'चौकीदार चोर है' चा आवाज सांगलीपर्यंत; महापालिकेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 02:13 PM2019-02-12T14:13:24+5:302019-02-12T14:14:00+5:30

महापालिका सभेत विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी अमृत नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला जादा दराची बिले अदा केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

The sound of 'Chaukidar Chor hai' in Sangli Municipal Corporation | 'चौकीदार चोर है' चा आवाज सांगलीपर्यंत; महापालिकेत गदारोळ

'चौकीदार चोर है' चा आवाज सांगलीपर्यंत; महापालिकेत गदारोळ

Next

सांगली : महापालिकेच्या सभेत अमृत योजनेच्या अवास्तव बिलावरून काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरत 'चौकीदार चोर है' अशी टीका केली. त्यांच्या या टीकेला भाजपच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेत महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. पाटील यांनी शब्द मागे घेण्यास नकार देताच भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी 'चोर मचाये शोर' असे जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गदारोळ उडाला. 

महापालिका सभेत विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी अमृत नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला जादा दराची बिले अदा केल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. या विषयावर बोलताना संतोष पाटील यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत चौकीदार चोर है असा आरोप केला. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. महापौरांनी हा शब्द मागे घ्यावा आणि कोण चोर आहे याचा स्पष्ट उल्लेख करावा, असे आदेशही पाटील यांना दिले. पण त्यांनी हा शब्द पण प्रशासनासाठी वापरल्याचा स्पष्ट केले आणि शब्द मागे घेण्यास नकार दिला. 

शब्द मागे न घेतल्याबद्दल नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर महापौर संगीता खोत यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईविरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले. त्यांनी महापौरांच्या आसनाकडे धाव घेतली. सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूंनी घोषणा सुरू होत्या. यादरम्यान उपायुक्त स्मृती पाटील यांनी प्रशासन चोर असेल तर मी त्याचा धिक्कार करतो आणि सभेवर बहिष्कार टाकतो असे सांगत सर्व अधिकाऱ्यांसह सभागृह सोडले. अधिकारी सभागृहाबाहेर गेल्यानंतरही काँग्रेस आणि भाजपचे नगरसेवक एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरूच होती. अखेर महापौरांनी सभा अर्धा तासासाठी तहकूब केली. 

Web Title: The sound of 'Chaukidar Chor hai' in Sangli Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली