चोरीतील जप्त केलेले लाखो रुपयांचे टायर उंब्रज पोलिसांच्या ताब्यातून चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळजनक घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, या घटनेच्या चर्चेमुळे पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे निघू नयेत म्हणून हे प्रकरण पोलिसांनी गोपनीयच ठेवले होते. शुक्रवारी या चोरीप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आणि गत दहा महिन्यांपासून दडपून ठेवलेले चोरीचे हे प्रकरण उजेडात आले.

९ आॅक्टोबर २०१८ रोजी उंब्रज पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी जोतिराम भुजबळ यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ मे २०१८ रोजी मुद्देमाल कारकून असलेल्या फिर्यादी जोतिराम भुजबळ यांना पोलीस ठाण्यातील स्वीपर राजेंद्र्र कोळी यांचा फोन आला की, पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाच्या रूममध्ये ठेवण्यात आलेल्या जप्त मुद्देमालमधील टायर नाहीत.

रूम उघडी आहे. त्यानंतर जोतिराम भुजबळ यांनी माहिती घेतल्यानंतर त्यांना समजले की, संबधित रूममध्ये २००० च्या गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले टायर ठेवण्यात आलेले आहेत. तो मुद्देमाल ६ ते ७ वर्षांपासून तेथे होता. त्यानंतर भुजबळ यांनी त्या रूमची पाहणी केली. तेव्हा त्यांना जप्त मुद्देमाल टायर तेथे आढळून आले नाहीत.

भुजबळ यांनी शेजारच्या शासकीय रूम व इतरत्र संबधित टायराचा शोध घेतला. मात्र, टायर न सापडल्यामुळे उंब्रज पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली. तत्कालीन किमतीनुसार ४ लाख ९४ हजार रुपयांचे ६१ टायर अज्ञात चोरट्यांनी शासकीय निवासस्थानातील रुमचे कुलूप तोडून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले होते. या फिर्यादीवरून संबंधित पोलीस अधिकारी यांनी तपास सुरू केला होता. परंतु ही बाब आजअखेर गोपनीयच ठेवण्यात आली होती.

दरम्यान, उंब्रज पोलीस ठाण्याचा कार्यभार नुकताच सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी घेतला आहे. त्यांच्यासोबत उंब्रज बीटचा कार्यभार पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना भाविस्टे यांनी घेतला आहे. काही दिवसांत या अधिकाऱ्यांनी या चोरीप्रकरणाचा छडा लावला. या चोरीप्रकरणी उंब्रज पोलिसांनी सनी आबा बैले (वय २९, रा. उंब्रज) व बरकत खुद्दबुदीन पटेल (वय ३०, रा. वहागाव, ता. कऱ्हाड ) या दोन संशयितांना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना भाविस्टे तपास करत आहेत.

कुंपणच खातंय का शेत?

उंब्रज पोलिसांच्या ताब्यातील लाखो रुपयांचे टायर चोरट्यांनी चोरून नेले. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांनाही अटक केली आहे; परंतु पोलीस ठाण्यातील लाखो रुपयांचे टायर चोरून नेणे, ही किरकोळ बाब नाही. याठिकाणी नक्कीच कुंपणच शेत खात असणार, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असून, या कुंपणाचा शोध पोलीस घेणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.


पोलिसांच्या ताब्यातून टायर चोरीस गेल्याची फिर्याद यापूर्वीच दाखल झाली आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करणार आहोत. गुन्ह्यात जो सहभागी असेल त्याला नक्कीच अटक केली जाईल.
- ज्योत्स्ना भाविस्टे
पोलीस उपनिरीक्षक, उंब्रज

Web Title: Five lakh tires of police custody were stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.