कार अन् टेम्पोचा भीषण अपघात, दोन ठार तर दोघे गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 18:35 IST2018-09-16T18:34:55+5:302018-09-16T18:35:25+5:30
शिरवळजवळ दुर्घटना; मृतांमध्ये राज्य खो-खो असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष व फलटणच्या नगरसेवकाचा समावेश

कार अन् टेम्पोचा भीषण अपघात, दोन ठार तर दोघे गंभीर
शिरवळ (सातारा) : आशियाई महामार्ग 47 वर खंडाळा तालुक्यातील शिरवळ हद्दीत फूल मळ्याजवळ रविवारी सायंकाळी कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार तर एकजण गंभीर व एक किरकोळ जखमी झाला आहे. हा अपघात सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झाला.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष आणि विद्यमान सल्लागार पी. जी. शिंदे (वय 77)आणि फलटण येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार (65) जागीच ठार तर माजी नगराध्यक्ष अशोकराव देशमुख (65, तिघे रा. फलटण) गंभीर तसेच अशिष लोंढे (29) हे जखमी झाले आहेत. देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले. शिरवळ पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून बेंगलोर बाजूकडे टेम्पो (एमएच 04 एफजे 8038) निघाला होता. टेम्पो शिरवळ हद्दीत फूल मळ्याजवळ आला असता पाठीमागून पुणे बाजूकडून फलटणकडे भरधाव वेगाने निघालेली कारने (एमएच 11 सीजी 9394) पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारमधील पी. जी. शिंदे आणि फलटण येथील राष्ट्रवादीचे नगरसेवक जगन्नाथ कुंभार हे जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच शिरवळ पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून पुणे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर देशमुख यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुण्याला हलविण्यात आले.