सर्व विषयांमध्ये पास असूनही विद्यापीठ म्हणते नापास!

By admin | Published: July 24, 2015 10:16 PM2015-07-24T22:16:44+5:302015-07-25T01:13:29+5:30

हजारो विद्यार्थी संभ्रमात : कला शाखेचे पहिले दोन वर्षे उत्तीर्ण असूनही अंतिम गुणपत्रिकेत केले नापास

All the subjects pass in the university says no! | सर्व विषयांमध्ये पास असूनही विद्यापीठ म्हणते नापास!

सर्व विषयांमध्ये पास असूनही विद्यापीठ म्हणते नापास!

Next

सातारा : शिवाजी विद्यापीठांतर्गत घेतल्या जात असलेल्या परीक्षा, निकाल यांचा गोंधळ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सातारा येथील एक तरुण कला शाखेतून पहिली दोन वर्षे उत्तीर्ण झालेला असताना तिसऱ्या वर्षाच्या अंतिम गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविले आहे. त्यामुळे कोल्हापूर शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सातारा, सांगली,कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.याबाबत माहिती अशी की, सातारा येथील गोरख कुंभार याने येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. तो पहिली दोन वर्षे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याने मार्च-एप्रिल २०१५ मध्ये तिसऱ्या वर्षाची परीक्षा दिली. त्याचा निकाल नुकताच लागला. हा निकाल पाहिल्यानंतर त्याचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने मार्च एप्रिल २०१५ मध्ये सहा सेमिस्टरची परीक्षा दिली आहे. इंटरनेटवर प्रसिद्ध झालेल्या निकालात सर्व विषयांत ‘पी’ दाखविलेले आहे. मात्र अंतिम निकाल पत्रिकेत त्याला अनुत्तीर्ण म्हणून जाहीर केले आहे. निकाल हातात पडल्यानंतर गोरख कुंभार याने सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापनाशी संपर्क साधला. त्यांनी ही चूक विद्यापीठाकडून झाल्याचे सांगत विद्यापीठाशीच संपर्क साधण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कुंभार हे दोन-तीन वेळा विद्यापीठात जाऊनही आले. त्याठिकाणी योग्य ती दखल न घेतल्याने कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एक पत्र देऊन निकाल बदलून देण्याची विनंती केली आहे. प्रकारच्याच तक्रारी असलेल्या हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत आहेत. परीक्षा नियंत्रण मंडळांशी त्यांनी संपर्क साधला असता विद्यार्थ्यांशी चांगली वागणूक दिली जात नाही. एका टेबलवरून दुसरीकडे फिरविले जात आहे. (प्रतिनिधी)

निकाल लागून महिना संपत आला तरी बदल झालेला नाही. एम.ए. प्रवेशासाठी ३० जुलै हा अंतिम मुदत आहे. त्यामुळे पुढील वर्ष वाया जाऊ शकते. विद्यापीठात गेलो असता तेथेही आम्हाला हिन वागणूक देण्यात आली आहे. आम्ही कोणताही गुन्हा केलेला नसताना आत जाण्यास रोखले.
- गोरख कुंभार, परीक्षार्थी

चार हजार विद्यार्थ्यांपुढे तुझं काय होणार?
गोरख कुंभार यासंदर्भात विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटला असता अनोखाच अनुभव आला. ‘विद्यापीठात चार हजार विद्यार्थी आहेत. त्यात तुझं एकट्याचं काय घेऊन बसलास. तू कुठंही गेला तरी काही फरक पडणार नाही,’ असा सज्जड दमच त्या महाशयांनी भरला.

सुरक्षारक्षकाकडून धक्काबुक्की
कोणतेही विद्यापीठ हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानमंदिर असते. या ज्ञानमंदिरात गेलेल्या विद्यार्थ्यांना अनोखाच अनुभव येत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी विद्यापीठात येत असतात. विद्यापीठातील सुरक्षारक्षकांकडून धक्काबुक्की सहन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

Web Title: All the subjects pass in the university says no!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.