अमोलच्या वर्दीसाठी कुटुंबीयांचा संघर्ष! दोन वर्षांपासून कुटुंबाचा लढा : अपघातानंतर कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:42 AM2018-07-18T00:42:53+5:302018-07-18T00:44:30+5:30

Family struggle for Amol's uniform! Family fight for two years: after the accident, Kamat | अमोलच्या वर्दीसाठी कुटुंबीयांचा संघर्ष! दोन वर्षांपासून कुटुंबाचा लढा : अपघातानंतर कोमात

अमोलच्या वर्दीसाठी कुटुंबीयांचा संघर्ष! दोन वर्षांपासून कुटुंबाचा लढा : अपघातानंतर कोमात

Next
ठळक मुद्दे; प्रकृतीत सुधारणा; आर्थिक मदतीची गरज

अजय जाधव ।
उंब्रज : नुकत्याचकर्तव्य बजावत असताना वाहनाने धडक दिल्यामुळे गंभीर जखमी झालेले पोलीस कर्मचारी कोमात गेले. त्यानंतर गत दोन वर्षांपासून त्यांना पुन्हा वर्दीत पाहण्यासाठी आणि स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्या कुटुंबाची धडपड सुरू आहे. मात्र, या प्रयत्नांना यश येत असतानाच कुटुंब आर्थिक गर्तेत सापडले असून, वर्दीतल्या या युवकाच्या उपचारासाठी सध्या आर्थिक हातभाराची गरज आहे.

सातारा तालुका पोलीस ठाण्यात कर्तव्यास असताना पोलीस कर्मचारी अमोल अंकुश कांबळे यांचा अपघात १४ सप्टेंबर २०१६ रोजी झाला. साताऱ्यानजीक रायगाव फाटा येथे हा अपघात झाला. अमोल हे आपल्या सहकाºयांसह कर्तव्य बजावण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एका गाडीने त्यांना चिरडले. यामध्ये पोलीस कर्मचारी नितीन जमदाडे ठार झाले तर अमोल कांबळे व पोलीस होमगार्ड गजेंद्र बोरडे हे गंभीर जखमी झाले. अमोल यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघातानंतर अमोल हे सुमारे एक महिना कोमात होते. नंतर शुद्धीवर आले. वर्षभर ते फक्त जीवन मरणाची लढाई लढत होते. वर्षांनतर त्यांनी डोळे उघडले. आता ते आलेल्या लोकांना ओळखू लागलेत. आधारावर उभे राहू लागलेत. बोलता मात्र अजूनही येत नाही. परंतु त्याच्या तब्येतीमध्ये सकारात्मक बदल घडू लागले आहेत.

अपघातानंतर दवाखान्याचा खर्च पोलीस दलाच्या वतीने करण्यात आला. त्यानंतरच्या औषधांचा खर्च सातारा जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे. दरम्यान हे कुटुंब अपघातानंतर एक वर्ष सातारा येथे राहत होते. तेथील खर्च अमोलचे चुलत बंधू प्रकाश कांबळे यांनी केला. त्यानंतर अमोलसह त्याचे कुटुंबीय आपल्या मूळगावी मसूर येथे मुक्कामी आले आहे.

अमोल यांची प्रकृती सुधारत असताना कुटुंबाचे अर्थकारण मात्र पूर्णपणे कोलमडून पडले आहे. वडिलांनी रोजगार सोडून अमोलच्या सेवेसाठी पूर्ण वेळ दिला आहे. धाकटा भाऊ अतुल याने अकरावीमधून शिक्षण बंद केले आहे. हॉटेलमध्ये वेटर म्हणून तो काम करत आहे. सध्या अमोल यांना महिन्यातून एकदा पुणे येथे उपचारासाठी न्यावे लागते. दवाखान्याचा खर्च, प्रवास खर्च याला वीस हजार रुपये लागत आहेत. दर महिन्याला स्वत:च्या रोजीरोटीच्या खर्चाचा ताळमेळ जुळवणे अवघड असलेल्या कांबळे कुटुंबाला दर महिन्याला वीस हजार रुपये जमा करणे अवघड बनत आहे.

दोन वर्षांपासून कुटुंबाचा अमोलसाठी लढा
दोन महिने कोमात गेलेला अमोल. त्यानंतर फक्त शुद्धीवर आलेला अमोल. वर्षभरानंतर डोळे उघडणारा अमोल आणि आता आधाराने उभा राहू लागलेला अमोल हे सर्व सकारात्मक आहे. अमोल सध्या आधाराने बसतात. थोडे चालतात. यासाठी अमोल यांचे कुटुंबीय सकाळी सहा वाजल्यापासून अमोल यांच्यासाठी धडपड सुरू करत आहेत. अजूनही अमोल बोलत नाहीत; पण बोलण्याचा प्रयत्न करतायत. अमोल यांना पूर्ण बरे होण्यासाठी अजून किती वर्षे लागतील, हे सांगता येत नाही. वडील, आई, भाऊ, बहीण यांची त्याला बरे करण्याची चिकाटी मात्र तसूभरही कमी झाली नाही.
 

अमोल यांनी बोलक्या स्वभावामुळे असंख्य मित्र जोडले. मात्र, गेली दोन वर्षे तेच अबोल आहेत. वर्षभरापासून ते लोकांना ओळखतायत. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांचे अश्रू आणि त्यांना पाहून अमोल यांच्या डोळ्यातून येणारे अश्रू खूप काही सांगून जातात. आमचे काळीज फाटते; पण खचायचे नाही, हे आम्ही ठरवले आहे. काहीही झाले तरी या संकटावर एक दिवस आम्ही मात करणार. यासाठी मात्र आर्थिक मदतीची साथ मिळण्याची नितांत गरज आहे.
- कमल कांबळे, आई

Web Title: Family struggle for Amol's uniform! Family fight for two years: after the accident, Kamat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.