निर्यातक्षम द्राक्षबागा पाण्याअभावी संकटात

By admin | Published: October 8, 2016 12:22 AM2016-10-08T00:22:25+5:302016-10-08T00:36:06+5:30

खानापूर घाटमाथ्याला पावसाची हुलकावणी : शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

In trouble with exportable grapefruit water | निर्यातक्षम द्राक्षबागा पाण्याअभावी संकटात

निर्यातक्षम द्राक्षबागा पाण्याअभावी संकटात

Next

पांडुरंग डोंगरे --खानापूर -पावसाअभावी खानापूर पूर्व भागातील शेतकऱ्यांची फारच केविलवाणी अवस्था झाली आहे. एकही मोठा पाऊस न झाल्याने घाटमाथ्यावरील सर्वच तलाव कोरडे ठणठणीत आहेत. आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आगामी रब्बी, द्राक्ष हंगाम पार पडणार का?, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याचा सर्वाधिक फटका पळशी परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना बसला आहे.
राज्यात जोरदार पाऊस पडत आहे. सर्व मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. मात्र याला खानापूर तालुक्यातील पूर्वभाग अपवाद ठरला आहे. वळीव पाऊस नाही व परतीचाही पाऊस नाही. मोसमी पाऊसही जेमतेम झाला आहे. अशा विचित्र स्थितीत खानापूर घाटमाथा सापडला आहे. परिणामी, घाटमाथ्यावरील सर्व पाझर तलाव कोरडे ठणठणीत आहेत.
सुलतानगादे साठवण तलावात एक थेंबही पाणी नाही. गेल्या दोन वर्षांपासून अग्रणी नदीवर जलयुक्त शिवार तसेच शासनाच्या अन्य योजनांमधून बांधलेले बलवडी (खा.), बेणापूर, सुलतानगादे, खापरगादे, करंजे येथील सर्व बंधारे पावसाअभावी कोरडे आहेत. सर्व ओढे, नाले कोरडेच राहिल्याने कूपनलिकांसह विहिरींची पाणी पातळीही खालावली आहे.
कमी पावसाचा सर्वाधिक फटका निर्यातक्षम द्राक्षबागांना बसला आहे. सध्या द्राक्षबागांच्या आॅक्टोबर छाटणीचा हंगाम सुरू आहे. छाटणीपासूनच पाणीटंचाई सुरू झाल्याने द्राक्षबागांची छाटणी घ्यायची की नाही?, असा प्रश्न द्राक्ष बागायतदारांना पडला आहे. खानापूर घाटमाथ्यावर द्राक्षबागांचे सर्वाधिक क्षेत्र पळशी येथे आहे. पळशीतील द्राक्षशेती १०० टक्के निर्यातक्षम स्वरूपाची आहे. या परिसरात ३०० एकरापेक्षा जास्त क्षेत्र असून, सर्व शेतकऱ्यांना पाण्याचाच प्रश्न भेडसावत आहे.
गतवर्षीचा हंगाम कसातरी पार पडला. २०१३ व २०१४ ला गारपिटीने, तर २०१४-१५ मध्ये अवकाळी पावसाने द्राक्षांचे मोठे नुकसान झाले. गेल्या तीन ते चार वर्षांपासून टॅँकरने पाणी घालून येथील द्राक्षबागा जगविल्या आहेत. यावर्षीही पाणीटंचाई जाणवू लागल्याने टॅँकरशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. टॅँकरसाठी पाणी कुठून आणायचे?, असा प्रश्नही आहे. हंगाम कसे पार पडणार, की दुष्काळाचा सामना करावा लागणार, अशी परिस्थिती घाटमाथ्यावर निर्माण झाली आहे.


हे व्हायला हवे...
खानापूर घाटमाथ्यास कायमस्वरूपी पाण्याची गरज आहे. त्यासाठी टेंभूच्या पाचव्या टप्प्याचे काम लवकर सुरू करून पाणी अग्रणी नदी व खानापूर ओढ्यात टाकण्याची आवश्यकता
पळशी येथील द्राक्षबागा तीन वर्षांपासून टॅँकरने पाणी देऊन जगविल्या. यंदाही पाणी टंचाई असल्याने टॅँकरसाठी पाणी उपलब्ध करून देण्याची गरज
टेंभूच्या जकाईदरा (मानेवाडी) येथील कालव्यामधून पाणी उचलण्यासाठी पळशी येथील शेतकऱ्यांच्या आग्रही मागणीचा विचार व्हावा
दुष्काळग्रस्त पळशी परिसरातील निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांनी पाण्यासाठी गट शेती करण्याचा निर्णय घेतला असून, त्याला शासनाने सहकार्य करण्याची मागणी

Web Title: In trouble with exportable grapefruit water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.