सांगलीकरांनी पोलिसांची चूक पोटात घ्यावी,सुधारण्याची संधी द्या : विश्वास नांगरे-पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 12:43 AM2017-11-28T00:43:04+5:302017-11-28T00:45:33+5:30

 Sangliikar gives police an opportunity to get wrong in the stomach, give an opportunity to improve: trust Nangre-Patil | सांगलीकरांनी पोलिसांची चूक पोटात घ्यावी,सुधारण्याची संधी द्या : विश्वास नांगरे-पाटील

सांगलीकरांनी पोलिसांची चूक पोटात घ्यावी,सुधारण्याची संधी द्या : विश्वास नांगरे-पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देअनिकेत कोथळे प्रकरण गंभीरच; सांगलीत नागरिकांशी संवादतुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. मोर्चे, रास्ता रोको करण्यासाठी जसा दबाव ग्रुप तयार करता, पोलिसप्रमुख कमी बोलतात आणि काम चांगले करून दाखवितात.

सांगली : पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात, पण अनिकेत कोथळेच्या प्रकरणात झालेली चूक फार गंभीर आहे. ही चूक सांगलीकरांनी पोटात घेऊन पोलिसांना सुधारण्याची संधी द्यावी, असे भावूक आवाहन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.

सोमवारी सायंकाळी पोलिस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या नागरिकांच्या बैठकीत नांगरे-पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे, पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधून पोलिसांच्या कामाबद्दल तक्रारी ऐकून घेतल्या. महिलांची छेडछाड, वाढत्या घरफोड्या, लुटमार रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी नागरिकांनी केली. वाहतूक व्यवस्थेविषयी तक्रारी केल्या. एकूण ४७ तक्रारी मांडण्यात आल्या. या सर्व तक्रारींची नांगरे-पाटील यांनी नोंद करुन घेतली.

नांगरे-पाटील म्हणाले, पोलिस ठाण्यात येणाºया नागरिकांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत, ही बाब गंभीर आहे. येणाºया प्रत्येक तक्रारीची ठाणे अंमलदाराने दखल घेतलीच पाहिजे. पोलिस ठाणे हे तक्रारींचे निवारण करणारे चांगले सर्व्हिस सेंटर झाले पाहिजे. अनिकेत कोथळे प्रकरणातही तक्रार घेण्यास टाळाटाळ झाली. पुढे त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले आहेत. ३ नोव्हेंबरला अनिकेत कोथळेचा लकी बॅग्जचा मालक नीलेश खत्रीशी वाद झाला. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. पण पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली नाही. ५ नोव्हेंबरला कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यास लुबाडण्यात आले. पहाटे पाचला गायकवाड तक्रार देण्यास गेले; परंतु पोलिसांनी सकाळी साडेनऊला तक्रार घेतल्याचे दिसून आले आहे. पोलिस यंत्रणेतील हे दोष सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रसंगी ठाणे अंमलदार व त्याच्या मदतनीसाला प्रशिक्षण दिले जाईल.

नांगरे-पाटील म्हणाले, पोलिस जनतेच्या सेवेसाठी आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. कधी-कधी त्यांच्या हातून चुका घडतात. अनिकेत कोथळे प्रकरणात घडलेली चूक फार गंभीर आहे. सांगलीकरांनी आमची ही चूक पोटात घेऊन सुधारण्याची संधी द्यावी. तुमचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. मोर्चे, रास्ता रोको करण्यासाठी जसा दबाव ग्रुप तयार करता, तसा पोलिसांना पाठिंबा देण्यासाठीही ग्रुप करावा. महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निवारण केले जाईल. आणखी दीड महिन्याने पोलिसप्रमुख अशीच बैठक घेतील. पोलिसप्रमुख कमी बोलतात आणि काम चांगले करून दाखवितात.

या बैठकीस माजी आमदार हाफिज धत्तुरे, चेतना वैद्य, डॉ. नॅथालियन ससे, अरुण दांडेकर, विद्या नलवडे, सुधीर सिंहासने, डॉ. ज्ञानचंद्र पाटील, राजू नरवाडकर, मौलाना शेख, सचिन सव्वाखंडे, सुरेश दुधगावकर, असिफ बावा, डॉ. विकास पाटील, अमोल पाटील आदी उपस्थित होते.

‘एलसीबी’वर नांगरे-पाटील यांची नाराजी
बैठकीनंतर नांगरे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाची आहे; पण गेल्या वर्षभरात त्यांनी केवळ एकच घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. ‘चेन स्नॅचिंग’चे नऊ गुन्हे उघडकीस आणल्याने या गुन्ह्यांना आळा बसला आहे. वाटमारीचे गुन्हे रोखण्याचे आदेशही दिले आहेत. गुन्हेगारांची मस्ती खपवून घेतली जाणार नाही.

‘सीआयडी’वर विश्वास ठेवा : नांगरे-पाटील
नांगरे-पाटील म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरणाचा सीआयडीकडून तपास सुरु आहे. वरिष्ठ अधिकारी तपासावर लक्ष ठेवून आहेत. तपास चांगल्या पद्धतीने होईल. कोणत्याही त्रुटी ते ठेवणार नाहीत. सांगलीकरांनी तपासावर विश्वास ठेवावा.

जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करू : सुहेल शर्मा
जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा म्हणाले, पोलिस ठाण्यात न्याय मिळत नाही, तक्रारींची दखल घेतली जात नाही, सन्मानाची वागणूक मिळत नाही, याबद्दल मांडलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल. प्रत्येक समस्येचे लवकरच निवारण केले जाईल. जनतेच्या अपेक्षेप्रमाणे काम करुन दाखविले जाईल.

बोगस तक्रार पाठवून चौकशी
नांगरे-पाटील म्हणाले, पोलिस ठाण्यात तक्रारींची दखल घेतली जाते का नाही, हे पाहण्यासाठी आता पोलिस ठाण्यात बोगस तक्रारदार पाठवून चौकशी केली जाईल. यापूर्वी हा प्रयोग केला आहे. यामध्ये तीन तक्रारी आढळून आल्या. संबंधित पोलिसांवर खातेनिहाय कारवाईही केली आहे. आमच्यातील चुका शोधून त्या सुधारल्या जातील.

Web Title:  Sangliikar gives police an opportunity to get wrong in the stomach, give an opportunity to improve: trust Nangre-Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.