Sangli: बाळा, तुला लाल दिव्याच्या गाडीतूनच यायला लागतंय.!; बापाच्या स्वप्नाला जिगरबाज पोराने घातली गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 04:14 PM2024-03-30T16:14:39+5:302024-03-30T16:16:40+5:30

चंद्रमौळी घरावर लुकलुकणार लाल दिवा

The father instilled in his son the dream of becoming an officer and Bhushan Mane of Islampur became the Deputy Superintendent of Police | Sangli: बाळा, तुला लाल दिव्याच्या गाडीतूनच यायला लागतंय.!; बापाच्या स्वप्नाला जिगरबाज पोराने घातली गवसणी

Sangli: बाळा, तुला लाल दिव्याच्या गाडीतूनच यायला लागतंय.!; बापाच्या स्वप्नाला जिगरबाज पोराने घातली गवसणी

युनूस शेख

इस्लामपूर : बाळा, तू लाल दिव्याच्या गाडीतूनच आला पाहिजेस.! अशा शब्दांत बापाने स्वप्न पेरलं अन् या जिगरबाज पोराने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर तब्बल ४ पोस्ट काढल्या आणि पाचव्या वेळी पोलिस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. त्याच्या या कर्तृत्वाने आता चंद्रमौळी घरावर खाकी वर्दीतला लाल दिवा लुकलुकणार आहे.

ही कहाणी आहे, भूषण दत्तात्रय माने या जिद्दी आणि हुशार युवकाची. सामान्य मध्यमवर्गीय कुटुंब. आजी-आजोबा कळकाच्या काड्यांपासून सुप, पाट्या, कणग्या, दुरडी बनवायचे, तर वडील एका बँकेत शिपाई होते. अशा जेमतेम परिस्थितीत भूषण आपली शाळेतील बौद्धिक चुणूक दाखवत होता. दारू गुत्त्यांचा विळखा आणि उनाड, टपोऱ्यांचा गलका अशा विचित्र वातावरणात भूषण मात्र अभ्यासाच्या ध्यासात रमून जात होता.

काही कारणांमुळे बँक अडचणीत आली अन् बापाच्या रोजंदारीवर टाच आली. मात्र, अशा परिस्थितीतही न डगमगता दत्तात्रय माने यांनी वृत्तपत्र विक्री आणि जोडीला लॉटरी स्टॉलचा व्यवसाय करत भूषणच्या शिक्षणाचा डोंगर पेलला. मुलासाठी कितीही कष्ट उपसावे लागले, तरी चालतील या जिद्दीने पेटलेल्या बापाने प्रसंगी रिक्षाही चालवली. कर्जाचा भार पेलताना गगन भरारी घेणाऱ्या मुलासाठी त्यांनी श्रमाची पूजा बांधली.

प्राथमिक शिक्षणापासून ते सीईटी आणि मुंबईतल्या व्हीजेटीआय मधील अभियांत्रिकी पदवी मिळवेपर्यंत भूषणने आपली उच्च गुणवत्ता कायम राखली होती. त्याच्या या गुणवत्तेमुळे परदेशातील नोकरीची संधी चालून आली होती. मात्र, स्पर्धा परीक्षांचे महत्त्व जाणून असलेले भूषणचे चुलते बालेवाडीतील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचे क्रीडा अधिकारी विकास माने यांनी त्याला स्पर्धा परीक्षेचा मार्ग सुचवला.

त्यानंतर आपल्या ज्ञान साधनेचा अत्युच्च वापर करत भूषणन याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विक्रीकर, वन विभाग, गुप्त वार्ता आणि मुख्याधिकारी या पदाच्या ४ पोस्ट काढण्याचा विक्रम केला. भूषण हा सध्या गडचिरोली येथे मुख्याधिकारीपदी काम करत आहे. या सेवेत असताना त्याने आता बापाने मनात पेरलेले स्वप्न पूर्ण करत पोलिस उपअधीक्षक पद पटकावले आहे.

अधिकाऱ्यांचा चौक

येथील तहसील कार्यालय परिसरात भूषणचे वास्तव्य आहे. याच परिसरात ३०-३२ वर्षांपूर्वी उपजिल्हाधिकारी झालेले आणि सध्या अतिरिक्त सचिव असलेले आण्णासाहेब चव्हाण, मुंबईतील पोलिस उपायुक्त मितेश घट्टे हे सुद्धा याच परिसरात राहतात. भूषणच्या यशाने हा परिसर आता अधिकाऱ्यांचा चौक म्हणून ओळखला जाईल.

Web Title: The father instilled in his son the dream of becoming an officer and Bhushan Mane of Islampur became the Deputy Superintendent of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.