विशाल पाटील यांची कबुली : सांगलीत काँग्रेस नेत्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 09:51 PM2019-03-01T21:51:25+5:302019-03-01T21:54:08+5:30

सांगली : विधानपरिषदेच्या निवडणुकीत आमदार मोहनराव कदम यांच्याविरोधात घेतलेली भूमिका ही घोडचूक होती, यापुढे अशा चुका होणार नाहीत, अशी ...

Vishal Patil confesses: Sangli Congress leaders meeting | विशाल पाटील यांची कबुली : सांगलीत काँग्रेस नेत्यांची बैठक

विशाल पाटील यांची कबुली : सांगलीत काँग्रेस नेत्यांची बैठक

Next
ठळक मुद्देविधानपरिषदेसाठी कदम यांना विरोध ही घोडचूक

सांगली : विधानपरिषदेच्या निवडणुकीत आमदार मोहनराव कदम यांच्याविरोधात घेतलेली भूमिका ही घोडचूक होती, यापुढे अशा चुका होणार नाहीत, अशी कबुली वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी शुक्रवारी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली. दरम्यान, सांगलीची जागा काँग्रेसची असून ती पक्षच लढवेल, मागील चुका विसरून सर्वांनी जिद्दीने कामाला लागावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची बैठक जिल्हाध्यक्ष आ. कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला जिल्हा सहायक प्रभारी संजय पाटील, विशाल पाटील, विक्रम सावंत, रवी देशमुख, आप्पासाहेब शिंदे, आप्पाराया बिराजदार, नामदेवराव मोहिते, बाळासाहेब गुरव, मालन मोहिते, युवकचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष सौरभ पाटील, अजित ढोले, जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले आदी उपस्थित होते.

विशाल पाटील म्हणाले की, सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कदम कुटुंबीयांना आम्ही विरोध केला होता. ती मोठी घोडचूक होती. मात्र आता अशी घोडचूक परत होणार आहे. ही चूक सुधारायची आहे. त्यासाठी विश्वजित कदम यांना लोकसभेची उमेदवारी दिली, तर आम्ही निवडून आणतो. पुणे येथे पक्षाची बैठक झाली होती. या बैठकीत कदम-पाटील वाद मिटला आहे. यापुढे पक्षवाढीसाठी एकत्रित प्रयत्न केले जाणार आहेत.

मोहनराव कदम म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ कमिट्या मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. सांगलीची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे ती काँग्रेसला मिळणार आहे. कदमांनी कधी पक्षाशी गद्दारी केली नाही आणि पुढेही होणार नाही. पक्षाने कट्टर शत्रूला उमेदवारी जरी दिली, तर त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मागील सर्व चुका विसरून काम करावे लागते. त्यामुळे पक्षवाढीसाठी जोमाने काम करणार आहे. नामदेवराव मोहिते यांनी, लोकसभेच्या निवडणुकीत घराणेशाहीचा उमेदवार बघू नये. पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी द्यावी, अशी मागणी केली.

सुभाष खोत म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन दिसत नाही. सांगलीतील काँग्रेस कमिटीऐवजी मुंबई, पुण्यातील खासगी जागेत बैठका होतात. पक्ष इच्छुक नसल्याचे सर्वांना वाटू लागले आहे. यापुढे पक्षाच्या बैठका काँग्रेस कमिटीतच घ्याव्यात.

सांगलीची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीला सोडू नये, अशी मागणी अनेकांनी केली. तसा ठराव कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांनी मांडला. त्याला आटपाडी तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील यांनी अनुमोदन दिले. हा ठराव केंद्र व राज्य पातळीवर काँग्रेस नेत्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. अनेक तालुकाध्यक्षांनी, सांगली लोकसभेसाठी पक्षाने लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी केली. बैठकीत काँग्रेसचे सहायक प्रभारी संजय पाटील यांची किसान काँग्रेस सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार मोहनराव कदम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

११ पासून मतदारसंघात बैठका
लोकसभा निवडणुकीसाठी ११ मार्चपासून मतदारसंघात तालुकानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. ११ रोजी सकाळी आटपाडीत, दुपारी खानापूरला, १३ रोजी सकाळी जत, दुपारी कवठेमहांकाळ, १४ ला सकाळी कडेगाव व दुपारी पलूसला, तर १५ मार्चला सकाळी तासगावात, तर दुपारी मिरज तालुक्याची बैठक होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, माजी आमदार व सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे आ. मोहनराव कदम यांनी सांगितले.

Web Title: Vishal Patil confesses: Sangli Congress leaders meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.